Goan Christians in Indian Army : भारतीय सैन्यात गोव्यातील ख्रिश्चनांचीच संख्या अधिक का?

भारतीयांनाही सामावून न घेणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून गोमंतकीयांची नेमणूक होण्यास हॉकीची एक मॅच कारणीभूत ठरली, हे सांगितल्यास आपल्याला खरे वाटणार नाही!
Indian Army
Indian ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

आम्ही आतापर्यंत मूलत: गोमंतकीय असलेल्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांची माहिती घेतली. हे अधिकारी भारताच्या संरक्षण सेवेतील त्यांच्या संबंधित शाखांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर पोहोचले होते. भारताच्या संरक्षण सेवेत सर्व पंथ समान असले तरी, त्या टप्प्यापर्यंत लिहिलेले आठही जनरल अपवाद न करता कॅथलिक होते हे खरे होते.

खरे तर, 29 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या यादीतील 23 कॅथलिक आहेत, फक्त सहा हिंदू आहेत. भारताच्या सशस्त्र दलांमध्ये मूळ गोमंतकीय असलेल्या सर्व कमिशन्ड ऑफिसर श्रेणींचा विचार केल्यास ही विषमता तीव्रपणे (सुमारे 9:1 पर्यंत) जाणवते. त्यामुळे, भारताच्या सशस्त्र दलात गोव्यातील हिंदू अधिकारी कमी आणि कॅथलिकांचे प्रमाण जास्त का होते, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. उत्तरासाठी, गोव्याच्या भूतकाळात थोडेसे डोकावले पाहिजे.

लष्कर - एक सीओएएस (जनरल एसएफ रॉड्रिग्ज), एक उपप्रमुख (लेफ्टनंट जनरल स्टॅनले मिनेझिस), दोन आर्मी कमांडर (ले. जनरल एरिक वास आणि लेफ्टनंट जनरल वॉल्टर पिंटो), चार लेफ्टनंट जनरल (लेफ्टनंट जनरल. सीए बॅरेटो,लेफ्टनंट जनरल एफटी डायस. जनरल केएल डिसोझा आणि लेफ्टनंट जनरल एमए फर्नांडिस) आणि बारा मेजर जनरल (मेजर जनरल कृष्णराव राणे, मेजर जनरल सिडनी पिंटो, मेजर जनरल बेंजामिन गोन्साल्विस, मेजर जनरल बेंजामिन गोन्साल्विस, मेजर जनरल युस्टेस डिसोझा, मेजर जनरल अँटोनियो डिसिल्व्हा, मेजर जनरल इयान कार्डोझो, मेजर जनरल इव्हान डी’कुन्हा, मेजर जनरल युस्टेस फर्नांडिस, मेजर जनरल अनिल रायकर, मेजर जनरल दिनेश मर्चंट, मेजर जनरल क्रिस्टोफर फर्नांडिस आणि मेजर जनरल सुमेर डी’ कुन्हा)

नौदल - एक व्हाइस अ‍ॅडमिरल (व्हाइस अ‍ॅडमिरल जॉन डिसिल्वा) आणि एक रिअर अ‍ॅडमिरल (सर्ग रिअर अ‍ॅडमिरल डीआरएफ पिंटो).

हवाई दल - एक सीएएस (वायुप्रमुख एमएसएल एच मूळगावकर), दोन एअर मार्शल/एओसी-इन-सी (एअर एमएसएल टेरेन्स देसा आणि एअर एमएसएल यशवंतराव राणे), दोन एअर मार्शल (एअर एमएसएल लोरेटो परेरा आणि एअर एमएसएल संदेश वागळे) आणि दोन व्हाइस एअर मार्शल्स (एअर व्हाइस एमएसएल एहर्लिच पिंटो आणि एअर व्हाईस एमएसएल गिल्स गोमेझ).

1543 पर्यंत गोव्यातील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी (जुनी काबिजाद) हे तीन तालुके पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्या शतकाच्या अखेरीस, जुन्या काबिजादीतील मूळ हिंदू रहिवासी ख्रिस्ती झाले होते. ज्यांनी ख्रिश्चन होण्यास प्रतिकार केला त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या जमिनी जप्त केल्या गेल्या आणि शेवटी त्यांना हद्दपार केले गेले. याचा परिणाम असा झाला की जुन्या काबिजादीतील जवळपास शंभर टक्के रहिवासी ख्रिश्चन झाले होते.

250 वर्षांहून अधिक वर्षांनंतर, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात, पोर्तुगिजांनी गोव्यातील उर्वरित तालुके - काणकोण, केपे, सांगे, फोंडा, डिचोली, सत्तरी आणि पेडणे (नवी काबिजाद) ताब्यात घेतले. वसाहतवादी शक्तीचा पांथिक आवेश तोपर्यंत नष्ट झाला होता आणि त्यामुळे, नवीन काबिजादीतील बहुतेक रहिवासी हिंदू राहिले.

इथे आणखी एक महत्त्वाचा फरक लक्षांत घेणे आवश्यक आहे. नवीन काबिजादीतील सात नवीन तालुक्यांनी गोव्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 80 टक्के भाग व्यापला आहे. परंतु लोकसंख्या मात्र केवळ 27 टक्के एवढीच होती. या 27 टक्क्यांमध्ये बहुतांश लोक हिंदू होते. जुन्या काबिजादीतील तीन तालुक्यांचे क्षेत्रफळ गोव्याच्या एकूण भूभागाच्या फक्त 20 टक्के होते. परंतु त्यांची लोकसंख्या 62 टक्के होती, ज्यातील बहुतेक सर्वजण ख्रिश्चन होते. (बाकी 11टक्के लोकसंख्या दमण आणि दीवमध्ये होती.)

याचा परिणाम असा झाला की 19 व्या शतकाच्या सुरुवातीस गोव्यात प्रामुख्याने ख्रिश्चन होते. ख्रिश्चनबहुल व हिंदूबहुल भागातील बहुतांश गोमंतकीय गरीब होते. 17 व्या शतकाच्या पूर्वार्धात डचांनी केलेल्या नाकेबंदीने गोव्यातील पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले होते. गोवा सुस्तावायचा राहिला होता. मुख्यत्वे कृषिप्रधान समाजात ‘उदरभरण’ झाले तरी पुरे इतपत लोकांची किमान अपेक्षा राहिली होती. शैक्षणिक सुविधा अल्प होत्या आणि नोकऱ्यांतूनही स्थानिकांना फार कमी संधी उपलब्ध होत्या.

कमांडर रेनियरच्या नेतृत्वाखाली ‘अ‍ॅरॉगन्ट’ व ‘सफॉल्क’ नामक दोन युद्धनौका सैन्यासह गोव्याच्या किनाऱ्यावर थडकल्या. 1799 साली त्यांनी काबो व आग्वाद हे किल्ले ताब्यात घेतले. नेपोलिअन युद्धतंत्राचा वापर होणारा हा काळ. आधीच कावरा बावरा झालेल्या पोर्तुगीज गव्हर्नरला इंग्रजांनी सांगितले की, ‘पाँडिचेरीतील फ्रेंच लोक टिपू सुलतानसोबत गोव्यावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत.’

दि. 6 सप्टेंबर 1799 रोजी, कर्नल विल्यम क्लार्क तीन पायदळ आणि तोफखाना बटालियन (1100 ब्रिटिश सैन्य, नंतर 3000 पर्यंत राखीव सैन्य) घेऊन आले आणि त्यांनी काबो आणि आग्वाद येथील किल्ल्यांव्यतिरिक्त, गॅस्पर डायस (मिरामार), दोनापावला, रेइश मागूश व मुरगाव येथील किल्ले ताब्यात घेतले. कर्नल क्लार्कने पोर्तुगीजांना सांगितले की, ‘सुएझ कालव्यातून जाताना गोवा काबीज करण्यासाठी नेपोलियनने ब्रेस्ट येथे 26 युद्धनौका आणि 14 फ्रिगेट्स तयार ठेवल्या आहेत.’

पोतुगिजांनी सांगितले की, ‘प्रेंचांशी लढण्यास आम्ही समर्थ आहोत.’ पण, त्यामुळे फारसा फरक पडला नाही. पुढील 14 वर्षे ब्रिटिश येथेच ठाण मांडून होते. 1813 साली लिस्बेन-लंडन तह झाला. त्यामुळे, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे येथे डेरेदाखल झालेले वेलिंग्टनचे भावी सरदार आर्थर वेस्ले व त्याचा भाऊ रिचर्ड वेस्ले यांना आल्यापावली परत जावे लागले.

या दरम्यानच्या कालावधीत ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोमंतकीय ख्रिश्चन व ब्रिटिश लोक यांच्या खूपच साम्यस्थळे आढळली. त्यांचे कपडे, खाणंपिणं यात कमालीचे साम्य होते. किनाऱ्यालगत राहणाऱ्या गोमंतकीय ख्रिश्चन लोकांच्या कष्टाळू वृत्तीची, कौशल्याची व प्रामाणिकपणाची ब्रिटिश लोकांना भुरळ पडली. त्यांनी किनाऱ्यालगतच्या गोमंतकीयांचे नौकानयन कौशल्य हेरले. जुन्या काबिजादीतील प्रदेश किनाऱ्यालगत होता, तर काणकोण व पेडणे वगळता नव्या काबिजादीतील इतर भाग बराच लांब होता. त्यामुळे, ब्रिटिशांनी या किनाऱ्यानजीक वसलेल्या ख्रिश्चनांमधून रॉयल नॅव्हीसाठी 3,300 लोकांना येथून नेले. त्याशिवाय आया, वाकनीस आणि स्वयंपाकीही निवडून नेले.

ब्रिटीश शिपिंग कंपनीचे संचालक मॅकिनन मॅकेन्झी यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. कंपनीने आपल्या जहाजांसाठी खलाशी, नावाडी यांना नोकरीवर घेतले. यात हजारोंच्या संख्येने जुन्या काबिजादीतील ख्रिश्चनांची होती.

त्यावेळी गोमंतकीयांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. त्यात केवळ आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेलेच होते, असे नव्हे तर मध्यमवर्गीयही मोठ्या संख्येने भरती झाले होते. मध्यमवर्गीय कुटुंबांनी स्वत:च्या नोकरीसाठी आणि त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात स्थलांतर करण्यास सुरुवात केली.

Indian Army
Goa Success Story : पिंटो आणि गोमीस; गोमंतकीय अभिमानाचे दोन मानबिंदू

19 व्या शतकाच्या प्रारंभी झालेल्या स्थलांतरानंतरही 1850 साली गोव्यात 64 % ख्रिश्चन आणि 36 % हिंदू होते. 1880 ते 1910 दरम्यान या केवळ 30 वर्षांच्या कालावधीत 3.21 लाख गोमंतकीयांनी गोव्याबाहेर स्थलांतर केले. इतिहास संशोधक आणि गोव्याच्या उच्च शिक्षण मंडळाचे उपसंचालक, प्राध्यापक डॉ. रेमी डायस यांनी केलेल्या अभ्यासानुसार अर्ध्याहून अधिक गोमंतकीय गोव्याबाहेर होते. यातील अनेकजण भारत, आफ्रिका, मध्य पूर्व आणि अर्थातच सात समुद्र ओलांडलेल्या जहाजांमध्ये होते. 1950 पर्यंत एकट्या मुंबईत दीड लाख गोमंतकीय होते.

1961 च्या आधी स्थलांतरित झालेल्यांमध्ये बहुतांश लोक जुन्या काबिजादीतील ख्रिश्चन होते. हिंदूंनी प्राचीन काळी तीन टेकडी किंवा मध्ययुगीन समुद्र ओलांडल्यास त्यांना धर्मभ्रष्ट मानले जात असे. इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी दे लिस्बोआ(आयएससीटीई) पाउलो दे मातोस आणि एम्स्टरडर्म्सचे जेन ल्युकासेन यांच्या संयुक्त अभ्यासानुसार गोव्यातील एकूण स्थलांतरितांपैकी 90 टक्के ख्रिश्चन होते, तर 7 टक्के हिंदू होते.

झालेल्या प्रचंड स्थलांतरामुळे, 1960 साली गोव्याच्या 5.90 लाख लोकसंख्येपैकी 60 टक्के लोक हिंदू होते, तर ख्रिश्चन 38 टक्के होते. 2011 च्या जनगणनेप्रमाणे यात आणखी घट होऊन ख्रिश्चन 25 टक्के राहिले होते. आजमितीस 20 टक्के ख्रिश्चनच गोव्यात असावेत, असा अंदाज आहे.

स्थलांतरित झालेला गोमंतकीय ख्रिश्चन समाज भारतात आणि भारताबहेरही जाऊन राहिला. यात आग्रा, अहमदाबाद, अहमदनगर, अजमेर, अमरावती, बंगळुरू, बडोदा, बेळगाव (शहर आणि जिल्हा), बेळ्ळारी, भोपाळ, भुसावळ, मुंबई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, जबलपूर, कानपूर, कराची, कोल्हापूर (शहर आणि जिल्हा), लोणावळा, मद्रास, म्हैसूर, नागपूर, पुणे आणि सोलापूर या ठिकाणांसह अगदी बर्माचाही समावेश होतो.

अशा विविध ठिकाणी विखुरलेले गोमंतकीय आपली हुशारी, आपले शिक्षण या जोरावर भारताच्या संरक्षण सेवेत दाखल झाले. गोव्यातून त्यांना हे करणे तसे शक्यच नव्हते. पोर्तुगीज सैन्यात सामील होऊन ते टेनेन्टे कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल होऊच शकले नसते. कारण, सर्व उच्च पदांवर ‘पाखले’च (गोरे पोर्तुगीज) विराजमान होते.

त्या काळी भारतीयांना ब्रिटिश सशस्त्र दलाच्या कार्यकारी कमिशनर श्रेणीत सहभागी होण्याची परवानगी नव्हती. ते फक्त वैद्यकीय, दंत, परिचारक आणि अशा प्रकारच्या साहाय्यक सेवांमध्ये अधिकारी म्हणूनच घेतले जात. अशा परिस्थितीत ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून गोमंतकीयांची नेमणूक होण्यास हॉकीची एक मॅच कारणीभूत ठरली हे सांगितल्यास आपल्याला खरे वाटणार नाही!

त्यासाठी, 1913 सालच्या प्रतिष्ठित आगा खान हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्याला जावे लागेल. कर्नल थॉमस कॅडेल, ऑक्झिलरी फोर्स ऑफ इंडियाचे (एएफआय) कमांडर फायनलमध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. मुंबईस्थित गोवा स्पोर्ट्स क्लब, लुसिटानियन्सने अंतिम फेरी गाठली होती. गोव्याच्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, अतुलनीय खेळाचे दर्शन घडवत आगाखान हॉकी चषक जिंकला.

कॅडेल गोव्याच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीने इतके प्रभावित झाले की, त्यांनी लुसीटानियन्सना एएफआयमध्ये सामील होण्याचे आमंत्रणच देऊन टाकले. ते म्हणाले की, ‘चॅम्पियन संघ चांगले सैनिक घडवेल.’ एएफआयमध्ये पंचवीस गोमंतकीयांनी नावनोंदणी केली. त्यांच्यासाठी एक विशेष लुसिटानियन विभाग तयार करण्यात आला. या विभागातील गोमंतकीयांनी खरोखरच अनेक आदर्श अधिकारी घडवले आणि थॉमस कॅडेल यांनी दाखवलेला विश्वास खरा करून दाखवला. एएफआयमधून भारताच्या ब्रिटिश सशस्त्र दलात कमिशनअंतर्गत या अधिकाऱ्यांना नियमितपणे सामावून घेतले गेले. त्यांच्यासाठी प्रवेशाचे काही नियम शिथिल करण्यात आले. भारतात राहणारे स्थलांतरित गोमंतकीय मोठ्या संख्येने सशस्त्र दलांमध्ये सामील झाले. यात शेकडा नव्वद लोक ख्रिश्चन होते. जेमतेम दहा टक्के हिंदू होते. भारताच्या सशस्त्र दलातील कमिशन्ड ऑफिसर श्रेणींमध्ये गोमंतकीय ख्रिश्चनांचे प्रमाण अधिक असण्यामागे एवढी सगळी कारणपरंपरा आहे. ही लक्षात घेणे आवश्यक आहे.

असे असले तरीही प्रत्येक गोमंतकीय अधिकारी, मग तो हिंदू असो किंवा ख्रिश्चन, त्यांनी आपल्या पराक्रमाने, शौर्याने आणि बलिदानाने हे सिद्ध केले आहे, की गोमंतकीयही मागे नाहीत आणि ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. मूलत: गोमंतकीय असलेल्या अधिकारी श्रेणीतील हिंदूंच्या शौर्यगाथांसाठी आपणास पुढील तीन रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या वेध पुरवणीतील या सदरास भेट द्यावी लागेल. त्यानंतरही वेध पुरवणीमध्ये हा स्तंभ सुरूच राहील. ‘दैनिक गोमंतक’च्या वाचकांसाठी हा खजिना लवकरच उघडला जाणार आहे. जे मराठी दैनिक वाचत नाहीत त्यांना माझ्या 2010 च्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाची प्रतीक्षा करावी लागेल!

-वाल्मिकी फालेरो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com