पणजी: राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) संपूर्ण गोव्यात चिकन विक्री केंद्रे आणि रेस्टॉरंट्सवर धडक मोहीम राबवली आहे.
सासष्टी, धारबांदोडा, तिसवाडी, बार्देश आणि केपे या पाच तालुक्यांमध्ये पथकांनी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत दोन हजार किलोहून अधिक चिकन नष्ट करण्यात आले असून, दोन दिवसांत ४१ हून अधिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
काही आस्थापने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली. नोंदणीकृत किंवा परवानाधारक पुरवठादारांकडूनच चिकन खरेदी करावे. रेस्टॉरंट्सनीही योग्य ती दक्षता घ्यावी. अन्यथा, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम २६ अंतर्गत त्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सहा रेस्टॉरंट्सची तपासणी
धारबांदोडा तालुका : या तालुक्यातील सहा रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य प्रमाणपत्रे, कीटक नियंत्रणाच्या नोंदी, पाण्याचे अहवाल किंवा बिले उपलब्ध नसणे तसेच माशांपासून संरक्षणासाठी जाळ्या नसणे अशा त्रुटी आढळल्या. या आस्थापनांना विहित मुदतीत त्रुटी दूर करण्याचे तसेच चिकन पुरवठादारांची बिले आणि आवश्यक नोंदी आस्थापनात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
सासष्टीत १२ रेस्टॉरंट्सवर कारवाई
सासष्टी तालुका : या तालुक्यातील १२ रेस्टॉरंट्स आणि खानावळींची तपासणी करून त्यांना तपासणी अहवाल देण्यात आले. या तपासणीत कर्मचाऱ्यांची स्वच्छता प्रमाणपत्रे नसणे आणि फरशी खडबडीत असणे अशा त्रुटी आढळल्या. तसेच सात चिकन विक्री केंद्रांची तपासणी केली असता, चार केंद्रे विनापरवाना सुरू असल्याचे आढळून आले. त्यांना नोटीस बजावण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आठ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
एसजीपीडीए मार्केट आणि फातोर्डा येथे एफडीएने कारवाई करून सुमारे २०० किलो चिकन जप्त केले. एसजीपीडीए मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेले चिकन सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उन्हात उघड्यावर ठेवण्यात आले होते. फातोर्डा येथील शीतगृहात लेबल नसलेले ५० किलो चिकन आढळले. दोन्ही ठिकाणचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला, अशी माहिती अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी दिली.
बार्देशमधील मोहिमेत ३२० किलो चिकन नष्ट
बार्देश तालुका : नेरूळ येथील सहा चिकन विक्री केंद्रांची तपासणी केली असता, अस्वच्छतेमुळे सर्व सहा केंद्रे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. करासवाडा, थिवी, साळगाव आणि नागोवा येथील सात आस्थापनांपैकी दोन केंद्रे बंद करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ३२० किलो चिकन नष्ट करण्यात आले. स्वच्छतेचे नियम न पाळल्याबद्दल दोन विक्रेत्यांना अनुक्रमे १५ हजार आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शिवोलीतील ‘शीओलीमचिक’ या पुरवठादाराचीही तपासणी करण्यात आली.
त्यांना कोल्हापूर येथील ''रिया फार्म्स''कडून रेस्टॉरंटच्या परवान्याच्या आधारे चिकन पुरवले जात असल्याचे उघड झाले. एफडीएच्या पथकाने पहाटे शिवोली येथे मोठी कारवाई केली. येथे हसन बेपारी यांच्या मालकीचे 'एम्पल फ्रेश चिकन' हे आस्थापन कोणताही एफएसएसएआय परवाना नसताना आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात चिकन प्रक्रिया व वितरण करत असल्याचे आढळून आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने येथील सुमारे १,५०० किलो प्रक्रिया केलेले चिकन नष्ट करण्यात आले. ''रिया फार्म्स''वर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या एफडीए आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
केपेत ५ चिकन विक्री केंद्राची तपासणी
केपे तालुका : कुशावती अन्न सुरक्षा पथकाने १३ रोजी केपे तालुक्यातील पाच चिकन विक्री केंद्रांची तपासणी केली. यापैकी चार केंद्रांकडे वैध एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांना कलम ३१ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. तसेच चार रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका रेस्टॉरंटचे नोंदणी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याने त्याला नोटीस देण्यात आली. सर्व आस्थापनांना पुरवठादारांची बिले नियमितपणे जतन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, तीन जनरल स्टोअर्स आणि एका अन्न विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन आस्थापनांना विनापरवाना व्यवसाय केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली.
तिसवाडीत १० ठिकाणी तपासणी
तिसवाडी तालुका : जुने गोवे, खोर्ली, पणजी, सांताक्रूझ, सांतइनेज आणि ताळगाव येथील एकूण १० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी सहा आस्थापनांना एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करणे आणि स्वच्छतेचे नियम न पाळल्याबद्दल कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. खोर्ली येथील चिकन कापणी व विक्री करणाऱ्या एका केंद्रात अन्न सुरक्षा नियमांच्या अनुसूची ४ चे उल्लंघन होत असल्याचे आढळले. यापूर्वी कामकाज बंद करण्याचे निर्देश देऊनही या केंद्रात विक्रीसाठी ठेवलेले सुमारे २०० किलो चिकन नष्ट करण्यात आले. या केंद्राचे कामकाज तात्काळ निलंबित करून १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.