Goa Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Deforestation Goa: 'किनारी भागात वृक्षतोडीसाठी परवानगी देणार नाही', मंत्री राणेंची घोषणा; व्हेल-शार्क संरक्षण मोहिमेस प्रारंभ

Vishwajit Rane: किनारी भागात वृक्षतोडीसाठी सरकार परवानगी देणार नाही, असा शब्द वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सर्वांसमक्ष प्रसिद्ध मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नांडिस ऊर्फ पेले यांना मिरामार येथे दिला.

Sameer Panditrao

पणजी: किनारी भागात वृक्षतोडीसाठी सरकार परवानगी देणार नाही, असा शब्द वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सर्वांसमक्ष प्रसिद्ध मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नांडिस ऊर्फ पेले यांना मिरामार येथे दिला. किनारी भागात वन खाते वृक्षारोपण करते. मात्र नंतर ती झाडे कापली जातात. त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी पेले यांनी मंचावरून करताच राणे तत्काळ उठले आणि त्यांनी ही घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय व्हेल-शार्क दिनानिमित्त पर्यावरण अभ्यास केंद्राने वन्यजीव विश्वस्त मंडळ, वन खाते, मत्स्योद्योग खाते यांच्या संयुक्त विद्यमाने मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्राच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यातील व्हेल-शार्क संरक्षण व संवर्धन मोहिमेचीही सुरुवात करण्यात आली.

यावेळी मंचावर विचार संवाहक अभिनेत्री दिया मिर्झा, विश्वस्त विवेक मेनन, प्रधान शोधकर्ता प्रा. बी. सी. चौधरी, मत्‍स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीणकुमार राघव आणि पर्यावरण शिक्षण केंद्राचे सुजीत डोंगरे उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, जगभरात १०-१२ हजार व्हेल शार्क असावेत. त्यातही पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः गुजरातलगत ते जास्त संख्येने दिसतात. ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना विचारल्यावर त्यांनी व्हेल शार्क पाहिल्याचे सांगितले; पण २५ पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींनी ते पाहिलेले नाहीत.

व्हेल शार्क जाळ्यात सापडला तर त्याला सोडून देणाऱ्या मच्छीमारांना गुजरात सरकार ५० हजार रुपयांची भरपाई देते. व्हेल शार्कच्या यकृतापासून तेल काढतात. ते वंगण म्हणून बोटींसाठी वापरतात, तर कल्ले निर्यात होतात. यातून अडीच लाख रुपये मिळतात. तरीही जागृतीनंतर व्हेल शार्कची शिकार करणे मच्छीमारांनी सोडून दिले आहे.

मोंतेरो म्हणाल्या, व्हेल आणि व्हेल शार्क हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत, हेच बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यातही शार्कच्या केवळ २६ प्रजाती संरक्षित आहेत. सरसकटपणे मासेमारीवर बंदी नाही तर जाळ्यात सापडलेल्या संरक्षित प्रजातीच्या माशांना परत समुद्रात सोडावे, अशी अपेक्षा आहे.

यावेळी वनमंत्र्यांच्या सल्लागार फ्रेजल आरावजो, राघव यांनीही विचार व्यक्त केले. यानंतर व्हेल शार्कच्या प्रतिकृतीसमोर सर्व मान्यवरांनी छायाचित्रे टिपली.

सचिनने मला श्रीमंत बनविले : फ्रान्सिस्को फर्नांडिस उर्फ पेले

फ्रान्सिस फर्नांडिस उर्फ पेले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला. त्यानंतर सारे काही बदलले. सरकारला केलेल्या सूचनाही स्वीकारल्या जाऊ लागल्या. एकदा मासेमारीच्या अनुभवासाठी सचिन तेंडुलकर आले. तेव्हा त्यांच्या पत्नीला मी सांगितले, की तुझा पती मला गरीब करत आहे. अंजलीने मला विचारले, ‘असे कसे?’ मी सांगितले, ‘तेंडुलकरने शतक केले, अर्धशतक केले, एवढेच नव्हे, षटकार ठोकला तरी मी फटके फोडतो. त्यावेळी मला खर्च होत जातो.’

त्यानंतर आम्ही पकडलेले मासे शिजवून जेवण्यासाठी माझ्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. तेथे सचिनने मला सांगितले, की तो मला आता श्रीमंत करणार आहे. मला कसे काय ते समजले नाही. त्याने माझ्यासोबत एक व्हिडिओ तयार केला आणि तो समाज माध्यमांवर शेअर केला. त्यानंतर मला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर माझ्याकडे येण्यासाठी सेलिब्रिटींची मोठी रांगच लागली.

...म्हणून शार्कची शिकार थांबली

मेमन म्हणाले, सुरवातीला व्हेल शार्कला मारू नका, यासाठी मच्छीमारांना समजावणे मोठे कठीण काम होते. मात्र, अध्यात्म कामी आले. मोरारीबापू यांनी त्याला मत्स्यावतार संबोधले आणि एका दिवसात गुजरातमध्ये व्हेल शार्कची शिकार थांबली. पोरबंदरमध्ये तर महात्मा गांधींच्या पुतळ्यासोबत व्हेल शार्कचा ‘मत्स्यावतार’ म्हणून पुतळाही उभारण्यात आला आहे.

लोेकसहभागावर धोरणांचे यश

अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली, ‘वसुधैव कुटुंबकम’ मानणारी आपली संस्कृती आहे. निसर्गाचे जतन आणि संवर्धन हा संस्कृतीचाच भाग आहे. सरकार यासाठी धोरण तयार करते. धोरणे जनतेने स्वीकारली की नाहीत, यावर त्याचे यशापयश ठरते. जनतेचा या सर्वांत सहभाग असणे त्यामुळे तितकेच महत्त्वाचे असते. निसर्गाचा समतोल राखण्यावर मूलतः भर असतो. त्यात संरक्षण व संवर्धन घटक जोडले गेले पाहिजेत. हे सर्वत्र समान सूत्र हवे.

सरकारी धोरणे ही चळवळ व्हावी

मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, की सरकारी धोरणे ही चळवळ झाली पाहिजे. यासाठी धोरणे निश्चित करणाऱ्या समित्यांवर राजकारण्यांऐवजी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ हवेत. राज्यात सागरी वन्यजीव संरक्षणासाठी धोरण ठरवले जाणार आहे. यासाठी गाभा समिती निवडून काम केले जाईल. या समितीवर राजकारणी नव्हेत, तर या विषयातील तज्ज्ञच असतील. युवा पिढीपर्यंत हे विचार पोचवले आणि त्यांनी ते स्वीकारले तरच धोरणे यशस्वी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bits Pilani: 'कुठल्याही विद्यापीठाला, गोव्याला अशा घटना परवडणार नाहीत'! ‘बिट्स’ कॅम्पसचे पैलू; वास्‍तव आणि समस्‍या

Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

New GST Rates: 'गोव्यात अधिक संख्येने पर्यटक येतील', CM सावंतांचे प्रतिपादन; जीएसटीमुळे खाण क्षेत्रालाही लाभ होण्याचा दावा

BITS Pilani: प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल, हैद्राबादहून गोव्यात आला; ‘बिटस पिलानी’तील विद्यार्थ्याच्या मृत्युचे गूढ कायम

Teachers' Day History: भारतात शिक्षक दिनासाठी 5 सप्टेंबरच का निवडला? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाशी जोडलेला 'तो' किस्सा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT