Goa Carnival Float Parade Traffic Arrangements
पणजी: कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक येत्या १ मार्च रोजी पणजीत होणार असून, यासाठी व्यापक वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सांतामोनिका जेटीपासून चित्ररथांची रांग लावली जाणार असून, दुपारी ३ वाजता चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होईल. वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी पोलिस विभागाने वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
शहरातील वाहतूक मार्ग बदलण्यात आले आहेत. वाहतूक पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजल्यापासून दिवजा सर्कल ते रायबंदर-मेरशे बायपास जंक्शन दरम्यानचा रस्ता सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद राहील.
दुपारी २ वाजल्यापासून चित्ररथ सांतामोनिका जेटी ते जुना सचिवालय मार्गे मिरवणुकीच्या सुरवातीच्या ठिकाणी जातील. चित्ररथ मिरवणूक कला अकादमी, कांपाल येथे संपेल आणि नंतर चित्ररथ डी.बी.बी. मार्गावरील फुटबॉल ग्राउंडवर उभे केले जातील. केटीसी सर्कलवरून दिवजा सर्कलकडे येणाऱ्या चित्ररथांना मेरशे बायपास मार्गे रायबंदर कॉजवेच्या दिशेने वळविण्यात येईल.
येणाऱ्या वाहनांसाठी असा असेल मार्ग
पणजीत येणाऱ्या वाहनांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सामान्य वाहने पाटो ब्रिज - दिवजा सर्कल – एमएलसीपी पार्किंग मार्गे शहरात प्रवेश करू शकतील. बंबोळी बाजूने येणारी वाहने मळा ब्रिज – फोर पिलर जंक्शन – भाटले मार्गे पणजीत प्रवेश करू शकतील. परेड सुरू झाल्यानंतर शहरात बस वाहतूक बंद राहील. रायबंदरहून पणजीत येणारी वाहने मेरशे अंडरपास – एनएच-४ ए मार्गे पणजीत वळवली जातील.
जाणाऱ्या वाहनांसाठी असा असेल मार्ग
पणजीतून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मिरामार बाजूकडील वाहने कांपाल – कला अकादमी – फायर ब्रिगेड जंक्शन – सांतइनेज जंक्शन – काकुलो आयलंड – १८ जून रोड – चर्च स्क्वेअर – जुना पाटो ब्रिज किंवा मळा ब्रिज मार्गे बाहेर जाऊ शकतील. रूआ-दि-अरोमाहून येणाऱ्या वाहनांना हॉटेल सोना येथे डावीकडे वळण्यास मनाई असेल. त्याऐवजी ही वाहने काजू दरबारकडे वळवली जातील. सांतइनेज, ताळगाव, मिरामार, दोनापावलकडे जाणाऱ्या नागरिकांनी मळा-भाटले किंवा गोवा विद्यापीठ मार्गाचा वापर करावा. या नियोजनामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित राहील आणि नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिस अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत मोठ्या आणि व्यावसायिक वाहनांना शहरात प्रवेश बंद असेल. सायंकाळी २ नंतर दोनापावलकडून येणाऱ्या सर्व पर्यटन बसेस आणि व्यावसायिक वाहनांना मिरामार सर्कलच्या पलीकडे जाण्यास मनाई असेल. उत्तर गोव्यातून येणारी वाहने ईडीसी प्लाझा, एमएलसीपी आणि केटीसी बसस्थानक परिसरात पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर दक्षिण गोव्यातून येणारी वाहने जीएमसी – गोवा विद्यापीठ – एनआयओ सर्कल – मिरामार मार्गे कांपाल परेड ग्राउंड येथे पार्क करता येईल.
जोसे फाल्काओ रोड, जोआओ कास्त्रो रोड, मॅच कॉर्नर ते कासा इंटरनॅशनल (एम.जी. रोड), काकुलो आयलंड ते सांतइनेज जंक्शन, चर्च स्क्वेअर ते कोर्टिन फूट ब्रिज येथे नो-पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. ''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.