Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : साकोर्ड्यात पाणीप्रश्न पेटला; दूषित पाणीपुरवठा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

तांबडीसुर्ला, साकोर्डा पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न बराच पेटला. यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांचा भडिमार करून पंचायत मंडळाला धारेवर धरले.

साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मुख्य रगाडा नदी प्रदूषित झाल्याने गावातील लोकांची पिण्याची समस्या निर्माण झाली आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी खास ग्रामसभा घेण्यासाठी पंचायतीला निवेदन दिले होते. त्यानुसार उपसरपंच शिरीष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी सकाळी पंचायत सभागृहात ही खास ग्रामसभा घेण्यात आली.

गेल्या १८ फेब्रुवारीपासून रगाडा नदीचे प्रदूषित झालेले पाणी नळाला सोडत असल्याने लोक चिडले होते. सभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. पंचायतीकडे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी निधी नसल्यास जिल्हा पंचायत निधी, आमदार निधी अथवा मुख्यमंत्री निधीतून नियोजन का करण्यात आले नाही असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करून मंडळाला फैलावर घेतले. या प्रकरणी पंचायत मंडळ कमी पडले, हे त्यांनी शेवटी मान्य केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पाणीपुरवठा विभाग) साहाय्यक अभियंते अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून आहेत. हे अभियंते निष्क्रिय असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी, असा ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.

१९८४ पासून साकोर्डाच्या काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, त्यात अजूनपर्यंत काणतीही सुधारणा झाली नाही पंचायत मंडळ प्रत्येक वर्षी पोकळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करतात, असा आरोप प्रदीप वेरेकर यांनी सभेत केला.

उपसरपंच शिरीष देसाई, पंच महादेव शेटकर, जितेंद्र कालेकर, सोनू गावकर, गायत्री मापारी, सचिव सुषमा कवळेकर व निरीक्षक ट्विंकल माईणकर या सभेला उपस्थित होत्या.

सभेत अभूतपूर्व गदारोळ

प्रदूषित पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील लोकांना शुध्द पाणी पुरवण्यासाठी पंचायतीने कोणती पाऊले उचलेली? असा प्रश्न ॲड. सिध्देश नाडकर्णी यांनी उपस्थित केला. या पश्नाला उत्तर देताना उपसरपंच शिरीष देसाई यांनी गावात शुध्द पाणीपुरवठ्यासाठी अजूनपर्यंत कोणतेही नियोजन केले नसल्याचे सांगताच सभेत अभूतपूर्व गदारोळ झाला.

ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन पंचायत मंडळाच्या आसनाकडे येऊन त्यांना जाब विचारला. यावेळी उपसरपंचांनी तातडीने शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांचा राग थंड झाला. यापुढे प्रदूषित पाणी पिऊन जर कोणी आजारी पडला, तर त्याला जबाबदार सरकार असेल, अशी हमी उपसरपंच शिरीष देसाई यांनी दिली.

सरपंचाविरुद्ध निषेध ठराव

आठवड्यापूर्वी खास ग्रामसभा घेण्याचे निवेदन दिले होते. तरीही सरपंच सभेला गैरहजर राहिल्या. त्यामुळे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सरपंचांविरुद्ध निषेध ठराव घेतला. गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यात अपयश आल्यानेच सरपंच या सभेला गैरहजर राहिल्याचा यावेळी ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आला

मत्स्यपालन व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा नोंदवा

सातपाल-साकोर्डा येथील सर्वे क्र.१४/२ जमिनीत एका व्यावसायिकाला बेडूक पालन व्यवसाय करण्यासाठी एका तलावासाठी पंचायतीने तीन वर्षांपूर्वी ना हरकत दाखला दिला होता. त्यानंतर त्या व्यावसायिकाने आणखी सहा बेकायदा तलावांची बांधणी केली होती.

सर्व नियम धाब्यावर बसवून त्या व्यावसायिकाने बेडकांऐवजी मत्स्यपालन सुरू केले आहे. ज्या पंचायत मंडळाने या व्यावसायिकाला ना हरकत दाखला दिला, त्यावेळी ठरावावर सूचक व अनुमोदनाच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्या पंचायत सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बेकायदा मत्स्यपालन करणाऱ्यावरही गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT