पणजी : सामने आणि करंडक जिंकण्याचे लक्ष्य बाळगून आपण एफसी गोवा संघाची करार केला असल्याचे मत 31 वर्षीय स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केले. एफसी गोवा संघाने वाझकेझ याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. गतमोसमात केरळा ब्लास्टर्स संघातर्फे तो आयएसएल स्पर्धेतील पहिला मोसम खेळला होता. गतउपविजेत्या संघातर्फे त्याने 23 सामन्यांत आठ गोल नोंदविले होते. त्या कामगिरीच्या अनुषंगाने, भारतात खेळण्याचा अनुभव अद्भूत असल्याचे वाझकेझ याने नमूद केले. ( FC Goa have signed Alvaro Vazquez for two years )
स्पेनचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ज्युनियर पातळीवर प्रतिनिधित्व केलेल्या वाझकेझ एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास आतुर आहे. ‘‘प्रशिक्षक कार्लोस ( पेनया ) यापूर्वी एफसी गोवातर्फे खेळले आहेत. त्यांना येथील लीगबद्दल माहिती आहे. याशिवाय आयएसएल स्पर्धेचा अनुभव असलेले खेळाडूही आहेत.
त्याचा लाभ होईल. अर्थातच संघासाठी सामने आणि करंडक जिंकणे हेच अंतिम ध्येय राहील,’’ असे वाझकेझ म्हणाला. विजयी कामगिरीसाठी सांघिक कामगिरी निर्णायक असेल आणि दृष्टीने खेळाडूंना केंद्रित राहावे लागेल, असे मतही बार्सिलोना येथे जन्मलेल्या खेळाडूने व्यक्त केले.
चाहत्यांना भेटण्यास उत्सुक
आगामी आयएसएल मोसम जैवसुरक्षा वातावरणात नसेल. हा धागा पकडून वाझकेझने आपण एफसी गोवाच्या चाहत्यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. केरळा ब्लास्टर्सच्या चाहत्यांकडून जो आदर प्राप्त झाला, त्याचीच पुनरावृत्ती एफसी गोवातर्फे खेळताना होईल, असे सांगण्यास तो विसरला नाही.
कोरो, आंगुलोच्या कामगिरीची जाणीव
फेरान कोरोमिनास (कोरो), इगोर आंगुलो हे स्पॅनिश आघाडीपटू एफसी गोवातर्फे खेळताना यशस्वी ठरले. आयएसएल स्पर्धेत ते गोल्डन बूटचेही मानकरी ठरले. त्यांच्या कामगिरीची जाणीव असून आपणही त्यांच्यात पाऊलखुणांवरून जाण्याचे ध्येय बाळगल्याचे वाझकेझने स्पष्ट केले. कोरो याने तीन मोसमात (2017-2020) एफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत ४8 गोल केले, तर आंगुलो याने 2020-21 मोसमात 14 गोल नोंदविले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.