पाटो-पणजी येथे एका प्रख्यात बिल्डरकडून टोलेजंग इमारत उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. पण बिल्डरने आपली कार्यालये रस्त्याच्या बाजूला थाटली आहेत. यापूर्वी तेथे स्थलांतरित करता येण्याजोगी पाच कार्यालये थाटण्यात आली होती. ही कार्यालये एका आठवड्यात हटविणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते. परंतु ती अजूनही तेथेच आहेत, उलट आणखी दोन नव्या कार्यालयांची त्यात भर पडली आहे.
पाटो येथे कला-संस्कृती संचालनालयाच्या समोरच एक बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. देशपातळीवरील एका प्रख्यात कंपनीचे हे काम आहे. ही इमारत उभारण्यासाठी तेथे भेट देणाऱ्या अभियंता, कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यालये थाटण्यात आली आहेत. ती स्थलांतरित करता येतील अशी असल्याने ती रस्त्याच्या बाजूला थाटली गेली आणि त्यास एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला. त्या कार्यकर्त्याने त्याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे तोंडी तक्रार केली होती.
दरम्यान, महापौर रोहित मोन्सेरात यांनी एका आठवड्यात ती कार्यालये हटविली जातील, असे सांगितले होते. आता फेब्रुवारीचे दोन आठवडे उलटले तरी ती कार्यालये तेथेच आहेत, शिवाय त्यात आणखी दोन कार्यालयांची भर पडली आहे. यावरून आता पुढील सभा तापणार असल्याचे नक्की आहे. कारण नव्याने कार्यालये थाटण्यात आल्याने, त्यास परवानगी कोणी दिली हाही एक प्रश्न आहेच.
5 लाख घेणाऱ्या नगरसेवकाला अभय?
1. सदर कार्यालये थाटण्यासाठी संबंधित कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याकडून एका नगरसेवकाने पाच लाख रुपयांचा व्यवहार (डील) केल्याची माहिती त्या सामाजिक कार्यकर्त्यास अधिकाऱ्यानेच दिली. त्याबाबत दै. गोमन्तकने ‘तो’ पाच लाख घेणारा नगरसेवक कोण? या आशयाखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते.
2. या विषयावरून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या मासिक सभेत ज्या प्रभागात ही कार्यालये येतात, त्या प्रभागाच्या तसेच शेजारील प्रभागाच्या नगरसेवकाने महापौरांना जाब विचारला होता. तसेच ‘तो नगरसेवक कोण?’ अशी विचारणा केली होती. परंतु त्यास उत्तर न देता ती कार्यालये लवकरच हटविण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.