Goa Leopard Sightings Dainik Gomantak
गोवा

सावधान! बिबट्यांनी जंगले सोडली, अंगणे धरली; नागरी वस्‍तीत घुसून पाळीव प्राण्‍यांवर हल्ले करण्‍याचे प्रमाण वाढले; मये, फोंडा काणकोणात धास्ती

Goa Leopard Sightings: राज्यातील जंगलांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने बिबट्यांनी गेल्या काही वर्षांपासून आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील जंगलांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने बिबट्यांनी गेल्या काही वर्षांपासून आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे. अनेक भागांमध्ये बिबटे नागरिकांच्या अंगणापर्यंत पोहोचत असून पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने स्थानिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. वारंवार मागणी करूनही बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वन खात्याला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीही वाढत आहे.

गेल्या काही दिवसांत तीर्थबाग–मये येथे बिबट्याने भरवस्तीत प्रवेश करून कुत्र्याच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कुत्रा वाचला. हा बिबटा यापूर्वीही अनेकदा मये परिसरात दिसून आला होता. त्यानंतर त्याचा संचार काहीसा कमी झाला होता; मात्र पुन्हा त्याचे दर्शन होत असून तो नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

काही वर्षांपूर्वी अर्धवाडा–मये येथील विहिरीत एक बिबटा पडला होता. त्याला वन खात्याने पकडले होते. त्यानंतर केळबायवाडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता, तर मये सरकारी तंत्रनिकेतन परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक दुचाकीचालक जखमी झाला होता. या घटनांवरून मये परिसरात बिबट्यांचा अधिवास असल्याचे स्पष्ट होत आहे.

काणकोण येथील श्रीस्थळ पंचायतीतील गवळीवाडा परिसरात एका घराच्या व्हरांड्यात शिरलेला बिबटा सीसीटीव्हीत कैद झाल्याने गावात खळबळ उडाली होती. हाच बिबटा नंतर काही घरांच्या अंगणात तसेच शाळेच्या परिसरातही फिरताना दिसून आला. काही दिवसांपूर्वी फोंड्यातील ढवळी भागात बिबट्याने आठवडाभरात तीन वासरांचा फडशा पाडला.

कुडणे पंचायत क्षेत्रातील शोभा मयेकर यांच्या घराच्या अंगणातही बिबटा शिरल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले. दरम्यान, विकासासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने बिबट्यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते ग्रामीण भागांकडे वळत आहेत. जंगलतोड थांबवून ती वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी सातत्याने केली आहे. मात्र, याकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

एकीकडे बिबटे, दुसरीकडे गवे

राज्यात अनेक भागांमध्ये बिबट्यांप्रमाणेच गवेही दिवसा आणि रात्री लोकवस्तीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. मात्र, सरकारी अनास्थेमुळे या वन्यप्राण्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्याचे वारंवार समोर येत आहे.

ढवळीत संचार

ढवळी भागात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा संचार वाढला असून आतापर्यंत तीन वासरांचा बळी या बिबट्याने घेतला आहे. तसेच परिसरातील कुत्र्यांचीही संख्या कमी होत असल्याने हे बिबटे भविष्यात माणसांवरही हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन खात्याने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा.

शिवराम नाईक (ढवळी, फोंडा)

फोंड्यात एकच बिबटा वारंवार दिसतो

गेल्या २५ तारखेला ढवळीतील नाईक कुटुंबीयांच्या गोठ्यात शिरून या बिबट्याने दोन वासरांवर हल्ला केला होता. त्यात एका वासराचा मृत्यू झाला, तर दुसरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर सहा दिवसांनी, २ जुलै रोजी प्रसाद कामत यांच्या गोठ्यातील वासरावरही याच बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

या कालावधीत ढवळी परिसरातील कुत्र्यांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले असून हा बिबटाच कुत्र्यांना ठार मारत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वन खात्याने ॲक्टिव्ह व्हावे

इवल्याशा गोव्यात वन्यप्राणी लोकवस्तीत येऊन दहशत निर्माण करीत आहेत. बिबटे तसेच गवे–रेडे यांचा स्वैरविहार सुरू असल्याने रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वन खात्याने प्रभावी उपाययोजना करून या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.

नीळकंठ गावकर, नागझर, कुर्टी–फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT