मडगाव: कोलवा पोलिस ठाण्यातील लाच प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, या ठाण्यातील एका उपनिरीक्षकाच्या डोक्यावरही आता टांगती तलवार आहे. प्रथमेश महाले असे या उपनिरीक्षकाचे नाव असून तो गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. सध्या त्याची फाईल ‘डीआयजी’कडे तपासासाठी पाठवली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रितेश तारी यांची सोमवारी (ता.२८) रात्री तडकाफडकी बदली दक्षिण गोवा राखीव पोलिस दलात केली असून, कोलवा पोलिस ठाण्याचा निरीक्षकपदाचा तात्पुरता ताबा मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.
चोरीचा माल पकडून, नंतर तो पोलिस ठाण्यात न आणता परस्पर बाहेर विकला होता. मायणा-कुडतरी पोलिसांनी एका चोरी प्रकरणात संशयिताला पकडले असता, त्याने चोरीची कबुली दिली खरी. मात्र, तीन पोलिसांनी आपल्याकडून लाच घेऊन सोडून दिले होते, असे सांगितले होते.
त्यानंतर चौकशी सुरू झाली असता, या गैरकृत्यात कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अमर गावकर, सिद्देश शिरोडकर, सत्यम देसाई हे तिघेजण गुंतले होते, हे स्पष्ट झाले. नंतर सोमवारी या त्रिकुटाला दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केले तर उपनिरीक्षक महाले याची फाईल ‘डीआयजी’कडे पुढील कारवाईसाठी पाठविली.
कोलवा लाचप्रकरणी गोत्यात आलेला उपनिरीक्षक प्रथमेश महाले याची बदली झाली असून, त्याला दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक कार्यालय राखीव पोलिसांत पाठविले आहे. सध्या या लाच प्रकरणात निलंबित झालेल्या त्या तीन पोलिसांनी पोलिस निरीक्षक रितेश तारी आणि उपनिरीक्षक प्रथमेश महाले या दोघांची नावे घेतल्याने उभयतांवर ही कारवाई केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
ज्या भंगारवाल्याला निलंबित पोलिसांनी माल विकला आहे, त्याचीही सध्या पोलिस चौकशी करीत आहेत. त्या भंगारवाल्यालाही निलंबित पोलिसांनी धमकाविले होते. या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तुला अडचणीत आणू व बेड्याही ठोकू, असे या पोलिसांनी सांगून त्याच्याशी मांडवली केली होती. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. मात्र, हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.