पणजी: धारबांदोडा येथे कार ठोकरल्याने झालेल्या अपघातात पादचारी रूपा पवार या महिला जखमी झाल्या होत्या व त्यामुळे त्यांना १५ टक्के अपंगत्व आले. त्यांनी न्यायालयात अंतरिम भरपाईसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांनी दाव्यासाठी मोटार वाहन कायदा कलम १४० खाली केलेला अर्ज ग्राह्य धरून प्रतिवादी अजय वशिष्ठ व न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनी या दोघांनी मिळून दावेदार रूपा पवार यांना एका महिन्यात २५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावे लवादाच्या सदस्याने दिला.
अर्जदार रूपा पवार या २९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वा.च्या दरम्यान तिस्क-उसगाव येथील आपल्या कसळे ते शांतादुर्गा हॉटेलच्या दिशेने चालत जात होत्या. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होत्या. त्या गावठण-पिळये येथील अशोक बारजवळ पोहोचल्या असता कारचालकाचे नियंत्रण गेले व कार डाव्या बाजूला गेली.
या भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून चालत येत असलेल्या रूपा यांना धडक दिली. या अपघातात पादचारी रूपा पवार यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, तसेच रूपा यांना १५ टक्के अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र इस्पितळाकडून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना भरपाई देणे आवश्यक आहे, असा दावा अर्जात करण्यात आला होता.
या अपघातातील कार चालकाने या अर्जावर कोणतेच उत्तर दिले नव्हते. या कारचा विमा केलेल्या न्यू इंडिया ॲशुरनस कंपनीने या अर्जाला विरोध केला होता. अर्जात करण्यात आलेले आरोप कंपनीने मान्य न करता फेटाळले. मात्र, न्यायालयाने अर्जदाराला आलेले अपंगत्व व त्यासंदर्भात सादर केलेले प्रमाणपत्र तसेच इतर पुरावे या आधारावर रूपा पवार यांचा अर्ज गृहीत धरत अंतरिम भरपाई देणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.