तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार (Trinamul Congress Rajya Sabha MP) आणि राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन (Derek O’Brien) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha)यांच्या पश्चिम राज्याच्या दौऱ्यापूर्वी गोव्यात (Goa Posters) फलक, पोस्टर्स आणि तृणमूल पक्षाचे झेंडे फाडल्याबद्दल भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.
"गोव्यातील तृणमूलच्या उपस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहा अस्वस्थ झाले. याच कारणामुळे भाजपने गोवा तृणमूलचे पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग्ज फाडून त्या ठिकाणी भाजपचे झेंडे, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावले. यावरून असे स्पष्ट होतेय की, भाजपा तृणमूल काँग्रेसला घाबरते. पण आमची पोस्टर्स फाडून तुम्ही आम्हाला आमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. गोव्यातील 2022 ची निवडणूक आम्ही एकटेच लढू, ”असे ओब्रायन म्हणाले.
"आमचे होर्डिंग्ज आणि पोस्टर्स फाडून त्यांच्या जागी तुमचे मास्टर अमित शहाजी याचे पोस्टर लावल्याने काही फरक पडणार नाही. गोव्याचे लोक गेल्या चार वर्षांत त्यांनी जे भोगलं ते दुःख विसरणार नाहीत. गोव्याची जनता काँग्रेस आणि भाजप या दोघांपासून निराश आहे आणि त्यांना आता मनापासून बदल हवा आहे. त्यांनी काँग्रेसला 50 वर्षांहून अधिक काळ आणि भाजपला गेल्या दोन टर्मपासून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आता बदल हवा आहे आणि म्हणून त्यांना तृणमूल काँग्रेसला संधी द्यायची आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे विकासकाम, महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांच्या योजना पाहिल्या आहेत," असेही डेरेक ओ ब्रायन म्हणाले.
गोव्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, एआयसीसीचे माजी सरचिटणीस आणि नावेलीचे सात वेळा आमदार राहिलेले लुईझिन फालेरो तृणमूल काँग्रेसमध्ये 29 सप्टेंबरला सामील झाले. माजी आमदार, सरपंच, सरचिटणीस किंवा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, अधिवक्ता, साहित्य अकादमी विजेते लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह इतरही नऊ लोकं तृणमूलमध्ये सामील झाले.
त्यानंतर, राष्ट्रीय स्तरावरील तीन फुटबॉलपटू तृणमूलमध्ये सामील झाले. तृणमूलमध्ये अधिकृतपणे सामील होण्यापूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि इतर नऊ जणांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. "देश आणि गोवा दोन्ही आर्थिक मंदीच्या टप्प्यावर आहेत. देशातील 65 टक्के लोकसंख्या बेरोजगार आहे आणि गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी केंद्रातील भाजप सरकारच्या सात वर्षांच्या काळात आली आहे," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
"गोवा हा भारताच्या मुकुटावरील रत्न आहे आणि गोव्यात भाजपाची सत्ता आल्यापासून ते गोव्याची संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक संसाधने नष्ट करत आहेत. भाजप सरकारच्या अंतर्गत गोव्यात बेकायदेशीर खाणकाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून माझी कारकीर्द सुरू केली आणि कष्टाने सांस्कृतिक वारसा जपला, "असे मत फालेरो यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.