बार्देश: राज्यात किती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद पडले आहेत, याची सविस्तर माहिती सरकारने जनतेला द्यावी. तसेच ते बंद होण्याची कारणे जाहीर करावीत, अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केली.
म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या महासचिव जेनिफर लोबो आणि ॲड. शबनम खान उपस्थित होत्या. जानेवारी २०२५ पर्यंत गोव्यात १.१७ लाख एमएसएमई नोंदणीकृत होते, त्यापैकी १५६ बंद पडले आहेत. प्रमाणित स्टार्टअप्सची संख्या २४१ असली तरी प्रत्यक्ष कार्यस्थितीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे खलप यांनी सांगितले.
खलप म्हणाल्या की, बंद पडलेल्या एमएसएमईवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे काय झाले? त्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला? तसेच राज्यात ३,२५० स्वयं-सहायता गट नोंदणीकृत असून त्यापैकी किती सक्रिय आहेत किंवा किती बंद आहेत याची माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
खलप म्हणाल्या की, १७० स्वयंसहायता गटांना कँटीनसारख्या व्यवसायांसाठी मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात केवळ १७ गट कार्यरत आहेत. उरलेले कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात कोणत्या नव्या उद्योगांची स्थापना झाली व त्यातून युवक व महिलांसाठी किती रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या याची माहितीही सरकारने द्यावी, असे त्या म्हणाल्या.
जीएसटी बचत उत्सवावर टीका करताना डॉ. खलप म्हणाल्या की, हा एक त्रुटीपूर्ण कार्यक्रम आहे. जीएसटी बचत उत्सवाऐवजी त्याला ‘चापट उत्सव’ म्हणावे. कारण तो दिशाभूल करणारा कार्यक्रम असून सामान्य जनतेसाठी नुकसानकारक आहे. आधीचा जीएसटी म्हणजे भाजप लूट महोत्सव होता आणि आता भाजप कार्यकर्ते दुकानांवर जीएसटी २.० ची जाहिरात चिकटवत आहेत. मात्र मंत्री व आमदारांना व्यापारी व जनतेच्या अडचणींची कल्पना नाही. जीएसटीच्या नावाखाली झालेल्या शोषणाबाबत सरकारने अजूनही उत्तर दिलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.