Curlies Restaurant Sealed: गोव्यातील हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध आणि तितकेच वादग्रस्त ठरलेले 'कर्लिस' रेस्टॉरंट आणि बार प्रशासनाकडून अखेर सील करण्यात आले. हणजूण पोलीस, सीआरझेड प्राधिकरण, तलाठी, मामलेदार आणि वीज विभाग यांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. किनारपट्टीवरील बेकायदेशीर बांधकामे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात सरकारने सुरु केलेल्या मोहिमेचा हा एक भाग आहे.
हणजूण (Anjuna) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विविध सरकारी विभागांच्या समन्वयाने करण्यात आली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका या रेस्टॉरंटवर आधीपासूनच होता. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने या बांधकामाच्या पाडकामावर काही अटींसह स्थगिती दिली होती, मात्र आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलत हे रेस्टॉरंट पूर्णपणे सील केले. या कारवाईदरम्यान रेस्टॉरंटचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला.
'कर्लिस' रेस्टॉरंट हे केवळ बेकायदेशीर बांधकामामुळेच नव्हे, तर गुन्हेगारी प्रकरणांमुळेही चर्चेत राहिले. भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता, त्यापूर्वी त्यांनी याच रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवला होता. येथेच त्यांना अंमली पदार्थ देण्यात आल्याचा आरोप झाला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर या रेस्टॉरंटच्या परवान्यांवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
नुकत्याच घडलेल्या 'रोमिओ लेन' आगीच्या भीषण घटनेनंतर गोवा (Goa) सरकारने किनारपट्टीवरील बेकायदेशीर आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. हणजूण कोस्टवरील सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'कर्लिस'ने किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.