कला अकादमीचे नूतनीकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अकादमीच्या छताचा काही भाग आज सकाळी अचानक कोसळला. हे वृत्त सर्वत्र पसरताच पुन्हा एकदा सर्वत्र टीका सुरू झाली आहे.
उपरोक्त प्रकाराचा अहवाल मागवण्यात आला असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. अवकाळी पाऊस पडल्याने अकादमीच्या वास्तूचे एवढे नुकसान झाले तर भर पावसाळ्यात काय अवस्था होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कला अकादमीच्या मुख्य वरांड्यात पाणी साचले होते. मोठ्या प्रमाणात पाला पाचोळा साचला होता तो कर्मचाऱ्यांद्वारे काढण्यात आला होता परंतु आता अकादमीच्या पहिल्या मजल्यावरील फॉल्स सिलिंगचा भाग कोसळल्याचे दिसून आले असून पहिल्या मजल्यावरील काही रूममध्ये देखील पाणी साचले होते.
हे पाणी आज कर्मचाऱ्यांद्वारे काढण्यात आले. या प्रकरणावरून विरोधकांनी आवाज उठवला असून शांत झालेला कला अकादमीचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
"कला अकादमीतील वातानुकूलन सेवेचे काही तांत्रिक काम सुरू होते. आकस्मिक आलेल्या अवकाळी पावसामुळे 'एसी'च्या बसवलेल्या ठिकाणाहून खाली पाणी उतरले. परंतु नेमके काय झाले आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून या संदर्भात अहवाल मागविला आहे," असे कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले.
फॉल्स सिलिंग पडल्याच्या प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः चौकशी करून माहिती घेणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.
कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी सरकारने 75 कोटी रूपये खर्च केले. परंतु काम पूर्ण होऊन वर्षही झाले नसता फॉल्स सिलिंग कोसळणे तसेच इतर घटना घडल्या. आता ही तिसरी घटना आहे.
त्यामुळे या कामाची चार्ल्स कुरैया फाऊंडेशनद्वारे तपासणी करून अहवाल घ्यावा. त्यासोबतच कला अकादमीत कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलाप्रेमींच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारांवर हेल्मटची सुविधा करावी कारण केव्हा काय? कोसळेल याची शाश्वती नाही, अशी मागणी करत गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत सरकारवर टीका केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.