पणजी: काँग्रेस पक्षाची विविध समित्या निवडण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून 31 मार्चपर्यंत डिजीटल पद्धतीने सदस्य नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. पक्षाच्या बूथ समितीपासून ते केंद्रीय समितीपर्यंतसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदारांच्या याद्या तयार करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. पक्षाचे महाअधिवेशन सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये होणार असून त्यावेळी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीची निवडणूक होणार आहे, अशी माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी मोहन जोशी यांनी दिली. (Goa Congress News Updates)
जोशी पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 16 एप्रिल ते 31 मे दरम्यान गट समिती सदस्य व अध्यक्षांची निवड केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा समित्या व अध्यक्षांच्या निवडणुका 1 जून ते 20 जुलैदरम्यान होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कोषाध्यक्ष व कार्यकारिणी 21 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान निवडल्या जातील. चौथ्या टप्प्यात अखिल भारतीय काँग्रेस समिती कार्यकारिणी समित्यांची निवड केली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते तन्वीर खान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, अमरनाथ पणजीकर, एम. के. शेख, वरद म्हार्दोळकर तसेच पक्षाचे निवडणुकीतील उमेदवार उपस्थित होते. यावेळी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर(Girish Chodankar) म्हणाले की, निवडणुकीच्या काळात काही मतदारसंघातील बूथ व गट स्तरावरील समित्या सक्रिय नव्हत्या. त्यामुळे त्या बरखास्त करण्यात आल्या असून या निवडणुकीत नव्याने निवडण्यात येणार आहेत. जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करण्यासाठी सक्रिय असतील त्यांची या समित्यांवर निवड केली जाणार आहे.
‘भाजप पुन्हा सत्तेवर नाही’
या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवडणुकीत हार पत्करावी लागणार आहे. यावेळी नाराज असलेल्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेससाठी अप्रत्यक्षपणे काम केले आहे ते भाजपलाही कळून चुकले आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.