Goa Drama
Goa Drama Dainik Gomantak
गोवा

Goa Drama : ‘निमणो पेलो’ एक करमणूकप्रधान कलाकृती; उत्स्फूर्त अभिनयाने तारले

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Goa Drama :

एखादे नाटक बघताना तुम्हाला निखळ आनंद मिळत असतो. मात्र नाट्यगृहाबाहेर पडताना आपण नेमके काय पाहिले, हे लक्षात रहात नाही. तरी अशा कलाकृतीही काळाची गरज असतात.

कारण त्यामुळे दोन घटका का होईना, पण तुम्ही आपल्या जीवनातली ‘टेन्शन्स’ विसरू शकतात. श्री सातेरी कला मंच सत्तरी या संस्थेने सादर केलेले ‘निमणो पेलो’ हे नाटक याच सदरात मोडते. जोसेफ केसरलिंग यांच्या ‘आर्सेनिक अँड ओल्ड लेन’ या नाटकाचा कोकणी अनुवाद वसंत सावंत यांनी केला आहे.

वसंत सावंत यांचे या स्पर्धेतील हे तिसरे नाटक. ॲना व मेरी या दोन बहिणी. तर आबेल व मार्टिन्स हे त्यांचे दोन पुतणे. त्यातला आबेल हा मतिमंद असतो.

इमिलीया ही मार्टिन्स ची प्रेयसी. मार्टिन्स हा एका वर्तमानपत्रात तियात्राचे परीक्षण लिहिण्याचे काम करत असतो. सगळे काही सुरळीत सुरू असताना मार्टिन्सला त्यांच्या घरात ठेवलेल्या एका पेटीत एक प्रेत आढळते.

तो हे आपल्या आत्याना सांगतो. ते ऐकून त्या दोघीजणी हसतात आणि अशी आणखी ११ प्रेते त्यांच्या तळघरातील जागेत पुरल्याचा खुलासा करतात. करवंदाच्या ज्यूसमध्ये विष मिसळून त्यांनी त्या लोकांना मारलेले असते, असेही कळते.

आता ती हे कृत्य छंद म्हणून करतात का, मानसिक विकृतीपोटी करतात याचा खुलासा या नाटकात केलेला नाही. पण हे प्रेत पाहून व आत्यांचे स्पष्टीकरण ऐकून मार्टिन्स मात्र हादरतो. त्यात लहानपणी हरवलेल्या मार्टिन्सचा भाऊ ज्युड याची डॉ. होमी भाबा बरोबर एन्ट्री झाल्यामुळे नाटकात अधिकच थरार निर्माण होतो.

ज्युड हाही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो. त्याची डॉक्टर भाबा ने प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे त्याचा चेहरा बदललेला असतो. आणि त्याने खून केलेल्या जावेद नावाच्या माणसाचे प्रेत लपवण्याकरता तो या घरात आलेला असतो. नंतर जो काही मेलोड्रामा होतो, तो या नाटकाचा उत्तरार्ध.

यात आबेलाला मानसोपचार केंद्रात नेणारा अधिकारी आहे, मध्येच रात्री येऊन ड्युटी करणारा तसेच तियात्र लिहिण्यात रस असणारा पोलिस अधिकारी परेरा आहे, पोलिस खात्याचा वरिष्ठ अधिकारी साळगावकर आहे,

एक महिला व एक पुरुष पोलिस कर्मचारी ही आहे, पण असे असूनही काही संदर्भ स्पष्ट होत नाहीत. मुख्य म्हणजे एवढे खून का होतात आणि एवढे खून होऊनही पोलिसांना हे कसे कळत नाही,याचा खुलासा या नाटकात होत नाही.

ज्युडची भूमिका पण योग्य प्रकारे विकसित केलेली नाही. सुरुवातीला हे नाटक एक रहस्यमय कलाकृती वाटते. पण नंतर ते विनोदी वळणावर गेल्यामुळे नाटकात दाखवलेली गुन्हेगारी मागच्या बाकावर पोहोचते.

नाटकाचा शेवटही अनाकलनीय असाच आहे. मानसिक सुधार केंद्राच्या अधिकाऱ्याला त्या दोन बहिणी ॲना व मेरी करवंदाचा ज्यूस पाजून मारतात व खुशीने नाचायला लागतात, हा नाटकाचा शेवट प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण करून जातो.

पण या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ सारखे असलेल्या संहितेला तारले, ते कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाने. यातल्या बहुतेक भूमिका या कॅथलिक आहेत. पण जवळजवळ सर्व कलाकार हिंदू असूनही त्यांनी कॅथलिक व्यक्तींचा ढंग, त्यांची बोलण्याची चालण्याची स्टाईल इत्यादी गोष्टी तंतोतंत सादर केल्या.

खास करून ॲना झालेल्या वेदिका वाळके, मेरी झालेल्या ममता पार्सेकर,ज्युड झालेले अश्र्वेक देसाई , ओबेल झालेले शाबलो गावकर, मार्टिन्स झालेले सौरभ कारखानीस व पेरेरा झालेले गौरीश फडके यांनी उत्स्फूर्त अभिनयाचे प्रात्यक्षिक सादर करून प्रयोगात रंजकता आणली. त्यामुळे प्रयोग कुठेही कंटाळावाणा झाला नाही. देसाई यांनी ज्युडच्या भूमिकेला खलनायकी ढब देऊन वेगळा आयाम दिला.

वाळके यांनी ॲनाच्या चालण्याचा आब शेवटपर्यंत राखला. पारशी होमी भाबाच्या भूमिकेत रोवेश शेलार यांनी धमाल उडवली. इमिलिया झालेल्या आलिशा मिनीजिस त्यांच्या भूमिकेला पूरक अशाच होत्या. मात्र, काही ठिकाणी या नाटकावर तियात्राची छाप दिसत होती हे खरे. वैभव नाईक यांच्या परिपूर्ण दिग्दर्शनामुळेही प्रयोगाची लज्जत वाढली.

ज्युडो व होमी भाबा यांनी मार्टिन्सला बांधणे व त्याच वेळी पेरेराचे येणे, इमिलीयाने प्रेत ठेवलेल्या पेटीवर बसल्यावर मार्टिन्सने तिला घाईने आपल्याकडे ओढणे, एक प्रेत नेल्यावर खिडकीतून ज्युडने दुसरे प्रेत आणणे, मार्टिन्स होमी भाबाला तियात्रा बद्दल सांगताना तसेच त्याच्याबाबतही घडणे, आदी प्रसंग कुशलतेने सादर करून त्यांनी दिग्दर्शनातील कल्पकता दाखवली.

महादेव बोंडेकर यांच्या सुविहित नेपथ्याची नाटकाला साथ लाभली. सुबक नेपथ्यामुळे दिग्दर्शकांना सर्व अँगलने प्रसंग घेता आले. वैभव नाईक यांचीच प्रकाश योजना असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा झाला.

सचिन चौगुले यांच्या पार्श्वसंगीतामुळेही नाटकाचा परिणाम वाढू शकला. एकंदरीत निमणो पेलो नाटकाने लोकांचे चार घटका निर्भेळ मनोरंजन केले.

स्पर्धेची रंगत वाढली

आता कोकणी नाट्य स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असून त्यात आता रंग भरत चालले आहेत. काही नाटकांनी अनपेक्षित पणे मुसंडी मारल्यामुळे तर काही प्रथितयश संस्था ढेपाळल्यामुळे स्पर्धेतील समीकरणे बदलायला लागली आहेत. त्यामुळे दर नाटकागणिक स्पर्धेतील रंग बदलताना दिसत आहेत.

ध्वनी संकलनातील त्रुटी

कला अकादमीच्या या कोकणी नाट्य स्पर्धे मुळे राजीव गांधी कला मंदिर च्या ध्वनि संकलनातील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. निकृष्ठ ध्वनी योजनेमुळे प्रेक्षकांना संवाद कळणे कठीण जात आहे.

मागच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांना तर याचा जास्त प्रत्यय येत आहे. प्रस्तुत ‘निमणो पेलो’ नाटकात तर बहुतेक संवाद कॅथलिक ढंगाचे असल्यामुळे ध्वनी योजनेच्या कमीमुळे संवादाचे रसग्रहण करणे प्रेक्षकांना कठीण जात असल्याचे दिसत होते. त्यामुळे रंगत चाललेल्या प्रयोगाची मजा किरकिरी होत होती एवढे खरे.

गर्दी वाढतेय

दैनिक ‘गोमन्तक’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या स्पर्धेच्या नाट्य परीक्षणात नाटकांना कमी होणाऱ्या गर्दीचा सातत्याने उल्लेख होत असल्यामुळे तो एक चर्चेचा विषय बनला आहे.

आजच्या नाटकाला चांगली गर्दी झाल्यामुळे एका ज्येष्ठ रंगकर्मीने तर चक्क ‘आहे की नाही आज नाटकाला चांगली गर्दी’ असा प्रश्न विचारला.

आता स्पर्धा समाप्तीच्या मार्गावर असल्यामुळे आतापर्यंत स्पर्धेत सादर झालेल्या नाटकातील कलाकार व तंत्रज्ञ नाटकांना यायला लागल्यामुळे गर्दी वाढू लागली आहे, काही का असेना पण नाटकांना गर्दी वाढू लागली, हे स्पर्धेच्या दृष्टीने शुभचिन्ह आहे हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT