Pankaj Tripathi IFFI 2022|Goa News  Dainik Gomantak
गोवा

Pankaj Tripathi IFFI 2022: वाजपेयींची भूमिका मिळाली हे माझे भाग्यच!

Pankaj Tripathi IFFI 2022: ‘गुलकंदा’ नवी वेब सीरिज लवकरच येत आहे रसिकांच्या भेटीला

यशवंत पाटील

53rd IFFI 2022: ‘भारतरत्‍न’ अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर चित्रपट काढण्याचे अलीकडेच जाहीर झाले आहे आणि त्यात मला मुख्य अभिनेत्याची म्हणजेच आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे.

देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात सर्वोच्च कामगिरी करून देशासह जगभरात मानाचे स्थान मिळविलेल्या वाजपेयीजींची भूमिका मला मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो, असे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि कलेच्या दुनियेत विविध वेब सीरिजद्वारे धमाल उडवून देणारे नामवंत कलाकार पंकज त्रिपाठी यांनी सांगितले.

‘मै रहूं या न रहूं; ये देश रेहना चाहिए’ असे म्हणणारे देशाचे महान पुत्र आणि लोकप्रियतेचे शिखर गाठलेले माजी पंतप्रधान अटलजींचा हा चरित्रपट पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य विनोद भानुशाली व संदीप सिंग यांनी उचलले आहे.

उल्लेख एनपी यांच्या ‘द अनटोल्ड वाजपेयी : पोलिटिशियन ॲण्ड पॅरोडॉक्स’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. वाजपेयी यांच्या जीवनावरील हा चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

आजपर्यंत मी 60हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘गुंडगाव’, ‘केरी सिंग’ हे खूप गाजलेले आणि मला भावलेले चित्रपट. ‘केरी सिंग’ हा थ्रिलर चित्रपट होता. ‘ओ माय गॉड-2’, ‘फुक्रे-3’ हे माझे आगामी हिंदी चित्रपट असून ‘गुलकंदा’ ही वेब सीरिजही प्रदर्शित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

चित्रपट क्षेत्रात व वेब सीरिजच्या दुनियेत रसिकांनी मला भरभरून दाद दिली. त्यांचे कौतुकच माझ्या यशाचे गमक आहे. मी आत्ताच यशस्वी झालो असे म्हणत नाही, कारण मला अजूनही खूप शिकायचे आहे आणि मी शिकत आहे, असेही पंकज त्रिपाठी म्हणाले.

‘सेक्रेड गेम्स’, ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘मिर्झापूर’ यासारख्या लोकप्रिय वेब सीरिजद्वारे युवा पिढीतील रसिकांवर मनोराज्य गाजविण्यात यशस्वी ठरलेले प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मेरियॉट हॉटेलमध्ये भरलेल्या ‘फिल्म बझार’मध्‍ये भेट झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील करिअरविषयीच्या अनेक गोष्टी कथन केल्या.

नवोदित कलाकारांनी मेहनत घ्यावी

क्राफ्ट आणि ग्राफ्टला मानून युवा पिढीने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घ्यायला हवी. तंत्रशुद्ध शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. थोडेसे यश मिळाले म्हणून हुरळून न जाता कला क्षेत्रातील अभ्यास सतत सुरू ठेवावा.

सध्याची युवा पिढी अतिशय हुशार आहे. आपले करिअर घडविण्यासाठी ती सतत धडपडताना दिसते. ही धडपड त्यांनी कायम ठेवावी, असा संदेश पंकज त्रिपाठी यांनी दिला.

12 वर्षांचा खडतर प्रवास

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड हे माझे गाव. माझे वडील शेतकरी. मी डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मला लहानपणापासूनच कला क्षेत्रात रस होता. त्यामुळे मी मिळेल ते काम करतच हॉटेल मॅनेजमेंट केले. त्यानंतर नोकरी करतच टीव्ही मालिकांत छोटे मोठे काम केले, जाहिरातींतूनही काम केले. हे करत असताना अभिनयासाठीचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. 12 वर्षे खूप मेहनत घेऊन सतत शिकत राहिल्यानंतर आज इथपर्यंत मला पोहोचता आले, असे पंकज त्रिपाठी यांनी प्रांजळपणे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT