Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: एप्रिलपासून 'शैक्षणिक वर्ष’ निर्णयावर साधक-बाधक सूर; तज्ञ, शिक्षक, पालकांच्या प्रतिक्रिया काय? वाचा

National Education Policy: नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राज्यात यंदापासून एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाचे साधकबाधक प्रतिसाद उमटत आहेत.

Sameer Panditrao

पणजी: नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राज्यात यंदापासून एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाचे साधकबाधक प्रतिसाद उमटत आहेत. ज्यावेळी शिक्षणासारख्या क्षेत्रात, विद्यार्थ्यांच्या मोठ्या समूहावर या निर्णयाचा प्रभाव होणार असतो. त्यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते, परंतु पहिल्यांदा परिपत्रक काढून निर्णय जाहीर करणे आणि नंतर मुख्याध्यापक तसेच इतरांशी चर्चा करणे म्हणजे शिक्षण संचालनालयाचे वराती मागून घोडे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तर काहीजण या निर्णयाचे स्वागतही करत आहेत.

नववीच्या मुलांचे काय?

आठवीपर्यंतचा मुलांना सरसकट पास करण्याचा निर्णय कायम असल्याने पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना पास करता येईल; परंतु नववीच्या विद्यार्थ्यांचा एप्रिलमध्ये निकाल जाहीर न झाल्याने त्यामुलांना दहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकवावा लागेल. परंतु त्यांपैकी जे विद्यार्थी नापास होतील, त्यांना पुन्हा नववीच्या वर्गात पाठवावे लागेल. या प्रकारामुळे नैराश्‍य येण्याची शक्यता असल्याने संभ्रमावस्था आहे.

‘एनईपी’चे तीनतेरा

एनईपी धोरण नियोजनबद्धरीत्या राबविण्यात शिक्षण संचालनालयाला अपयश येत आहे. अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके आली असली तरी शिक्षण व्यवस्थेत जो बदल दिसायला हवा तो दिसत नाही.

केवळ काही मोजक्याच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षेनंतर मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा वेळ उत्तरपत्रिका तसेच निकाल बनविण्यात जातो, अशावेळी विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याबाबत स्पष्टता नाही.

त्यासोबतच येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीला एनईपी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बैठकीत काय झाले?

आज शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज राज्यातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी इयत्ता दहावीसाठी एनईपी अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल तसेच नवीन शैक्षणिक वर्ष याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगितले जाते.

सहा महिन्‍यांपूर्वी कल्‍पना देणे अत्‍यंत आवश्‍‍यक होते

गेल्या वर्षी इयत्ता तिसरी आणि नववीसाठी ‘एनईपी’ लावल्यामुळे या वर्षी इयत्ता सहावी व दहावीसाठी सुरुवात करणे हे अपेक्षित होते. ज्यामुळे शाळेच्या कामकाजाचे दिवस २०० पेक्षा अधिक होतात. शाळा १ एप्रिलपासून सुरू केल्यामुळे दोन्ही सत्र समान दिवसांची होतात. मुलांचा काही अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होते. जरी मुलांसाठी वर्ग नसले तरी शिक्षकांसाठी एप्रिल महिना हा कामकाजाचा असतो. त्यामुळे शिक्षकांना याचा ताण पडणार नाही. पण, काही तांत्रिक अडचणी बघायला गेल्यास शाळेला कमीत कमी सहा महिने पूर्व कल्पना देणे उचित होते. त्यामुळे शाळेला ह्या नवीन वर्षाचे नियोजन करण्यास, मानसिक तयारी करण्यास वेळ मिळाला असता. अगदी शेवटच्या क्षणी नवीन बदलांचे परिपत्रक काढण्यापूर्वी व्यवस्थापन, मुख्याध्‍यापक, शिक्षक व मुलांना पूर्वकल्पना देऊन जागरूकता करून त्याचे फायदे सांगणे व ते पटवून देणे गरजेचे होते.

काही अडचणी अशा

काही अडचणी अशा की, फक्त एप्रिल महिन्याकरिता शाळेला वेळापत्रक बदलावे लागेल. मार्चमध्ये होण्याऱ्या बोर्डच्या तपासणीसाठी शिक्षक पाठवणे, परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमणे, नववीच्या परीक्षा त्याच बरोबर इयत्ता ५वी ते ८वीची परीक्षा मार्चच्या शेवटी घेऊन ते सर्व पेपर तपासणे या सर्व परीक्षेचा निकाल अल्प वेळात तयार करणे आणि हे सगळे करत असताना १ एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू करणे अशा अनेक समस्या शाळेपुढे आहेत. मार्च महिन्यात दहावी व नववीच्या बोर्ड परीक्षा, त्यानंतर पेपर तपासणी, त्याला लागणार मनुष्यबळ जेव्हा शाळेला बोर्डसाठी पुरवावे लागेल; तेव्हा शाळेच्या कामासाठी किती शिक्षक उरतील हे एक प्रश्नचिन्ह आहे.

बदल मुलांसाठी हितावह, राजू बोंद्रे (मुख्याध्यापक)

पण एक ना एक दिवस हे करणं अपेक्षित होतच आणि सर्वांनी त्याच स्वागत केलच असतं; पण कुठलीही गोष्ट अचानक लादली जाते तेव्हा गोंधळ उडतोच. अशीच काहीतरी अवस्था शाळांची झालेली आहे तरीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जर आम्ही याचा विचार केला तर हा नवीन बदल मुलांच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी थोडी कळ सोसून थोडासा त्रास घेऊन याची अंबलबजावणी केली तर ही संकल्पना या वर्षापासून यशस्वीपणे राबवली जाऊ शकते. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांकडून योग्य नियोजन अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे कमीत कमी शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना राबविण्यासाठी सुयोग्य व पूर्व नियोजन खूप गरजेचे आहे; करण प्रश्न मुलांच्या भवितव्याचा आहे. असो...चला तयारीला लागुया.

ओढाताण होईल; पण अशक्‍य काहीच नाही

एक नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेचा संकल्प, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केला जातो आणि गोवा राज्य हे संपूर्ण भारतातून धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरत असेल तर ती गोष्ट आम्हा शिक्षकांना अभिमानास्पदच आहे. शैक्षणिक वर्षाची एप्रिल महिन्यापासून सुरुवात हा बदल शिक्षण क्षेत्रातल्या घटकांनी मान्य करणे मुळीच अवघड नाही. एरव्‍ही तरी एप्रिल मध्ये सर्व शिक्षक या ना त्या कारणासाठी शाळेच्या कामामध्ये गुंतलेले असतातच. दहावीची परीक्षा,विद्यालयातील इयत्ता नववीपर्यंतच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात सर्व एकाचवेळी आल्याने थोडीशी ओढाताण होईल हे खरंच आहे. परंतु एकदम अशक्य नाही. प्रथम शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून मी नवीन शैक्षणिक धोरणाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मुख्‍याध्‍यापक राघोबा कांबळी यांनी दिली.

दोन महिन्यांची सुटी अभ्यासात व्यत्यय आणणारी

नव्या शैक्षणिक वर्षाचा काळ यंदापासून एप्रिलपासून सुरू करण्यास काही जणांकडून विरोध होत असला तरी माझ्या मते हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी चांगलाच असल्याचे मत केपे येथील आयडियल इज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजीव सुखटणकर यांनी व्यक्त केले.

सुट्टी एका महिन्यावर आणली आणि राहिलेली एका महिन्यांची सुट्टी इतर काळात विभागून दिली तर ही सलगता कायम राहण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

आयडियल इज्युकेशन सोसायटीतर्फे केपे येथे ‘टायनी टोटस्’ ही प्राथमिक आणि होली क्रॉस इन्स्टिट्यूट ही माध्यमिक शाळा चालवली जाते. या नव्या धोरणाविषयी बोलतांना सुखटणकर म्हणाले. नवे शैक्षणिक धोरण हे तज्ज्ञांच्या समितीने आखले आहे. सर्व देशाचा विचार करून ते तयार केले आहे. आगामी वर्षापासून गोव्यात पूर्णवेळ शाळा हे धोरण लागू होणार आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून यंदापासून काही निर्णय घेतल्यास त्याला विरोध करणे चांगले नाही. या नव्या नियमांमुळे शाळा व्यवस्थापनांना सुरुवातीला काही प्रमाणात त्रास होणार, ही जरी गोष्ट खरी असली तरी हा त्रास केवळ एका वर्षासाठीच असेल. पुढे सगळे सुरळीत होईल.

