Sonali Phogat Case : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणातील संशयित ता ‘कर्लिस’चा मालक एडवीन नुनीस याच्या जामीनअर्जावर मंगळवारी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयाने सदर निवाडा राखून ठेवला असून जामिनावर आज बुधवारी दुपारी निर्णय येणे अपेक्षित आहे. दरम्यान, संशयित एडवीन नुनीस, रामदास मांद्रेकर व दत्तप्रसाद गावकर या तिघांना पोलिस कोठडी देण्यात यावी, यासाठी हणजूण पोलिसांनी वरील न्यायालयात नवीन अर्ज दाखल केला आहे. सध्या तिघेही संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.
एडवीन नुनीस यांच्या जामीनअर्जावर युक्तिवाद करताना अॅड. सुरेंद्र देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, आपल्या अशिलास या प्रकरणात गोवण्याचा हणजूण पोलिसांनी प्रयत्न केला आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूशी तसेच ड्रग्स तस्करीशी नुनीस यांचा कुठलाच संबंध नाहीय. मुळात मयत सोनाली या इतर संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्यासोबत हणजूणमधील ‘ग्रँड लिओनी’ रिसॉर्टमध्ये उतरल्या होत्या. तिथेच सोनाली यांनी ड्रग्सचे सेवन केले व तेथून त्या दोघा सहकाऱ्यांसोबत ‘कर्लिस’ रेस्टॉरंटमध्ये आल्या होत्या.
अॅड. सुरेंद्र देसाई म्हणाले की, मुळात हणजूण पोलिसांनी ‘ग्रँड लिओनी’ या रिसॉर्टची चौकशी करण्याची गरज होती. कारण प्रमुख घटना याच रिसॉर्टमध्ये घडल्या होत्या. तेथूनच फोगट व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या बाटलीतून ड्रग्स ‘कर्लिस’ रेस्टॉरंटमध्ये आणले होते. ‘ग्रँड लिओनी’ हे रिसॉर्ट हे एका स्थानिक राजकारण्याच्या मित्राचे असल्याने पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत हेतुपुरस्सर कारवाई टाळली, असेही ते आपल्या युक्तिवादात म्हणाले.
या पाण्याच्या बाटलीचा उल्लेख पोलिसांच्या पंचनाम्यात आहे. शिवाय कर्लिस रेस्टॉरंट हे मागील 40 वर्षांपासून कार्यरत आहे. रेस्टॉरंटच्या चारही बाजूने खुली जागा असून, रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मागील 40 वर्षाच्या कालवधीत कर्लिस हे थेट ड्रग्स तस्करीमध्ये गुंतल्याचे पोलिस रेकॉर्ड नाही, असा दावा नुनीस यांच्या वकिलाने न्यायालयासमोर केला.
दरम्यान, सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, एका निर्दोष महिलेचा कर्लिसच्या आवारात मृत्यू झाला. यास एडवीन नुनिस हेच जबाबदार आहेत.
युक्तिवादातील ठळक मुद्दे
1 मयत सोनाली फोगट यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत ‘ग्रँड लिओनी’ रिसॉर्टमध्येच ड्रग्सचे सेवन करून ‘कर्लिस’ रेस्टॉरंट गाठले. शिवाय त्यांनी अतिरिक्त ड्रग्स पाण्याच्या बाटलीमधून आणले होते. याचा अर्थ कर्लिसमध्ये ड्रग्स तस्करी चालते असा होत नाही.
2 एडविन नुनीस यांचा सोनाली फोगट यांच्या मृत्यूशी थेट किंवा अप्रत्यक्ष देखील संबंध नाही. पोलिसांकडून नुनीस यांना अकारण गोवण्याचा प्रयत्न.
3 कर्लिसच्या महिला शौचालयात एका पाण्याच्या टाकीत प्लास्टिक पिशवीत कथित ड्रग्स सापडले. हेच ड्रग्स सोनाली यांच्या सहकाऱ्यांनी ‘ग्रँड लिओनी’मधून आणले होते, जे नंतर त्यांनी या टाकीत लपविले.
4 हे कथित ड्रग्स नुनीस यांनी उपलब्ध करून दिले असते तर घटनेच्या चार दिवसानंतरही तेथेच का लपवून ठेवले असते? याचाच अर्थ नुनीस यांचा या ड्रग्सशी संबंध नाहीय. कर्लिसमध्ये संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, फक्त शौचालय वगळून.
5 हणजूण पोलिसांना घटनेच्या चार दिवसांनंतर कर्लिसमध्ये ड्रग्स सापडते. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच तपासावर संशय व्यक्त होतोय.
6 एडविन नुनीस यांना अटक करण्यासारखा पोलिसांकडे एकही पुरावा नाही. पोलिसांनी अकारण खोटे, खुनाचे व ड्रग्स तस्कारीचे कलम नुनीस यांच्याविरोधात लावले आहे.
दरम्यान सोनाली फोगट मृत्यूप्रकणामुळे सध्या देशभर चर्चेत असलेल्या हणजूण किनारी भागात मंगळवारी बंद घरात एका माणसाचा सांगाडा आढळून आला. विशेष म्हणजे वादग्रस्त ‘कर्लिस’ रेस्टॉरंटपासून हाकेच्या अंतरावर हे घर आहे. आपल्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी मालकाने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.