कळंगुट: कळंगुट मतदार संघासाठी कॉग्रेस पक्षाची फार मोठी योजना आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही योजना कळंगुटातील जनतेच्या हीतासाठी प्रत्यक्षात साकार करण्याचा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्धार आहे. मागच्या दहा वर्षात कळंगुटातून हरवलेले पक्षाचे गतवैभव आपणांं सर्वांना अर्थातच कॉग्रेसजनांना पुन्हां एकदां प्राप्त करण्यासाठी सर्वानी एकजुटीने झटण्याचे आवाहन पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी संध्याकाळी आयोजित तारांकीत हॉटेलच्या बंद सभागृहात बोलतांना केले.
अंदाजे तीनशेच्या आसपास उपस्थित असलेल्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना चिदंबरम मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर गोवा कॉग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कळंगुटचे माजी आमदार तथा कॉग्रेस नेते आग्नेलो फर्नाडीस, माजी सरपंच जोजफ सिक्वेरा, नुकतेच कॉग्रेसवासी झालेले एन्थॉनी मिनेझीस आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कळंगुट मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांच्या कॉग्रेस प्रवेशावरून उठलेल्या चर्चाच्या पाश्वभुमीवर शुक्रवारची सभा आयोजित करण्यात आल्याने मतदारसंघातील सर्वाचेच त्यांकडे लक्ष लागून राहिले होते. तथापि, मंत्री लोबो यांच्या कॉग्रेस प्रवेशावरून आजच्या बैठकीत किंचीतही चर्चा झाली नसल्याचे कळंगुट गट समितीचे अध्यक्ष बेनेडिक्ट डिसौझा यांनी नंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मंत्री लोबोंचा कॉग्रेस प्रवेश या हेतुपुरस्सर पसरविण्यात आलेल्या नुसत्या अफवां असल्याचेही वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे डिसौझा यांनी यावेळी स्पष्ट केले.
कळंगुट मतदार संघातून येत्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस, माजी सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच एन्थॉनी मिनेझीस यांना सोमवारपासून घरोन्घर प्रचाराची सुरुवात करण्याचा वरिष्ठांकडून सल्ला देण्यात आला आहे. तथापि,पक्षाच्या उमेदवारीसाठी ज्या कुणाची वरिष्ठांकडून निवड केली जाईल त्याच्या मागे आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहाणार असल्याची ग्वाही यावेळी खुद्द आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.
दरम्यान, सभास्थानी तासभर आधीच स्थानिक पत्रकारांनी गर्दी केली असतां, आयोजकांकडून बैठकीचे वार्तांकन करण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला . मात्र यावेळी आयोजित बैठकीत उपस्थितांमध्ये मोठी खडाजंगी होणार अशी आशा बाळगून सुमारे तास दीड तास सभागृहाबाहेर ताटकळत बसलेल्या पत्रकारांच्या हाती शेवटी विशेष कांहीच न लागल्याने त्यांचाही हिरमोड झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. कांदोळीत आयोजित कॉग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनपर बैठकीत उपस्थित पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम, पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर, जिल्हाध्यक्ष विजय भिके, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, आग्नेलो फर्नांडिस व इतर नेते उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.