योग्य पाऊल; काटेकोर नियोजनाची जोड द्या

गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यंदा पासून एप्रिल महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो वाखाणण्या जोगा आहे. एक शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार म्हणून माझे स्पष्ट मत आहे, की सरकारचे हे योग्य पाऊल आहे, असे मत माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

पार्सेकर म्हणाले, आमच्या शैक्षणिक संस्थेत आम्ही अशा प्रकारे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून शिकवत आहोत. याचे अनेक फायदेही आहेत, जसे की एप्रिल महिन्यात परीक्षा संपलेल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा महिना वाया जायचा. दुपारी ११.३० वाजेपर्यंत वर्ग भरले जातील. उष्मा आणि इतर समस्या निर्माण होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, परंतु सरकारच्या योग्य निर्णयांची स्तुती करायलाच हवी, जे चांगले आहे, त्याला विरोध करणे योग्य नाही. परंतु शिक्षण संचालनालयाने यांसंबंधी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिकवण्याचे दिवस अधिक मिळणार

यंदापासून नवीन शैक्षणिक वर्ष ‘एप्रिल ते मार्च’असे राहणार आहे, अशा प्रकारचे परिपत्रक माननीय शिक्षण संचालक यांनी काढले आहे. हे परिपत्रक, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दूरगामी विचार करता, खूपच लाभदायक आहे. एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू केल्यामुळे, गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये, २४ शिकवण्याचे दिवस अधिक मिळणार आहेत.

वास्तविक दिपवाळीची सुट्टी संपल्यावर नोव्हेंबर मध्ये १०-११ शिकवण्याचे दिवस मिळतात, तसेच डिसेंबरमध्ये पिकनिक, स्पोटर्स, अ‍ॅन्युअल डे, सोशल गॅदरिंग अँड प्राइज डिस्ट्रिब्युशन, २४ डिसेंबरपासून सुरू होणारी ख्रिसमसची सुट्टी या सगळ्यामुळे प्रत्यक्ष दहा-अकराच शिकवण्याचे दिवस मिळत असत. कॅलेंडरमध्ये दिसायला एक महिना असला तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये अशी स्थिती ही शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी अनुभवली आहे.

आजमितीस एप्रिल महिन्यामध्ये गोव्यातील अनेक हायस्कूलमध्ये दहावीचे वर्ग सुरू होतात जे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा-एकपर्यंत चालतात, असे शिरिष आमशेकर (मुख्याध्यापक, स्वस्तिक विद्यालय, प्रियोळ) यांनी स्पष्ट केले.

उन्हाळ्याचा बाऊ करण्याची गरज नाही

नवीन शैक्षणिक धोरण, हे काही आजचे नाही. मागील काही वर्षांपासून याविषयी चर्चा व तयारी सुरू आहेत. राहिला प्रश्न, काहीजण उन्हाळ्याबाबत बोलतात. परंतु, उन्हाळा हा काही बाहेरील देशाचा आहे का? आपल्याच देशातील उन्हाळा व पावसाळा आहे. मग आपण सहन करणार नाही, तर कोण करणार? इंग्रज स्वतःच्या सोयीसाठी दोन महिने आपल्या कार्यालयांना व शाळांना सुट्ट्या द्यायचे. त्यानंतर आरामात इंग्लंडमध्ये जाऊन ते राहायचे व नंतर पुन्हा माघारी भारतात परतायचे. हा उन्हाळा व पावसाळा आपल्या देशाचा आहे, मग आपण तो सहन करू शकतो. त्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील आहेत. त्याचा एवढा बाऊ करण्याची माझ्या दृष्टीने गरज दिसत नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ कालिदास मराठे यांनी दिली.

या निर्णयाचे परिणाम खालीलप्रमाणे होऊ शकतील

शैक्षणिक वर्ष, २०२५-२६ साठीचे वर्ग शैक्षणिक वर्ष, २०२४-२५ चे वार्षिक निकाल जाहीर केल्याशिवाय सुरू होतील. आता शाळांना एप्रिल महिन्यासाठी प्रत्येक आठवड्याला २१ तासांच्या आत सर्व विषयांसाठी एप्रिल महिन्याचे नवीन वेळापत्रक तयार करावे लागेल.

३५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एप्रिल महिन्यात जे काही शिकवले जाते ते विद्यार्थी पूर्णपणे किंवा अंशतः विसरतील.

जूनमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर, एप्रिल महिन्यात जे काही शिकवले गेले होते ते शिक्षकांना शिकवावे लागेल किंवा त्यात सुधारणा करावी लागेल. त्यापेक्षा दुसऱ्या सत्राच्या परीक्षा दरवर्षी ०५ एप्रिलपासून किंवा त्याहून अधिक काळ घेणे योग्य ठरले असते. परीक्षा सकाळी ११.०० वाजेपर्यंत संपू शकते किंवा सुमारे आठ ते दहा दिवस असू शकते. वार्षिक शाळेचे निकाल २९ एप्रिल किंवा त्यानंतर नेहमीप्रमाणे असू शकतात.

याशिवाय आम्ही आमच्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची सीबीएसई आणि आयसीएसई शाळांशी तुलना करू शकत नाही, हेही लक्षांत घेतले पाहिजे. शैक्षणिक वर्ष संपूर्ण भारतात एकसारखे असले पाहिजे जेणेकरुन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये. हे खरे आहे की केवळ गोव्यातच विद्यार्थ्यांना एप्रिल आणि मे दरम्यान आणि ०४ जूनपर्यंत शैक्षणिक वर्षाच्या विद्यमान रचनेत जवळपास ६५ दिवसांची सुट्टी मिळते. पण, त्याची पुनर्रचना ०५ ते १५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेऊन केली जाऊ शकते. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करावा, जेणेकरून शैक्षणिक वर्षाची सध्याची रचना बदलण्याची गरज नाही.
पांडुरंग नाडकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
नवीन शैक्षणिक वर्षाला एप्रिलपासून आरंभ करण्याचा निर्णय चांगला आहे. सदर निर्णय काहीजणांना आवडणार नाही. तथापि नवीन गोष्टीची सवय झाल्यावर तसेच त्याचे लाभ समजल्यावर सर्व काही सुरळीत होईल.
वीणा दयानंद राणे (वास्को)
सरकारने घेतलेला निर्णय हा नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे पहिले पाऊल आहे. तरी सुद्धा सरकारने सर्व शाळांमध्ये त्या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे का? किंवा सर्व सुविधा उपलब्ध आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे. सरकारला जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत शाळेची वेळ वाढवायची नसेल. त्यामुळे सरकारने एप्रिल महिन्यात वर्ग ठेवले आहेत. त्याचा फायदा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास होईल.
राजीव देसाई, प्राचार्य, श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव.
नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशकता अमलात आणणारे धोरण असून त्यात कुठेच शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासूनच व्हायला पाहिजे, असे कुठेच म्हटलेले नाही. गोवा सरकारला यापूर्वीच शिक्षकांना एप्रिल महिन्यात कामाला जुंपायला हवे होते. कारण त्यांना वाटत होते, की एप्रिल आणि मे असे दोन महिने शिक्षकांना सुट्टी असते. त्यामुळे ते मजा मरतात. त्यांना कसे कामाला जुंपता येईल, यासाठी ते कारणे शोधत होते. नव्‍या निर्णयाने मुलांचा काय फायदा होणार?
विठोबा देसाई, मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT