श्रावण महिन्याच्या पूर्वदिवशी फोंड्यात मासे आणि चिकन मटण खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसले. फोंड्यातील (Ponda) मुख्य मासळी बाजाराबरोबरच (Fish Market) तालुक्यातील अन्य ठिकाणच्या मासळी मार्केटमध्ये सकाळीच ग्राहक मासे (Fish) आणि मटण चिकन खरेदी करताना दिसले. बाजारात माशांची मोठी आवक झाली होती, मात्र दर तसे चढेच होते. एसजीपीडीएच्या घाऊक मासळी बाजारात येण्यास थोडी भीतीच वाटते. येथे केरळमधून मासळी येते. तेथील वाहनांचे ड्रायव्हर व इतर कामगार दररोज येत असतात. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे गोव्यातही कोरोना परसण्याची भीती आहे, असे सांगून सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे व्यापाऱ्यांनी सूचविले. (Fish Market: What about those coming to Goa from Kerala)
फोंड्यात मासळीसाठी भाऊगर्दी
फोंड्यातील बुधवारपेठ मार्केटमधील प्रमुख मासळी बाजारात माशांची मोठी उलाढाल होते. मडगावातील घाऊक मार्केटमधून या बाजारात पहाटेच मासळी येत असते. एरव्ही माशांची आवक कमी होती, मात्र श्रावण महिना असल्याने पूर्वदिवशी फोंडा बाजारात सकाळीच साधारण माशांची मोठी आवक झाली. त्यात बांगडे, वेर्ल्या, तारले, सवंदाळे, खापी, इसवण, पांढरे पापलेट, सुंगटे आदींचा समावेश होता.
माशांबरोबरच चिकन व मटणलाही मोठी मागणी होती. अंत्रुज महालात श्रावण महिन्यात जास्त लोक शाकाहारी असल्याने श्रावणाच्या पूर्वदिवशी माशांना मोठी मागणी असल्याने लोकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे कोरोनाची भीती असतानाही लोक खरेदीसाठी गर्दी करताना दिसले.
पहाटे चार वाजल्यापासूनच बाजारात गर्दी
मडगावच्या एसजीपीडीएच्या घाऊक मासळी बाजारात रविवारी सकाळी जत्रेचे स्वरूप दिसून आले. यावेळी घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, त्यांचे एजंट, मासळीच्या टोपल्या डोक्यावरून नेणाऱ्या बायका, वाहनांचे चालक व स्थानिक लोक मिळून कमीत कमी 4 ते 5 हजार लोक जमले होते. त्यात पहाटे चार वाजताच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
बांगडे 250 रुपये
इसवण 700 रुपये
पापलेट 400 रुपये
सवंदाळे 280 रुपये
वेर्ल्या 260 रुपये
तारल्या 200 रुपये
सुंगटे 350 ते 400 रुपये
आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असल्याने ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी मास्क न लावल्याचे दिसून आले. कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. तसेच तिसरी लाट येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी लोक सुधारायला तयार नाहीत, असेच दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.