पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे गोव्यासह देशभरात आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहेत. याचा फायदा राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी घ्यावा. केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप, स्टँड अप’ योजनांचा लाभ घेऊन रुग्णांची सेवा करता करता वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इतर व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक डॉक्टर्स डे निमित्त गोवा आयुर्वेदिक कौन्सिलमार्फत मंगळवारी पणजीत मुख्यमंत्री सावंत यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. शेखर साळकर यांच्यासह कौन्सिलचे पदाधिकारी आणि आयुर्वेदिक डॉक्टर उपस्थित होते.
राज्यातील डॉक्टरांना आरोग्य क्षेत्रामध्ये अधिकाधिक काम करण्याची मोठी संधी आहे. परंतु, त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच इतर राज्यातील स्वयंसेवी संस्था गोव्यात येऊन काम करीत आहेत, याचा आयुर्वेदिक डॉक्टर आणि इतरांनीही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
स्टार्ट अप किंवा स्टँड अप या योजना केवळ आयटी क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत. या योजनांचा लाभ आरोग्य क्षेत्रात काम करतानाही घेता येऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
चार हजारांच्या पगारावरून सुरुवात
आयुर्वेदिक डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर आपण सुरुवातीला महिन्याला चार हजार रुपयांची नोकरी पत्करली. नऊ महिन्यांनंतर ती नोकरी सोडून स्वत:चा दवाखाना सुरू केला. त्याकाळात आलेल्या सर्वच संकटांवर आपण यशस्वी मात केली. त्यानंतर काही महिन्यांनी सरकारी नोकरीत रूजू झालो, अशा आठवणीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
वेलनेस टुरिझमसाठी सहकार्य आवश्यक
राज्यात वेलनेस टुरिझम सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी राज्यातील डॉक्टरांकडून सरकारला पूर्ण सहकार्य मिळणे गरजेचे आहे. वेलनेस टुरिझमला भावी काळात चालना देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.