पणजी: भाजपच्या प्रभारी डॉ. भारती पवार आणि सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी दिवसभर विविध मोर्चांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि गाभा समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत, येत्या विधानसभा निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी सुरू केल्याची घोषणा केली.
विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. प्रदेश भाजपने गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली होती, परंतु केंद्रीय नेतृत्वाने गोव्यासाठी प्रभारी आणि संघटनमंत्र्यांची नेमणूक केलेली नव्हती. त्यामुळे काही गोष्टींबाबतच्या चर्चा पुढे सरकत नव्हत्या. अखेर काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाने गोव्यासाठी प्रभारी म्हणून डॉ. भारती पवार आणि सहसंघटनमंत्री म्हणून शिवप्रकाश यांची नेमणूक केली.
हे दोन्ही नेते रविवारी रात्री गोव्यात दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी दिवसभर त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात विविध मोर्चांचे अध्यक्ष, बूथ समित्यांचे अध्यक्ष तसेच गाभा समितीशी बैठका घेऊन संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकून राज्यात सलग चौथ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करण्याचा चंग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. त्यादृष्टीने पुढील तीन महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षाला प्रत्येक घटकापर्यंत नेण्याचा निर्धार सोमवारच्या दिवसभराच्या बैठकांत करण्यात आला, अशी माहिती भाजप सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
७ ऑक्टोबरला ‘सेवा ज्योती यात्रा’
भाजपतर्फे येत्या ७ ऑक्टोबर रोजी देशभरातील ७५० जिल्ह्यांमध्ये सेवा ज्योती यात्रा काढण्यात येणार आहे. शिवाय त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताचा संकल्प पुन्हा एकदा सोडला जाणार आहे. गोव्यातील तिन्ही जिल्ह्यांत हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
सेवा ज्योती यात्रा उत्तर गोव्यातील म्हापसा येथे हनुमान नाट्यगृह, दक्षिण गोव्यात चिखली आणि कुशावती जिल्ह्यात केपे मार्केट येथे होईल. उत्तर गोव्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, दक्षिण गोव्यातील कार्यक्रमात सहप्रभारी अनिल अँटनी, तर केपे येथील मुख्य कार्यक्रमात आपण आणि प्रभारी डॉ. भारती पवार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाआधी भाजप युवा मोर्चातर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यानंतर भाजपाध्यक्ष नितीन नबीन देशवासीयांना संबोधित करतील. त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने विकसित भारतावर भाष्य करतील, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.