Goa Drama
Goa Drama  Dainik Gomantak
गोवा

Goa Drama : सर्जनशीलतेचे सजग प्रात्यक्षिक : ‘फेरयेंतलो खेळ’; सांघिक अभिनयाचा परिपूर्ण अविष्कार

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

भांगराळ गोंय अस्मिताय, मडगांव या संस्थेने ‘फेरयेंतलो खेळ’ या डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी लिहिलेले नाटक सादर करून कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेतील नववे पुष्प गोवले.

विजय तेंडूलकर यांच्या ‘भाऊ मुरारराव’ या मराठी नाटकाच्या मध्यवर्ती कल्पनेची प्रेरणा घेऊन डॉ. च्यारी यांनी हे नाटक लिहिले आहे. या नाटकाचे रंगतदार सादरीकरण झाल्यामुळे नाट्यस्पर्धेची लज्जत वाढली आहे.

साधारण राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या या नाटकाला तसे बरेच कंगोरे आहेत. डॉ. च्यारी यांनी या विविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. डॉ. च्यारी हे कोंकणी नाट्यक्षेत्रातील एक सिद्धहस्त लेखक. त्यांनी तसेच ते प्रणेते असलेल्या भांगराळ गोंय अस्मिताय या संस्थेने कोकणी नाट्यक्षेत्रात असा ठसा उमटविला आहे.

गोव्यातील हौशी रंगभूमीला प्रोत्साहन देण्याकरिता घेतली जाणारी या संस्थेची कोकणी नाट्य स्पर्धा हे याचे एक आगळे वेगळे उदाहरण. ते तसेच या नाटकाची प्रकाश योजना करणारे आनंद मासूर यांच्यामुळे नाटकाबद्दलच्या अपेक्षा बऱ्याच वाढल्या होत्या.

वास्तविक मासूर हे एक कल्पक दिग्दर्शक. पण या नाटकात त्यांनी प्रकाशयोजना करून काहीशी दुय्यम भूमिका घेतल्याचे दिसून आले. पण प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा सुयोग्य सादरीकरणामुळे बऱ्याच अंशी पूर्ण झाल्या, असे म्हणावे लागेल. हे नाटक राजकारणाभोवती फिरत असल्यामुळे तो एक संवेदनशील विषय ठरू शकतो.

नाटकाची सुरुवात होते, ती ‘फेरयेंतल्या’ म्हणजे जत्रेतल्या खेळापासून. जत्रेत त्या ‘संचाला’ एका राजकीय नेत्याच्या आदेशाप्रमाणे नगरपालिका स्टॉल घालू देत नसल्यामुळे ते ‘खेळ’ करून आपल्या भावना प्रकट करण्याचे ठरवितात. आणि या खेळातूनच विविध कंगोरे उलगडत जातात. त्यात मग एक मंत्री येतो.

या मंत्र्याला बाबू दोरेकर यांनी आपली किडनी दिलेली असते. त्यांची मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे पैसे मिळविण्याकरिता तो आपली किडनी मंत्र्याला विकतो. पण त्याचबरोबर मंत्र्याच्या माणसाकडून मंत्र्याला किडनी कोणी दिली, हे न सांगण्याचे वचन घेतो. एवढे होऊनही त्याची मुलगी दगावते.

जेव्हा मंत्री आजारातून बरा होतो, तेव्हा त्याला किडनी दिलेल्या डोनरला भेटावे वाटते. पण नाव माहीत नसल्यामुळे तो त्या माणसाला भेटण्याचे माध्यमाद्वारे आवाहन करतो, आणि ते आवाहन बघून अनेकजण आपणच डोनर असल्याचे सांगत मंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतात. यात मंत्र्याचा माणूसही वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करतो.

आणि तो बाबुरावकडे कमिशन मागतो. पण शेवटी बाबुराव मंत्र्यांची भेट घेण्यात यशस्वी होतो. पण तेव्हाही मंत्र्याला तोच आपला डोनर असल्याचे कळत नाही. पण शेवटी मंत्र्याचा माणूस बाबुराव हाच त्यांचा डोनर असल्याचे सांगतो, ते आपल्या माणसाला बाबुरावाला आणायला पाठवतात आणि नंतर काय होते, हाच या नाटकाचा शेवट.

यात मंत्र्याचा मावस भाऊ असलेल्या माणसाला आपल्या मुलाला नोकरी मिळविण्याकरिता मंत्र्याला कसे पैसे द्यावे लागतात. हे तसेच विधानसभेत ओरडणारा विरोधी पक्ष नेता आणि मंत्री यांचे आतून कसे साठेलोटे असते, हे दाखवून लेखकाने सध्याच्या भ्रष्ट राजकारणावर प्रकाश टाकला आहे. खरेतर ‘भाऊ मुरारराव’ हे विजय तेंडूलकर यांचे नाटक त्या काळात तेवढे गाजले नव्हते. तेंडुलकर हे एक ‘जहाल’ नाटककार म्हणून ओळखले जातात.

वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर सारख्या व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या नाटककारांच्या काळात तेंडूलकरांचे एक वेगळे स्थान होते. घाशिराम कोतवाल, बेबी, सखाराम बाईडंरसारख्या त्यांच्या नाटकांनी त्यावेळी रसिकांच्या मनात एक आगळेच स्थान निर्माण केले होते. त्यामानाने भाऊ मुरारराव हे नाटक बरेच कमी पडले होते.

अर्थात प्रस्तुत ‘फेरयेंतलो खेळ’ हे नाटक भाऊ मुराररावाची नक्कल म्हणता येत नसल्यामुळे ती एक वेगळीच संहिता ठरते. पण तरीही राजकारणासारख्या विषयाला स्पर्श करताना विविध छटांना हात घालावे लागतात. ते घालण्यात ही संहिता थोडी कमी पडल्याचे जाणवले. असे असले तरी वेधक दिग्दर्शनामुळे संहितेतल्या त्रुटी कमी झाल्या.

अवधूत सहकारी यांच्या दिग्दर्शनामुळे नाटकाची रंगत वाढली. शेवटी मंत्र्याच्या माणसाला मारत असताना मंत्र्यावर प्रकाशझोत टाकून त्यांनी विचाराला खाद्य देणारा शेवट केला. लक्षात राहिले ते बाबू झालेले केदार सावंत. त्यांनी सध्याच्या व्यवस्थापनाविरूध्दची चीड समर्थपणे प्रकट केली.

‘चली’ झालेल्या मानसी केरकर यांनी भूमिका प्रभावीपणे सादर केली. मंत्री झालेले खगेंद्र हेगडे देसाई हे त्यामानाने थोडे कमी पडले. आनंद मासूर यांची प्रकाशयोजना त्यांच्या लौकिकाला साजेशीच होती. मोर्य आणि किशन यांचे संगीतही उत्तम. वस्तुनिष्ठ संवादांनी नाटकाची मजा अधिक वाढविली. गोविंद भिसे यांचे नेपथ्य प्रयोगाला शोभेल असे होते.

अधिकत्तम नाटके दोन तासांची

कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेच्या नियमाप्रमाणे नाटक सादर करण्याची वेळमर्यादा ही दोन ते तीन तासापर्यंत असणे आवश्‍यक आहे. पण आतापर्यंतची बहुतेक नाटके ही दोन तासांतच गुंडाळली गेल्याचे दिसून आले. दि.३ मार्च रोजी झालेल्या ‘तो आनी दोन पिशें’चा अपवाद वगळता बहुतेक नाटके ही दोन तासांतच सादर झाल्याचे दिसले.

पण काही विषय व्यापक असल्यामुळे त्याचे दोन तासात आकलन होणे कठीण झाले. प्रस्तुत नाटक याच श्रेणीत बसते. राजकारण हा विषय तसा बराच मोठा असल्यामुळे त्याच्या सर्व विभागांना स्पर्श करायला हवा होता. त्यामुळे संहितेची मर्यादा वाढवणे आवश्‍यक होते.पण दिग्दर्शन आणि अभिनय यांचा योग्य मिलाफ झाल्यामुळे ही कमी विशेष जाणवली नाही, हे ही तेवढेच खरे.

गर्दी अजूनही दूरच

कोंकणी नाट्यस्पर्धा आता रंगात यायला लागली असली तरी पण या स्पर्धेला लागलेले कमी प्रेक्षकांचे ग्रहण काही सुटत नाही. भांगराळ गोंय अस्मिताय सारखी मोठी संस्था रिंगणात असल्यामुळे कलामंदिर खचाखच भरेल, अशी अपेक्षा होती.

पण आजही बऱ्याच खुर्च्या प्रेक्षकांची वाट बघताना दिसत होत्या. त्यामुळे एकीकडे रंगतदार होत चाललेली स्पर्धा तर दुसरीकडे रसिकांचा अल्प प्रतिसाद, असा विरोधाभास सध्या या स्पर्धेनिमित्त बघायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT