पणजी: गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांचा प्रस्ताव म्हणजे भाजप सरकारचा गोव्याबाबत बेपर्वा, असंवेदनशील आणि विध्वंसक दृष्टिकोनाचं स्पष्ट दर्शन आहे. गोवा हा भाजपच्या धोकादायक प्रयोगांचा प्रयोगशाळा नाही आणि होणारही नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रस्तावाचा निषेध करत विरोध दर्शवला.
'अणुऊर्जा प्रकल्प गोव्याच्या पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, आणि पारंपरिक व्यवसायांसाठी हे संकट ठरू शकते आणि त्यामुळे आम्ही या निर्णयास कदापिही मान्यता देणार नाही', असे पाटकरांनी स्पष्ट केले.
'गोवा ही निसर्गसंपन्न भूमी आहे. समुद्रकिनारे, जैवविविधता, निसर्गरम्य जंगलं आणि मत्स्य व्यवसाय यावर आधारीत अर्थव्यवस्था असलेला आपला प्रदेश. अणुऊर्जा प्रकल्पामुळे या सर्वांवर कायमस्वरूपी धोका निर्माण होईल', असे पाटकरांनी म्हटले आहे.
'चर्नोबिल आणि फुकुशिमा यांसारख्या दुर्घटनांचा अनुभव जगाने घेतलाय. एक लहानशी चूकसुद्धा हजारो जीव घेतो आणि अनेक पिढ्यांना परिणाम सहन करावा लागतो. गोवा अशा धोकादायक प्रकल्पासाठी भूगोल, संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अजिबात सक्षम नाही.'
'अणुऊर्जा प्रकल्पासाठी मोठा भांडवली खर्च लागतो, अफाट पाण्याचा वापर होतो, अत्यंत धोकादायक कचरा निर्माण होतो आणि त्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी कोणतेही दीर्घकालीन उपाय अद्याप अस्तित्वात नाहीत. हे सर्व पाहता, गोवा हा अणुऊर्जा प्रकल्पासाठी अनुकूल प्रदेश नाही आणि गोमंतकियांना तो मंजूर नाही', असेही पाटकांनी म्हटले आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव म्हणजे केवळ पर्यावरणीय किंवा आर्थिक संकट नव्हे, तर राजकीय कटकारस्थानी कारस्थान आहे. गोव्यातील जमिनी, संसाधने आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भाजपकडून सुरू असलेला हा नियोजित आक्रमण असल्याचा आरोप पाटकरांनी केला.
'केंद्र सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर, सभागृहात आणि न्यायालयात तीव्र आंदोलन उभारू. गोव्याचं भविष्य कोणत्याही राजकीय फायद्याच्या बदल्यात तडजोडीला ठेवू दिलं जाणार नाही', असे पाटकरांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.