पर्ये : २३ जुलैला पहाटे म्हादईला महापूर (Flood In Goa) आला. पाणी रस्त्यावरून वाहत-वाहत घराच्या दिशेने यायला सुरुवात झाली. पुराची धास्ती समजल्यावर घरात असलेल्या वयोवृद्ध आईबाबांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मी तिथेच बाजूच्या एका घरात राहिलो. मग पाणी आणखी वाढत गेले. पाण्याच्या जोरदार लाटा घरावर आढळू लागल्या. मी शेजारच्या घराच्या स्लॅबवर उभा होतो आणि हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. आमचे घर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाले. पूर पहाटे आल्याने घरातील कोणतेच साहित्य हलवता आले नाही. पाण्याच्या प्रवाहाने घरातील बरेचसे साहित्य वाहून गेले. घरातील एक लोखंडी कपाट, टीव्ही, फ्रीज असे सर्व साहित्य वाहून गेले. संध्याकाळपर्यंत पूर ओसरल्यावर जड पावलांनी घरी गेलो. घर म्हणजे काय तर चोहोबाजूंनी कोसळलेल्या भिंती होत्या. काय करावे काय सुचतच नव्हते. मन उदास झाले. जे कमावले होते ते वाहून गेले. त्यानंतर आईबाबा या ठिकाणी आले. त्यांना तर मानसिक धक्काच बसला. एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले, असे फोंडा तालुक्यातील गांजेतील साईश फडते भावनाविवश होऊन सांगत होता. (Heavy Rain In Goa)
या घटनेला आता तीन आठवडे झाले. पूर आल्यावर आईची तब्येत ढासळली होती. तिला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तिला डॉक्टरकडे दाखवले. आता तिची तब्येत सुधारतेय. पुराच्या धक्क्यातून आम्ही आता सावरतोय. यासाठी आम्हाला गावातील लोकांनी, मित्रमंडळी व इतर बऱ्याच जणांनी साहित्य व इतर मदत पुरवली. लोकांच्या मदतीने हे तीन आठवडे आम्ही घालवले. आता मी माझ्या नोकरीला जायला सुरुवात केली आहे, पण कोसळलेले घर उभे कसे करायचे, हा मोठा प्रश्न आहे. मित्रमंडळींनी काही प्रमाणात आर्थिक मदत दिली खरी, पण पुढे कसे करावे हाच प्रश्न समोर येतो. आईबाबा सध्या खांडेपारला बहिणीच्या घरी राहतात. अधूनमधून येथे येऊन जातात. माझे कामाला जाणे आणि येथे फेरी मारणे असेच होते. पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेला आमचा संसार पुन्हा घर उभे झाल्यावर सुरळीत होणार. तोपर्यंत या कटू आठवणी मनात पुन्हा पुन्हा येत राहतात, असे साईश फडते सांगत होता.
म्हादईच्या पुराचा मोठा फटका गांजेला बसला. येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरातील साहित्य वाहून गेले व चार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. त्यातील साईश फडते यांचे एक घर होते. श्री. फडते यांच्या घरची परिस्थिती खूपच बेताची आहे. उसगावमध्ये एका कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून तो काम करतो. घरात वयोवृद्ध व आजारी असणारे आईबाबा आहेत. स्वतःची शेतजमीन नाही त्यामुळे बाहेर काम केल्याशिवाय पर्याय नाही. अविवाहित असलेल्या तिशीतील या तरुणापुढे आपला संसार पुन्हा नव्याने उभारण्याचे आव्हान आहे.
घर उभारणीसाठी मदतीची गरज
कोसळलेल्या घराच्या ठिकाणी नवीन घर उभारणे, हे आपले ध्येय आहे. सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केल्याने त्याचीच प्रतीक्षा आहे. पण, ही रक्कम खूपच कमी आहे. आताच्या महागाईच्या काळात ही रक्कम पुरणारी नाही, असे साईश फडते याने सांगितले. हातात काहीच पैसे नाहीत, बचतही नाही. कंत्राटी कामगार असल्याने बँकेकडून कर्जही मिळणे कठीण. अशा परिस्थितीत घर उभारायचे आहे. सरकार जी मदत करणार आहे त्यावर हे नवीन घर उभारण्याचे ठरेल. तोपर्यंत बाकी सर्व अस्पष्ट आहे, असेही त्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.