Goa Carnival : कार्निव्हल महोत्सवाची सुरूवात यंदा पहिल्यांदाच राजधानी पणजीतून न होता पर्वरीतून ‘कर्टन रेझर’ने झाली. आज राजधानी पणजी कार्निव्हल महोत्सवाची धूम असणार असून दुपारी 3 वा. पाटो नव्या पुलाजवळ कार्निव्हल मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. पणजी महानगरपालिका तसेच कार्निव्हल आयोजकांद्वारे शहरात कार्निव्हल तयारी युद्ध पातळीवर सुरू असून ती अंतिम टप्यात आहे. कार्निव्हलच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
कार्निव्हल मिरवणूक रस्त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कार्निव्हलसाठी पणजीनगरी सजली आहे. विविध प्रकारच्या रंगीत पताका, आकर्षक मुखवटे , विद्युत रोषणाई आदींनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आदिलशहा पॅलेससमोर मंचाची उभारणी करण्यात आली असून कार्निव्हल मिरवणुकीतील किंग मोमो अर्थात रुझेल डिसोझा यांचा रथ देखील मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला आहे.
देशी-विदेशी पर्यटक दाखल
कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक देखील हजेरी लावत असतात. कार्निव्हलनिमित्त पणजी शहरात पर्यटकांची रेलचेल असून विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या अधिक आहे.
खा, प्या, मजा करा, असा संदेश देणाऱ्या किंग मोमोच्या राजवटीत सध्यस्थितीत सामाजिक,राजकीय संदेश देणारे चित्ररथ पाहण्यासाठी लोक येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
पणजीत तयारी जोरात !
मनपा कर्मचाऱ्यांनी कार्निव्हल मिरवणुकीसाठी कंबर कसली आहे. मिरवणुकीच्या मार्गाची सफाई करतानाच रस्त्यालगत पडलेला प्लास्टीक कचरा हटवण्याचे काम तसेच किरकोळ डागडुजी सुरू आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय कार्निव्हल होत असल्याने नागरिकांमध्ये तसेच महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या कलाकारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.