Mayem Lake एकेकाळी जगाच्या नकाशावर गोव्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या मये तलावाला पर्यटकांच्या घटत्या संख्येमुळे अपेक्षित बहर मिळाला नाही. हे स्थळ पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी दूरदृष्टीने विकास साधण्याची गरज आहे.
माजी आमदार अनंत शेट, प्रवीण झांट्ये व विद्यमान आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नानंतरही शासनस्तरावर पाठबळ मिळत नसल्याने या तलावाचा म्हणावा तसा विकास झालाच नाही.
एकेकाळी म्हणजे सुमारे 30-35 वर्षांपूर्वी मये तलाव एक अग्रेसर पर्यटनस्थळ म्हणून भरभराटीस आले होते. तथापि, काही वर्षांनंतर साधनसुविधांच्या कमतरतेमुळे पर्यटकांची संख्या कमी होत गेली. परिणामी मये गावातील पर्यटन व्यवसाय कमी होऊ लागला.
माजी आमदार अनंत शेट यांनी त्यांच्या २०१२-१७ या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव नूतनीकरणाचे काम हाती घेतले.
त्याअंतर्गत तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करून प्रवेशद्वार तलावाच्या उजव्या बाजूला हलविण्यात आले. मात्र, नंतर त्यांचा कार्यकाळ संपल्याने पुढे हे काम रखडले. पर्यटकांच्या कमी संख्येमुळे हा प्रकल्पही तसाच राहिला.
मये तलावाबाहेरील रस्त्याच्या कडेला दुकानदार आजही व्यवसाय करतात. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यटक बसेस मये तलावाकडे वळविण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. पण नंतर तोही प्रयत्न फसला.
व्यावसायिकांना दिली 36 दुकाने बांधून
अनंत शेट यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रवीण झांट्ये यांनी सूत्रे हाती घेऊन मये तलावाचा विकास सुरू ठेवला. त्यांनी तलावाच्या प्रवेशद्वारासमोर स्थानिक दुकानदारांना गाळे बांधण्याची योजना आखली. या प्रकल्पाचे लोकार्पणही करण्याचे ठरले होते.
मात्र, पार्किंग व्यवस्थेला धक्का न लावता कायमस्वरूपी दुकाने बांधून देण्याची मागणी करत या प्रकल्पास स्थानिकांनी आक्षेप घेतला. अखेर मये तलावाच्या प्रवेशद्वारासमोरील अतिरिक्त जागा घेऊन दुकानदारांना सुमारे ३६ दुकाने बांधून देण्यात आली.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये तलावाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालविले आहेत. सध्या दुकानदारांना दुकान देण्याचे कोणतेही नियोजन नाही. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर दुकानांचे वाटप केले जाईल. - सुवर्णा चोडणकर, सरपंच (मये)
मये तलाव प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून पुढे आणण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यासाठी आमदार व स्थानिकांना पाठिंबा देणे हे पर्यटन खात्याचे कर्तव्य आहे. सध्या पर्यटकांची संख्या खूपच रोडावली असल्याने दुकानदार चिंतेत आहेत. - दीपक किनळकर, मये
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.