Damodar mauzo Dainik Gomantak
गोवा

एका निस्सीम साहित्यिकाच्या योगदानाची दखल, गोव्यासाठी अभिमानाची बाब

त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय साहित्यविश्वातला हा शिखर सन्मान कोकणीच्या वाट्याला मृदुभाषी दामोदर मावजो यांच्या रूपाने येतो आहे.

दैनिक गोमन्तक

कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) जाहीर झाला आहे. सर्वप्रथम या निष्ठावंत साहित्य सेवकाचे मनापासून अभिनंदन. पंधरा वर्षांनंतर साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान पुन्हा एकदा कोकणी भाषेतून लेखनप्रपंच चालवणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येणे ही कोकणीसाठी गोव्यासाठीही खचितच अभिमानाची बाब आहे. 2006 साली कार्यकर्ता, योद्धा आणि लेखक अशा तीन भूमिकांतून कोकणी चळवळीच्या अग्रस्थानी राहिलेले रवीन्द्र केळेकर यांना या पुरस्काराने (Awards) सन्मानित केले होते आणि त्या पुरस्काराने कोकणी सारस्वतांत नवचैतन्य उफाळलें होतें. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय साहित्यविश्वातला हा शिखर सन्मान कोकणीच्या वाट्याला मृदुभाषी दामोदर मावजो यांच्या रूपाने येतो आहे.

साहित्याची सर्व दालने समृद्ध करणारे साहित्य प्रसवण्याची प्रक्रिया कोकणीत मंदावल्याची खंत हल्लीच्या काळात वरचेवर व्यक्त होताना दिसते. नव्या पिढीतल्या बहुतांश लेखकांत सातत्याचा आणि गांभीर्याचा अभाव तर आहेच, शिवाय सर्जनक्षमतेविषयीही अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या पिढींतल्या एका निस्सीम साहित्यिकाच्या योगदानाची दखल सर्वोच्च पातळीवर जेव्हा घेतली जाते तेव्हा त्यातून निर्माण झालेले चैतन्य त्या भाषेतील साहित्याचे सौष्ठव शतगुणित करण्यासाठी कामी यावे, अशी सदिच्छा प्रकट करणे गैर ठरणार नाही.

दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांची साहित्यविश्वातली भरारी देशी साहित्याला जाणवली ती त्यांच्या कार्मेलिन या कादंबरीमुळे. त्याना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवून देणारी ही कादंबरी आज अनेक भारतीय भाषांतून अनुवादित झालेली आहे आणि तिने मावजो यांच्या असाधारण सर्जनशिलतेचा परिचय करून देतानाच कोकणी साहित्याच्या श्रेष्ठत्वाचीही जाणीव देशभरातल्या साहित्यिक विश्वात पोहोचवली आहे. मावजो यांचे साहित्य त्यांचा भवताल चित्रित करणारे, लोकजीवनाच्या विविध पैलूंना भिडणारे आहे. कनिष्ठ आणि मध्यमवर्गाच्या भावविश्वाचा वेध घेताना हे साहित्यकथनाचा विलोभनीय जन्मजात बाज सांभाळत वाचकाच्या हृदयाला भिडते.

मावजो हे बराच काळ दुकानदार होते आणि या व्यवसायातील अनुभवानेच त्याना त्यांच्या साहित्यांतली पात्रे पुरवलीं. ही पात्रे जिवंत होऊन त्यांच्या कथा- कादंबऱ्यांत उतरलेली दिसतात. उत्कृष्ट लेखनशैली आणि निरीक्षणशक्तीला हे श्रेय जातें. चांगल्या लेखकाने ''स्टोरीटेलर'' असणे फारच दुर्मिळ; मावजो या अवघ्यातले आहेत. त्यांच्या कथा- कादंबऱ्यांत वाचकाला आपले प्रतिबिंब दिसते, आपल्या व्यथा- विवंचनांचे, आपल्या जीवनातील लहान- मोठ्या घटनांचे पडसाद उमटलेले दिसतात. या साहित्यसेवेसाठी जेव्हा त्यांना ज्ञानपीठ मिळते तेव्हा ते जनसामान्यांच्या शाहिराला मिळाल्याचे समाधान देते.

कोकणीला राजमान्यतेसाठी संघर्ष करावा लागला त्या काळात मावजो यांच्या लेखनाचा उत्कर्षकाल होता. साहित्यिक हा त्या भाषेसाठीच्या चळवळीतला आघाडीवरचा शिलेदार असण्याचा तो काळ होता, हे लक्षांत घेतले तर मावजो आणि त्यांच्या समकालीन साहित्यिकांवरली जबाबदारी आणि तिच्यामुळे सर्जक अभिव्यक्तीवर आलेल्या मर्यादांची जाणीव व्हावी. लेखन हा पूर्णवेळचा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी लागणारे पोषक पर्यावरण आपल्या देशांत नाही. साहित्यिकाना मिळणारा आदर कालानुरूप आटला आहे आणि प्रतिभेची असुया असणारी राजकीय जमात सर्जनशिलतेची कदर करण्यात असमर्थ ठरली आहे. त्यामुळे उत्तमातील उत्तम साहित्यिकाला आपल्या देशात उदरभरणाचा पृथक विचार करावा लागतो. याचा परिणाम त्याच्या सर्जनशिलतेवर होणे स्वाभाविक.

आपले घर, व्यवसाय सांभाळून, कोकणीसाठी स्वीकारलेली कार्यकर्त्याची जबाबदारीही यशस्वीपणे पेलत मावजो साहित्यनिर्मिती करत राहिले. यथावकाश ते व्यवसायातून बाजूला झाले आणि कोकणी अकादमी, साहित्य अकादमी अशा संस्थांतून सक्रिय झाले. साहित्य अकादमीवरली त्यांची कारकीर्द साहित्यिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी लक्षात राहिली. नामवंत देशी साहित्यिकांच्या सहभागाचे अनेक दर्जेदार कार्यक्रम त्यानी प्रयत्नपूर्वक गोव्यात घडवून आणले. साहित्य अकादमीच्या शिखर वर्तुळांतला त्यांचा वावर आणि त्यानी या कार्यकाळात जोडलेले ऋणानुबंध यांचा दरवळ आजही त्यांच्याभोवती असतो. कोकणी साहित्यातील उत्तम निर्मितीला राष्ट्रीय चर्चेत समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यातला कार्यकर्ता आजही करतो आहे.

साहित्य आणि संस्कृतीच्या महत्त्वाच्या अाविष्कारांत मावजोंची उपस्थिती असते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ते तरुणाला लाजवील अशा उत्साहाने वावरताना दिसले. सतत नवे काही अनुभवण्याचे, आपल्या निरीक्षणाच्या कक्षा विस्तारलेल्या राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक यत्न करण्याचे सातत्य त्यांच्यात आहे. आपल्या भोवतीचा परीघ कसा विस्तारत जाईल याची काळजी त्यानी नेहमीच जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. नव्या दमाच्या साहित्यिकाना यातूनही फार काही घेण्यासारखे आहे.

कोकणीच्या साहित्यक्षेत्रात मावजो यांच्या या सन्मानाचे हर्षोत्फुल्ल पडसाद उमटतीलच. भाषांच्या मर्यादा ओलांडून साजरे करायचे हे यश आहे आणि संपूर्ण गोव्यातून मावजो यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होणे अपेक्षित आहे. वर म्हटल्याप्रमाणे या आनंदातून नव्या उन्मेषांनी जन्म घेतला, प्रस्थापित साहित्यिकानी चाकोरी सोडून नव्या क्षितिजांना भिडणारे साहित्य निर्माण केले आणि नवोदितांनी मळलेले महामार्ग नाकारून नव्या पायवाटांचा शोध घेत साहित्यनिर्मितीला बहुविधता दिली तर तो मावजो यांच्या नागरी सत्कारापेक्षा कितीतरी पटींनी मोठा बहुमान ठरेल. गोमंतकीय साहित्यिकांनी या पुरस्काराकडे त्यांच्या प्रतिभेला सातत्य राखण्यासाठीच नव्हे तर नवनवोन्मेषशालिनी होण्यासाठी दिलेले आव्हान म्हणून पाहायला हवे आणि उत्तमोत्तम लिहिण्याचा ध्यास घ्यायला हवा.

‘‘सर्वसामान्यांचे जीवन आणि मानवतेची कहाणी हा महाकाव्याचा विषय असतो,’’ या उक्तीला सार्थ ठरवत लोकव्यवहाराला आपल्या दर्जेदार लेखनप्रपंचाचे अधिष्ठान देणारे दामोदर मावजो यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे केवळ एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या निर्लस साहित्यसेवेचीच कदर नव्हे तर नव्या उर्मींना केलेले आवाहनही आहे.

जनसामान्यांचा शाहीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT