प्रदेशाध्यक्षांचे छायाचित्र लागणार कधी?
काँग्रेस भवनातील प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या पाठीमागील भिंतीवर फ्लेक्स लावलेला आहे. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेते व राज्यातील आमदार, खासदारांचे छायाचित्र आहे; परंतु प्रदेशाध्यक्ष चोडणकरांचे छायाचित्र काही नजरेस पडत नाही. प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर तो फ्लेक्स बदलला नाही. मात्र, माजी प्रदेशाध्यक्षांच्या जागेवर पक्षाचे चिन्ह चिकटवले आहे. ही बाब काँग्रेसच्या कार्यालयात येणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही माहीत आहे. चोडणकर हे त्या ठिकाणी आपले छायाचित्र कधी लावायला सांगतात की नव्याने फलक तयार करायला लावतात, याची काही कार्यकर्ते वाट पाहत आहेत, अशी चर्चा आहे. कदाचित ही ‘खरी कुजबुज’ प्रसिद्ध झाल्यानंतर त्याठिकाणी फलक बदलला जाऊ शकतो. पाहूया, काय होते ते!
एल्विस नेमक्या कोणत्या बाजूला?
कुंकळ्ळी मतदारसंघातून लोकांचा उमेदवार म्हणून नाव पुढे काढले गेलेले एल्विस गोम्स हे नक्की कोणत्या बाजूला? हा प्रश्न लोकांना सध्या पडला आहे. एका बाजूने ते स्वतः आपण लोकांचा उमेदवार म्हणतात तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस उमेदवारीवरही दावा करतात. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे, तेच कळत नाही. यदाकदाचित ते कुंकळ्ळीतून जिंकून आले तर कोणाबरोबर असतील? सगळेच बुचकळ्यात टाकणारे आहे बुवा!
मेणबत्ती हातात, सिगारेट ओठात!
लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ संवेदनशीलतेचा आव आणत आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकाजवळ मेणबत्त्या पेटवण्यासाठी जमलेल्या काही तरुणांचा खरा चेहरा मात्र काही क्षणांतच उघडा पडला. हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उभारलेल्या स्मारकावरच निर्धास्तपणे सिगारेटचे झुरके मारताना ते दिसले. देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा सन्मान करण्याची साधी शिष्टाचाराची जाणीवही नसताना सामाजिक भान, पर्यावरण आणि लोकशाहीच्या मूल्यांवर भाषणे देण्याचा हा दुटप्पीपणा किती बोलका आहे! आंदोलनाचा उत्साह आणि सोशल मीडियावरील छायाचित्रांची हौस यापलीकडे मूल्यांची जपणूक नसल्यास अशा मेणबत्त्या केवळ दिखाव्याचा उजेड देतात; पण कृतीतून मात्र संवेदनशीलतेचा अंधारच अधिक गडद होत असल्याचे हे चित्र सांगून जाते.
राधारावांचे आणखी एक भाकित
राधाराव ग्रासियस यांनी जरी काँग्रेस पक्षाशी आपला कुठला संबंध नाही, असे जरी म्हटले तरी काँग्रेस पक्षात जे काय चालू आहे त्याची इत्थंभूत माहिती त्यांना असावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याबाबत तर त्यांना अधिकच ममत्व असावे. कारण त्यांच्याबाबत ते नेहमीच काही ना काही बोलत असतात. आता एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गिरीश कुंभारजुवेहून निवडणूक लढवू पाहात आहेत, असा गौप्यस्फोट राधाराव यांनी केला आहे. राधाराव यांनी काँग्रेसमध्ये गिरीशच्या मागे आपले हेर तर सोडले नाहीत ना?
अन् काळीज हेलावले!
मंत्री बाबूश मोन्सेरात... राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व. राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहत, अपयश पचवत या नेत्याने अनेकदा यशाला गवसणी घातली. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर त्याचे दु:ख मात्र कधीही दिसले नाही. हेच बाबूश वैयक्तिक आयुष्यात किती संवेदनशील आहेत, हे दर आठवड्याच्या जनता दरबारात जाणारे लोक पाहतच असतात. पण, पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या मृत्यूनंतर आणि सोमवारच्या अंत्यविधीवेळी रडणारे बाबूश जनतेने कदाचित पहिल्यांदाच पाहिले असतील. त्यांचा तो रडका, अस्वस्थ चेहरा बघून बघणाऱ्यांचे काळीजही हेलावल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.
‘आयडी’तील गैरसोयी!
फोंड्यात तशा अनेक समस्या आहेत; पण सध्या ‘आयडी’ उपजिल्हा इस्पितळातील गैरसोयी ‘हायलाईट’ होत आहेत. या इस्पितळात अनेक गैरसोयी आहेत; पण त्या काही अजून दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ‘आयडी’तील या गैरसोयींचा फायदा राजकीय क्षेत्राला किती लाभदायक आहे, याचा लेखालेखा मांडला जात असून विरोधक नेमक्या याच गोष्टीचा फायदा उठवत आहेत. मागच्या काळात काँग्रेसचे राजेश वेरेकर त्यानंतर ‘आप’चे गीतेश नाईक यांनी आपापल्या कुवतीनुसार आवाज उठवला. आता त्यात भर म्हणून की काय सत्ताधारी भाजपचे अपूरबाब यांनीही इस्पितळाचा फेरफटका मारला. यापुढे कोण-कोण पुढे सरणार आहेत देवास ठाऊक. आवाज उठवणारे तसे अनेक आहेत हो, पण ऐकून घेणारा पाहिजे ना!
नक्की घडले काय?
पाटो परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यातील एका सरकारी कार्यालयाच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये शुक्रवारी जो गोंधळ झाला, त्याची चर्चा मात्र पाटोपासून दोनापावलापर्यंत सुरू झाली आहे. याचे कारण, आयुक्तांची पत्नी ऐनवेळी कार्यालयात आली आणि त्यांनी जे काही पाहिले त्यावरूनच गोंधळ झाला. विशेष बाब म्हणजे याची चर्चा सोमवारी मांडवी नदीपार सचिवालयापर्यंत गेली असल्याची माहिती समोर आली आहे. याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कारनामे सतत चर्चेत येतात, असे आता खासगीत बोलले जात आहे.
पेडणे उपअधीक्षक जबाबदार!
पेडणे येथून निघालेले एक सरकारी पत्र मांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचायला तब्बल चार दिवस लागले, अशी माहिती आहे. एवढ्या छोट्याशा अंतरासाठी पत्राने पायी प्रवास केला होता की, मध्येच कुठे सुट्टी साजरी केली होती, अशी मिश्कील चर्चा आता रंगू लागली आहे. वकिलावर हल्ल्याची घटना घडली आणि न्यायालयानेही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्याने या चार दिवसांच्या विलंबाकडे सगळ्यांचेच लक्ष गेले आहे. आता हा उशीर नेमका कोणामुळे झाला? पोलिस उपअधीक्षक, कार्यालयीन यंत्रणा की आणखी कोणी? याचा हिशोब न्यायालय मागत आहे. ‘जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल,’ असा न्यायालयाचा स्पष्ट सूर आहे. त्यामुळे आता लोकांनीही आपापले निष्कर्ष काढायला सुरवात केली आहे आणि लोक म्हणतात की, पोलिस उपअधीक्षकच जबाबदार आहेत. आता हे खरे की खोटे न्यायालयाचा येणारा निर्णय ठरवेल.
‘ऑनलाईन अपॉइंटमेंट’ वृद्धांना मारक!
गोव्यासह शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) टोकन पद्धत प्रशासनाने पूर्णपणे बंद केली आहे. इस्पितळात उपचारांसाठी येताना रुग्णांना यापुढे ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. जे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणार नाहीत, अशांना संबंधित ‘ओपीडी’च्या काउंटरवर जावे लागून पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. या पद्धतीमुळे आपल्याला हव्या त्या ‘ओपीडी’मध्ये आपल्या वेळेनुसार रुग्णांना उपचार मिळणार असल्याने सुशिक्षित रुग्णांमध्ये समाधान पसरले आहे. परंतु ग्रामीण भागांतील जे रुग्ण उपचारांसाठी येतात, त्यांच्यासाठी मात्र ही पद्धत डोकेदुखी ठरणार आहे. घरात कुणीही नसलेल्या वृद्धांना या पद्धतीचा मोठा फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आणि बातमी आली!
रविवारी रात्री फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अर्जेंटिना विरुद्ध स्पेन हा अंतिम सामना होता आणि तो पहाटे संपणार होता. हे सर्व गृहीत धरून ताळगावातील फुटबॉलप्रेमींनी नियोजनही केले होते. त्यासाठी ताळगावचा मल्टिपर्पज हॉलही बुक करण्यात आला होता. ‘एलईडी’ स्क्रिनही लावली जाणार होती, त्याचबरोबर जेवण-खाणही होतेच. हे सर्व नियोजन अंतिम सामना कोणामध्ये होणार आहे, तेव्हापासून सुरू होते; परंतु रविवारी दुपारी आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे ताळगावातील वातावरण सुन्न झाले. नियोजन करणाऱ्यांना मोठ्या स्क्रिनवर सामना पाहता येणार नाही, याचे दुःख नव्हते, तर आपल्या घरातील कोणीतरी गेले याचे दुःख होते. काहींनी जवळच्या मित्रांकडे या दुःखाला वाट करून दिली.
पण जबाब कुठे गेले?
मोरजी येथे वकिलावर झालेल्या हल्ल्यावेळी पाडकामासाठी अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनीच त्यावेळी पोलिस घटनास्थळी नसल्याचे सांगितल्यामुळे आता गावोगावी वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. मग प्रत्यक्ष डोळ्यांनी घटना पाहणारे ते सरकारी अधिकारी नेमके कोण होते आणि त्यांचे जबाब नोंदवले गेले की नाही, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. काहींचे म्हणणे तर असे की, ‘ज्यांचे जबाब घ्यायचे, तेच कोण होते, हेच समजले नसेल तर जबाब नोंदवणार कसे?’ अर्थात, ही लोकांमधील चर्चा आहे; पण या चर्चेतील सत्य शोधण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. आता या संपूर्ण प्रकरणात ‘सीसीटीव्ही’ फुटेजच खरी साक्ष देऊ शकते, असेही बोलले जात आहे. मात्र, ते फुटेज पोलिसांच्या हाती लागले का? हा प्रश्न चर्चेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.