Sam Bombay and Poonam Pandey Goa obscene video case details
मडगाव: वादग्रस्त माॅडेल पूनम पांडे हिचा पूर्वाश्रमीचा वादग्रस्त पती तथा बॉलिवूडमधील फिल्म निर्देशक सॅम अहमद बॉम्बे याच्याविराेधात काणकाेण न्यायालयाने फरारनामा जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काणकोण न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीवेळी तो गेले कित्येक महिने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सॅमच्या विरोधात काणकोण न्यायालयाने यापूर्वी अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. मात्र, मुंबईच्या पत्त्यावर ताे सापडत नसल्याने हे वॉरंट माघारी आले आहे.
सॅमला पकडून गाेव्यात आणण्याचे आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आम्ही मुंबई पाेलिसांनाही सतर्क केले आहे, अशी माहिती काणकोण पाेलिसांनी दिली.
नोव्हेंबर २०२० मध्ये सॅम आणि पूनम हे दोघे काणकोण येेथे वास्तव्यास असताना प्रवेश प्रतिबंध असलेल्या चापोली धरणाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्या दोघांनी अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रक़रणाची सुनावणी सध्या काणकोणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्मिता सैल यांच्यासमोर सुरू आहे. मात्र, सॅम या सुनावणीला गेले कित्येक महिने गैरहजर आहे.
२०२० मध्ये हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. हा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच गदारोळ माजला होता. त्यानंतर पाटबंधारे खात्याने सॅम आणि पूनमच्या विरोधात प्रतिबंधक जागेत बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याची तक्रार नोंदविली होती.
काणकोण न्यायालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खटल्यात सॅम आणि पूनम हे दोघेही संशयित आहेत. पूनमच्या वतीने तिचा वकील न्यायालयात हजर राहतो. पण सॅमच्या वतीने न्यायालयात कुणीच हजर राहात नसल्यामुळे त्याच्या विरोधात फरारनामा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सॅमला जामीन देताना त्याच्यासाठी जो स्थानिक हमीदार राहिला होता, त्याने जामिनासाठी दिलेली हमी रक्कम यापूर्वीच जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात काणकोण पोलिसांशी संपर्क साधला असता, सॅमच्या विराेधात यापूर्वी जे वॉरंट जारी केले, ते मुंबई पोलिसांच्या साहाय्याने आम्ही त्याच्याविरुद्ध बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सॅमने जाे आपला पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर तो मिळत नसल्याने ते परत आले, असे त्यांनी सांगितले. सॅमचा पत्ता मिळत नसल्यामुळे आता पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधून त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.