दाबोळी: गोमंतकीयांचा सर्वात मोठा, जिव्हाळ्याचा बालगोपाळांचा आनंदाचा सण Ganesh Festival असलेला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सव सणाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.प्रत्येकाच्या घरात भटजींची उपस्थिती लक्षणीय ठरली. घरोघरी लाडक्या गणरायाचे (Ganpati) आगमन झाले असून सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
देवतांचे आराध्य दैवत अशी उपमा असलेल्या मंगलमूर्ती श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन आज ता. १० सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीला अर्थात चवथीला गावागावांत सुरू झाले. हिंदू धर्मातील सणांचा राजा समजल्या जाणाऱ्या चतुर्थी अर्थात चवथीची सर्व तयारी करून गणेशभक्त बाप्पा गणेशाच्या स्वागतासाठी पुर्वसंध्येलाच सज्ज झाले होते. गणेश चित्रशाळांतून मूर्तिकारांनी केलेल्या गणेशमूर्ती गुरुवारी घरी आणण्यात आल्या. अनेकांच्या घरी गणेश पुजनाच्या जागी मखर सजावट केलेल्या जागेत गणराज स्थानापन्न झाले आहेत.जोरदार पाऊस व कोरोनामुळे चवथीच्या तयारीला काही प्रमाणात अडथळा येत असला, तरी लोकांत चवथीचा उत्साह जाणवत आहे.
किमान दीड दिवस ते कमाल २१ दिवसांपर्यंत गणेश पूजनाची परंपरा आहे. त्याशिवाय सर्व शहरे तसेच ग्रामीण भागातही सार्वजनिक गणपती पूजण्यात येत आहेत. कोरोना महामारीमुळे गतवर्षी घरगुती गणेश पूजनाचा कालावधी कमी झाला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवही परंपरेत खंड पडू नये यासाठी मर्यादित स्वरूपात पूजण्यात आले होते. कोरोनाच्या भीतीमुळे गतवर्षी श्रीमूर्तीच्या स्थापनेपासनून उत्तरपूजेपर्यंत सर्व देवकार्ये प्रत्येकाने एकतर स्वतःच किंवा ऑनलाईन वा विविध भटजींनी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओच्या आधार घेत केली होती.
गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाचा प्रभाव किंचित कमी दिसून येत आहे. त्याचबरोबर सरकारनेही कोरोना निर्बंध बऱ्याच अंशी शिथील केले आहेत. मार्गदर्शक तत्वांतही सूट दिली आहे. त्यामुळे भटजींना घरोघरी जाऊन पूजा करण्याची मोकळीक मिळाली आहे.गोव्यातील सर्वांत मोठा असलेला गणेश चतुर्थीचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. चतुर्थीच्या पूर्वसंध्येला काल राज्यभरात सणाची तयारी व खरेदीची लगबग सुरू होती. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवरील ही सलग दुसरी गणेश चतुर्थी आहे. गेल्या वर्षी कोविडच्या पहिल्या लाटेमुळे राज्यात गणेश चतुर्थीवर मोठे निर्बंध आले होते व बऱ्याच लोकांना अत्यंत साध्या पद्धतीने चतुर्थी साजरी करावी लागली होती.
यंदा कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतरची स्थिती जरा चांगली असल्याने गेल्या वर्षीपेक्षा कमी निर्बंधात ही चतुर्थी साजरी होत आहे. शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांनी काल गुरूवारीच आपल्या गावाकडे कूच केली होती. तसेच काल माटोळीचे सामान व सजावटीचे सामान घेण्यास भाविकांनी गेले दोन दिवस बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.
काही भाविकांनी काल गुरूवारीच गणेशमूर्ती घरी नेल्या. तर आज सकाळी मोठ्या संख्येने घरोघरी मूर्ती आणल्या गेल्या. घरोघरी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात असला तरी काही लोक पाच, सात, नऊ, अकरा दिवसही गणेशोत्सव साजरा करीत असतात. गेले दिड वर्ष कोरोनाचे संकट आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले. व्यवसाय डबघाईला आले. त्यामुळे बहुतांश नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत पूर्वी गणेशचतुर्थीला जे नागरिक हात सैल सोडून खर्च करत होते ते यावेळी प्रत्येक वस्तू खरेदी करताना विचार करताना दिसत आहेत.
दरम्यान आज पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.पहाटेपासून भटजींच्या मंत्रोच्चारात गणेश पुजनाला प्रारंभ झाला.काहींच्या घरात पहाटे तीन वाजता पुजा झाली.यासाठी भटजी काकांना आगाऊ बुकिंग करून ठेवण्यात आले होते.त्यानुसार भटजींनी प्रत्येकाच्या घरात येऊन पुजा पाठ केला.भटजी पहाटे येणार असल्याने घरातील मंडळींनी रात्र जागवत काढली.दुपारपर्यंत सर्वत्र पुजेचा माहोल होता.दुपारच्या सत्रात आरतीचा माहोल तयार झाला.घुमट,शामेळ,कासाळेच्या गजरात चवथीचा माहोल तयार झाला होता.दुपारी चार पर्यंत सगळीकडे आरतीचा माहोल होता.त्यासाठी काहींना जेवण करेपर्यंत पाच वाजले.कोविड महामारीमुळे गेल्या वर्षी दुरावलेले कुटुंब यंदा एकत्रित आलेला दिसला.कोरोना महामारी लवकर नष्ट करा अशी मागणी करत भाविक श्री चरणी नतमस्तक झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.