पणजी: नीट पेपरफुटीप्रकरणात दिल्लीत आंदोलन छेडत धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह सौरभ दास व आशुतोष रांका येत्या रविवारी गोव्यात येणार आहेत.
हे तिन्ही नेते रविवारी सायंकाळी ४ वाजता पणजी कन्वेन्शन सेंटरमध्ये ‘सीजेपी’च्या गोवा विभागातर्फे आयोजित ‘कुठे चाललाय गोवा?’ कार्यक्रमात सहभागी होऊन राज्यातील तरुणाईचे प्रश्न समजून घेणार आहेत. पणजीतील आझाद मैदानावर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा सीजेपीच्या नेत्या अमरिन शेख यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ‘सीजेपी’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष क्षितीज पगार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘‘देशभरातील तरुणाईला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या हेतूने सोशल मीडियावर स्थापन केलेल्या ‘सीजेपी’ने प्रत्येक राज्यात जाऊन तेथील तरुणाईशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ‘सीजेपी’चे दीपके, दास आणि रांका रविवारी गोव्यात येत आहेत. पणजीतील कन्वेन्शन सेंटरमध्ये रविवारी सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान आयोजित ‘कुठे चाललाय गोवा?’ या कार्यक्रमात सहभागी होऊन ते गोव्यातील तरुणाईसह इतरांचे प्रश्न घेतील आणि ते सोडवण्याची मागणी राज्य सरकारकडे करतील’’, असे शेख म्हणाल्या.
विधानसभा निवडणूक लढवणार नाही!
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘सीजेपी’चे तीन मोठे नेते गोव्यात येत असल्याने ‘सीजेपी’ गोवा विधानसभा निवडणुकीत उतरणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, ‘‘सीजेपीला निवडणुका लढवण्याची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही गोवा विधानसभा निवडणुकीत उतरणार नाही. बाहेर राहूनच तरुणाईचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव निर्माण करणार आहोत’’, असे क्षितीज पगार म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.