सासष्टी: मडगाव व परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ७१ रुग्णांची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी २७ रुग्णांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
जुलैमध्ये ९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती, त्यापैकी ७९ जणांना दाखल करून उपचार करण्यात आले होते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेमध्ये डेंग्यूचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यापैकी ८ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले.
जूनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली, तर २९ जणांना दाखल करून उपचार करण्यात आले. जुलैमध्ये ९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि ७९ जणांना दाखल करण्यात आले. ऑगस्टच्या १० दिवसांतच ७१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूचा प्रभाव असलेल्या भागांत आरोग्य खात्याकडून धूर व औषधांची फवारणी सुरू करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डासांची उत्पत्तीस्थळे शोधत असून, नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. गोवा आरोग्य सेवांनीही डेंग्यू नियंत्रणासाठी परिसर स्वच्छ ठेवणे आणि पाणी साचू न देण्यावर भर दिला आहे.
डॉक्टरांकडून आवाहन; तातडीने तपासणी करा
ताप तीन-चार दिवसांनंतरही कमी होत नसल्यास तातडीने डेंग्यूची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
अधूनमधून पडणारा पाऊस, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य खाते तसेच मडगाव व परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.