Goa | Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Goa: 'गोवा फाईल्स' ठरला हिट! 'खरी कुजबूज'

Goa: ‘गोवा फाईल्स’ सुपर हिट बनला नसला, तरी 'हिट' नक्कीच ठरला अशीच चर्चा सध्या सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: ‘कोंबडा झाकला म्हणजे दिवस उजाडायचा राहत नाही’ अशी एक म्हण आहे. ‘गोंयच्या सायबा’वरून सुभाष वेलिंगकर सरांनी ‘गोवा फाईल्स’ खुल्या केल्यावर बरेच हिंदू यंदा जुने गोवेला गेले नसल्याचे कळते. ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जसा स्क्रीनवर चालला तसाच इफ्फीतही बराच गाजला.

सुभाष सरांनी गोंयचो सायब गोव्यात इंक्युजिशन आणण्यात कसे जबाबदार आहेत व त्यांच्यामुळेच नव ख्रिस्तींचा कसा छळ झाला याचे दाखले त्यांनी ‘गोवा फाईल्स’मधून उघड केल्यावर अनेक हिंदूंना साक्षात्कार झाला असावा.

अनेक हिंदू जे नियमितपणे ओल्ड गोव्याला जात होते त्यातील अनेकांनी नको ते फेस्त म्हणून घरीच बसणे पसंत केले. एकूण काय सुभाष सरांचा ‘गोवा फाईल्स’ सुपर हिट बनला नसला, तरी ‘हिट’ नक्कीच ठरला अशीच चर्चा सध्या सुरू झाली आहे.

पणजीवासी वाऱ्यावर

विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्यानंतर पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात पणजीवासीयांवर रुसले आहेत. पणजीवासीयांना सरकारी नोकऱ्या, शहरातील विकासकामे करून दणदणीत विजय मिळण्याची आशा मोन्सेरात यांना होती.

यंदा नरकारासुराची देणगीदेखील त्यांनी दिली नाही आणि आता आपल्या कार्यालयातही ते भेटीसाठी उपस्थित राहत नाहीत. हेच नव्हे तर त्यांचे अनेक खासगी सचिव असूनही त्यापैकी एकही पणजीच्या मतदारांसाठी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे पणजीवासी वाऱ्यावर पडल्याची चर्चा सध्या पणजीत सुरू आहे.

नावेलीतील भू वीज केबल

वीज खात्याचा कारभार आपले बांदोड्याचे सुदिनबाब यांच्याकडे आल्यापासून खाते कोट्यवधींच्या कामांच्या निविदा काढू लागले आहे, पण अधिकतम कामे उत्तर गोव्यातील असल्याने मंत्री महोदयांनी दक्षिण गोव्याला प्रतीक्षा यादीवर तर ठेवलेले नाही ना असा प्रश्न येथील लोकांना पडला आहे.

विशेषतः नावेली मतदारसंघातील भू वीज केबलचा प्रस्ताव हा आवेर्तान फुर्तादो यांच्या काळातील म्हणजे 2012 मधील आहे, पण अजून त्या कामाला चालना मिळालेली तर नाहीच उलट नावेलीला डावलून अन्यत्र ती कामे हाती घेतली जात आहेत. या मागे नेमके कोणते राजकारण आहे असा प्रश्न नावेलकरांना पडला आहे.

रेती उत्खननाची कहाणी

रेती उत्खननाला सरकारने परवानगी दिली खरी, पण हे रेती उत्खनन कसे आणि किती करणार यासंबंधी यंत्रणाच उभारलेली नाही. रेती उपसा करण्यासाठी यंत्र वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा सरकारने केली आहे, पण आता बंदी असतानाही पंप लावून रेतीचा उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत.

वर्तमानपत्रात यासंबंधी बातम्या आल्यानंतर मी मारल्यासारखे करतो, तू मेल्यासारखे कर असा प्रकार सध्या सरकारी यंत्रणांकडून सुरू आहे. त्यामुळे या अमर्याद रेती उपशावर प्रभावी नजर ठेवण्यासाठी कोणती सरकारी यंत्रणा तैनात ठेवण्यात येणार आहे हे आधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे पर्यावरणप्रेमी म्हणतात.

त्यांचेही खरे आहे. कारण चोरी छुपे रेती उत्खनन आणि वाहतूक सध्या कशी चालते आणि रात्रीस खेळ कसा काय चालतो हे शेंबडे पोरही बिनधास्तपणे सांगेल अशी सध्या रेती उत्खननाची कहाणी आहे.

पुनश्च फेस्त फेरीचे गुऱ्हाळ

मडगावच्या जुन्या बाजारातील फेस्त फेरीचे राजकारण सध्या ऐन रंगात आले आहे. गेली अनेक वर्षे ही फेरी वेगवेगळ्या कारणावरून गाजत असताना त्याबाबत चकार शब्द न काढणारे यंदा तिला विरोध करत आहेत व त्या मागील कारण सर्वांनाच माहीत आहे, पण मुद्दा तो नाही.

फेरीतील गर्दी टाळण्यासाठी स्टॉलवर मर्यादा आणणे म्हणजेच पारंपरिक वस्तुंच्याच स्टॉलना परवानगी देणे, फेरीचे दिवस कमी करणे यासारखे अनेक उपाय आहेत, पण त्यात कुणालाच रस नाही. कारण तसे झाले तर राजकारण कसे होणार. आज जे वाहतुकीच्या कोंडीचा बाऊ करतात ते बगलरस्ता झाला असता, तर ही कोंडी झालीच नसती हेही विसरतात.

सिल्वेराबाब दिसले!

सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे पंचायत निवडणूक झाल्यापासून आराम करत असल्याने ते दिसत नव्हते, परंतु आगशी येथील फुटबॉल मैदानाचे निरीक्षण करण्यासाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे आले, तेव्हा त्यांच्यासोबत सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर उपस्थित होते.

परंतु या मैदानासाठी सिल्वेरा यांनीदेखील प्रयत्न केले असून तेदेखील तेथे प्रकट झाले. गावडे यांना सिल्वेराबाबांनी मैदानाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. बऱ्याच दिवसानंतर सिल्वेराबाब दिसल्याने यावरून मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

राज्य सरकारने आज 145 उपनिरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. अर्थात या पोलिस भरतीमागे मोठे महाभारत घडून गेले आहे. त्याचा पर्दाफाशही साऱ्या माध्यमांवर व्हायरल झाला होता. या भरतीमध्ये पोलिस पदाच्या उमेदवारांना साधे उत्तीर्णही होता आले नव्हते. जे उपनिरीक्षकपदासाठी सर्वोत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

यांच्या गुणांमधली तफावत तर भली मोठी आहे. हाच धागा पकडत फॉरवर्डवाल्यांनी सरकारला दम भरला होता. अखेर सरकारने यावर उपअधीक्षकांच्या समितीद्वारे चौकशीही सुरू केली आहे. या समितीचा चौकशी अहवाल येण्यापूर्वीच उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पाहावे लागेल, की पुढे काय होते ते...

एका आकड्याचा घोळ

फोंड्यातील पालिका राजकारणात सध्या रंग भरला आहे. आठ नगरसेवकांनी जरी भाजपच्या नगराध्यक्षावर अविश्‍वास ठराव आणला तरी आता या आठजणांतील एकाला भाजपने आपल्या कळपात नेले आहे. त्यामुळे राहिले सात. आता आठांपुढे सातजणांचे काय चालणार असा सवाल आहे.

फोंडा पालिकेच्या राजकारणात केवळ एका आकड्याने सध्या घोळ घातला आहे. आठजण एकत्रित आले की आणला अविश्‍वास ठराव, असा हा प्रकार चालला आहे. त्यामुळेच आतापर्यंत सहा नगराध्यक्ष या पालिका मंडळाने पाहिले आहेत. आता भाजपने एका नगरसेवकाला घट्ट केले म्हटल्यावर कदाचित अविश्‍वास बारगळेल अशीच चर्चा सध्या सुरू आहे. शेवटी जे न देखे रवी ते देखे कवी, असे म्हणण्यापेक्षा जे न देखे नगरसेवक ते देखे रवी, असेच म्हणावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT