Konkani Language Dainik Gomantak
गोवा

Konkani Language: नव्या पिढीकडे कोकणीचे नेतृत्व द्या : हेमा नायक

Konkani Language:

दैनिक गोमन्तक

Konkani Language: ‘आमी आशिल्ले म्हूण कोंकणी राजभास जाली’, हे कोकणीच्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून सतत म्हटले जाणारे वाक्य तर नव्या पिढीतील तरुणाईचे खच्चीकरण करणारे आहे. कोणतीही चळवळ ही एकटी असूच शकत नाही. विविध प्रवाह त्यामध्ये नक्कीच असतात; पण कोणत्याही चळवळीची सत्ता केंद्रे मात्र अनेक असू शकत नाहीत.

त्यामुळे, या ज्येष्ठांनी आता त्यांनी हाताळलेल्या मुद्यांच्या रितसर निवारणासाठी नव्या पिढीच्या हातात चळवळ सुपुर्द करणे गरजेचे आहे, असे मत कोकणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष हेमा नायक यांनी व्यक्त केले.

मंगळुरू येथे रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शनिवार, ४ रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध साहित्यिका हेमा नायक यांनी एकूणच भाषा, राजकारण, समाजकारण आणि विचारकारणाबद्दल सविस्तर मांडणी केली. त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग.

हेमा नायक म्हणाल्या, आजच्या काळात राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भाषावार प्रांतरचनेचा काळदेखील संपलेला आहे. भाषेच्या आधारावर निर्माण झालेले गोवा हे घटकराज्याचा दर्जा लाभलेले देशातील शेवटचे राज्य ठरले आहे.

गोव्यानंतर ज्या राज्यांना घटकराज्यांचा दर्जा मिळाला किंवा जिथे ही मागणी प्रलंबित आहे, तिथे भाषा हा सिध्दांत मागे पडून नवीन राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक गरजा, अस्मितेचे सिध्दांत पुढे आले आहेत. आपल्यासमोरचे मुख्य आव्हान सध्या काही असेल तर ते म्हणजे या बदलांमध्ये कोकणी माणसाचे आस्तित्व शोधण्याचे आणि आपला संघर्ष समजून घेण्याचे. विचार काळानुरूप बदलत गेले पाहिजेत. म्हणूनच मार्क्सवादाच्या आकलनामध्ये या सगळ्या प्रकाराला ‘ठोस परिस्थितीचे ठोस विश्लेषण’ म्हटले गेले आहे.

वास्तविक समीकरणांचे वास्तववादी विश्लेषण.

कोकणी ही साम्राज्यवादी राज्याची भाषा नव्हती. भारतासारख्या विस्तीर्ण देशात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इतिहासाचा सतत वापर होत आहे. पण कोकणीचे वास्तव हे सतत विस्थापित होण्याचे होते. त्यामुळे आम्हाला आमची भाषा राष्ट्रीय प्रवाहात आत्मसात करायची होती. आणि कोकणी माणसाच्या अनेक पिढ्यांची ताकद कोकणीला भाषा म्हणून सिद्ध करण्यात गेली.

गोव्यात ‘बहुजन विरुद्ध अभिजन’ आणि गोव्याबाहेर ‘अल्पसंख्याक आणि बहुसंख्य’ या वादाशी कोकणी भाषेला सतत संघर्ष करावा लागला. तरीही कोकणी भाषेने केलेली साहित्यिक आणि शैक्षणिक प्रगती स्पृहनीय आहे.

असे असले तरी पुरस्कार, संमेलने, महोत्सव, काव्यमहोत्सव या मर्यादित वर्तुळातच फक्त आम्ही साहित्य निर्मिती करून चालणार नाही. जर श्रमजीवी लोकांना त्यांचे जगणे या साहित्यामध्ये दिसत नसेल तर आपल्या साहित्याचे मूल्यमापन करणे कठीण होऊन बसेल.

दुसरीकडे चळवळीच्या या सामाजिक मर्यादा काही धूर्त राजकारण्यांनी ओळखल्या आणि त्यांनी कधी लिपी, कधी शैक्षणिक माध्यम भाषा असे मुद्दे समोर आणत कोकणी चळवळीत रितसर फूट घालण्याचे ‘विज्ञाननिष्ट इंजिनिअरिंग’ केले आणि चळवळ या सगळ्याला बळी पडत गेली, पर्यायाने राज्याच्या निर्णय प्रक्रियेत असलेली आमची शक्ती अधिक क्षीण होत गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT