पेडणे: बदलत्या काळानुसार शैक्षणिक क्षेत्रातही बदल होणे आवश्यक होते. आता सरकारने जो शैक्षणिक बदल केला आहे, तो स्वागतार्ह आहे. त्याचा स्वीकार करूया, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
विद्याभारती, पालक व्यासपीठ आणि तालुका शिक्षणाधिकारी कार्यालय पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कॉलेजच्या सभागृहात ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात पालकांचा सहभाग’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साहित्यिक तथा प्रमुख मार्गदर्शक आत्माराम गावकर, भाग शिक्षणाधिकारी उमा बागकर, शशांक कामत, प्रा. सचिन वेटे आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. वेटे यांनी कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
प्रा. आत्माराम गावकर यांनी सांगितले की, पालक हा शिक्षण प्रक्रियेतील मुख्य घटक आहे, हे ओळखून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात पालकांच्या सहभागासाठी विशेष लक्ष देऊन नवी संकल्पना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीतील सुधारणेसाठी पालकांचा सक्रिय सहभाग फार महत्त्वाचा असतो. यासाठी शिक्षक आणि पालकांची मेहनत आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पालकांसह समाजातील इतर नागरिकांचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग सरकारला अपेक्षित आहे.
विकास हायस्कूल वळपेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. शशांक कामत यांनी प्रास्ताविक केले. उमेश गाड, विनायक चारी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. नागेश गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्सेकर म्हणाले की, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरी आई-वडील, काका-काकी, मामा-मामी, मावशी असायची. या सर्वांच्या अनुभवातून मार्गदर्शन व्हायचे. मामा-मावशीच्या गावाकडे तेथील निसर्गाची माहिती मिळायची. एकमेकांच्या अनुभवांतून खूप गोष्टी शिकायला मिळायच्या. पण एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आल्यावर मुले एकलकोंडी झाली. सहजपणे मिळणारे शिक्षण मिळेनासे झाले. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.