कॉम्युटर इंजिनिअरिंगमधून ड्रॉपआऊट झालेल्या विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने कॅसिनोचे बनावट संकेतस्थळ तयार केले.
ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळाप्रकरणी गोवा पोलिसांनी 22 वर्षीय विद्यार्थ्याला हैद्राबाद येथील फाईव्ह स्टार हॉटेलमधून अटक केली आहे.
आदला नितीन रेड्डी (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो कंपनी बिग डॅडीकडून याप्रकरणी तक्रार दाखल दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
संशयिताने तयार केलेल्या संकेतस्थळावर बिग डॅडी कॅसिनोचा लोगो आणि फोटो होता. तो देशातील विविध स्थळावरुन संकेतस्थळ चालवत होता. यासंबधित सर्व माहिती गोळा केल्यानंतर सध्या तो हैद्राबाद येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सायबर विभागाच्या वतीने तात्काळ एक टीम तयार करण्यात आली, या टीमने संशयिताला हैद्राबाद येथून अटक केली. अटक आदला रेड्डीने पेड डोमेन देणाऱ्यांकडून तांत्रिक मदत घेतली आणि Chat GPT च्या मदतीने कॅसिनोचे संकेतस्थळ तयार केले, अशी माहिती त्यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना दिली.
आदला रेड्डी याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.