‘पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय’ कबीरदास यांचा हा दोहा कदाचित आपण ऐकला असणार. वर्तमान काळात इतिहासावर बरीच चर्चा होते.पोर्तुगीजांनी गोव्यावर साडे चारशे वर्ष राज्य केले हा इतिहास चुकीचा आहे, असा दावा हल्लीच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केला होता.गोव्यात सासष्टी, तिसवाडी व बार्देश सोडून गोव्याच्या इतर भागात शिवशाही होती, असा दावा मुख्यमंत्र्यांनी हल्लीच आपल्या भाषणात केला होता. यावर उदय भेंब्रे यांनी हरकत घेतली असून मुख्यमंत्री स्वतः इतिहास न वाचता जनतेच्या माथी खोटा इतिहास मारीत आहे, असा दावा उदयबाब यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासाचा दाखला दिला असून गोव्यात शिवशाही होती, हा इतिहास डॉ. सावंत यांना कुठे सापडला, याचा उलगडा करण्याचे आव्हान भेंब्रे यांनी दिलेय. आता मुख्यमंत्री उदय भेंब्रे यांना किती गांभीर्याने घेतात हे पहावे लागेल! ∙∙∙
‘मान ना मान मैं तेरा मेहमान’ असा हिंदीत एक वाक्प्रचार आहे. राज्यात नव्या एनईपी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण खाते व शिक्षणाशी संबंधित अधिकारी अविरतपणे झटत आहेत. नवे शिक्षण धोरण विद्यार्थी-पालकांनी स्वीकारावे, यासाठी जनजागृतीही करत आहेत. मात्र, या चांगल्या कामात खो घालण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसतात. नव्या शिक्षण धोरणामुळे नवीन शालेय वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू करण्याचे शिक्षण खात्याने ठरविले आहे. याला सर्व प्रथम विरोध केला तो काही शिक्षकांनी. नंतर काही शाळा चालक व मुख्याध्यापकांच्याही पचनी हा प्रकार पडला नाही. आता म्हणे काही पालकही नव्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यासाठी पुढे आले आहेत. या पालकांनी म्हणे शिक्षण खात्याला निवेदन सादर करून नवीन शालेय वर्ष पूर्वीसारखेच जून महिन्यात सुरू करण्यासाठीची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला व एप्रिल मध्ये शालेय वर्ष सुरू करण्यास जे पालक विरोध करीत आहेत. त्यांची मुले ‘सीबीएससी’ शाळेत शिकत आहेत. जिथे एप्रिलपर्यंत शाळा चालते. विरोध करणाऱ्या काही पालकांनी आपल्या मुलाला ‘होम स्कूलिंग’द्वारे शिकविले आहे. मग ज्यांना नव्या शिक्षण धोरणाचे सोयर सुतकच नाही, ते सरकारकडे विरोध करण्याचे नाटक का करतात? ∙∙∙
कदंब महामंडळाचे कर्मचारी गेली कित्येक महिन्यांपासून प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी ‘आयटक’च्या नेतृत्वाखाली मोर्चे काढत आहेत. गेल्या महिन्यात संपाचा इशारा दिल्यानंतर त्यांना सरकारकडून आश्वासन मिळाले होते. आता पुन्हा एकदा कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. महांडळाच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय राज्य सरकार त्यांची दखल घेत नाही, असे वारंवार दिसून आले आहे. बससेवेतील कर्मचाऱ्यांच्या समस्येंविषयी अनेक राज्यांमध्ये मात्र आंदोलने कधी झालेली दिसत नाहीत. तेथील संघटना मजबूत आणि आक्रमक असल्याने त्यांच्यासमोर सरकारला माघार घ्यावी लागते. गोव्यात आश्वासनावर गळचेपी केली तरी काही फरक पडत नाही, असा होरा सरकारचा असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा १९ मार्चचा संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही तारीख आल्याने पुन्हा आश्वासनच मिळणार की कर्मचारी काही पदरात पाडून घेणार, हे त्या दिवशी कळेलच. ∙∙∙
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या का घटली, याचे कारण काहीही असो. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी त्याचे खापर इडली सांबारावर फोडले आहे. गोव्यातील शॅकमधील इडली सांबार खाण्यासाठी पर्यटकांनी का यावे, असा त्यांचा रोखठोक सवाल आहे. त्यात बरेच तथ्यही आहे, अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे. मूळ गोमंतकीय खाद्यपदार्थच पर्यटकांना उपलब्ध झाले पाहिजेत, असे ही चर्चा करणाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी गुजरातपासून तमीळनाडूपर्यंतचे खाद्यपदार्थ देणाऱ्या रेस्टॉरंटची गोव्यात सध्या चलती आहे त्याचे काय. लोबो शॅक परवानाधारक अटींचे उल्लंघन करतात, त्यावर बोलत होते. मात्र त्यांनी बोलण्याचा इडली सांबाराची फोडणी दिल्याने त्याचे वक्तव्य देशभरात चर्चेचे ठरले आहे. ∙∙∙
खाजन शेतीचा प्रश्न हा सध्या बराच गाजत असून नेवरा पंचायतीच्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. गेल्या २० वर्षापासून हा विषय प्रलंबित राहिल्याने निदान आता तरी याचा सोक्षमोक्ष लागावा, अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्ती केली. त्यात नेवरा टेनंट संघटनेचे अध्यक्ष जयंत शिरोडकर यांनी जबाबदारी घेत मतदार नसतानाही लोकांच्या प्रश्नांना सामोरे गेले. परंतु अध्यक्षांच्या काही बाबींना आमदार विरेश बोरकर यांनी आक्षेप घेत ते खोटे बोलत असल्याचा आरोप केल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. अध्यक्षांना नेवरा ग्रामसभेला येण्याची सक्ती नव्हती, या पूर्वीचे बहुतांश अध्यक्षांचे तोंड देखील लोकांनी पाहिलेले नाही. हा विषय गंभीर असताना आमदार, पंचायत, टेनंट संघटना, मामलेदार कार्यालय यांच्या समन्वयाने सोडवण्याची गरज आहे. विरेशरावांनीही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात खाजन शेतीच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यावर तोडगा काढण्यासाठी ‘सबका साथ’ हाच एकच मार्ग असल्याची चर्चा सांतआंद्रेतून ऐकू येते. ∙∙∙
बाणस्तारी मार्केट संकुलात असलेला वडेश्वराचा वटवृक्ष मध्यरात्री कोसळला. आता हा वटवृक्ष दिवसा कोसळला असता तर मोठा हाहाःकार माजला असता, कारण बाजाराच्या दिवशी या मार्केट संकुलात ग्राहक आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी असते. या जुनाट वटवृक्षासंबंधी स्थानिक पंचायतीने आपत्कालीन निवारण यंत्रणेला कळवले होते, त्यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता, पण संबंधित यंत्रणेने ‘हु की चू’ केले नाही, त्यामुळेच हा वटवृक्ष कोसळला. संबंधित यंत्रणेने वेळीच कार्यवाही केली असती तर...हा विचार लोकांच्या मनात येणे आवश्क आहे. ∙∙∙
उद्यापासून मार्च सुरू होत आहे. राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका, झपाटा हळूहळू ओसरू लागलाय. काणकोणला खूप कार्यक्रम व्हायचे. भाषा मंडळाची रेलचेलही कमी आहे. दरम्यान आज विज्ञान दिवस. कोकणीत खूप विज्ञान पुस्तके येणार, असा घणाघाती गगनभेदी आवाज झाला होता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व इतर शाखांतील परिभाषिक शब्दावली तयार होण्याअगोदरच ही पुस्तके तयार झाली तर ती चमत्कारवजा पराकोटीची विक्रमी झेप ठरेल. उत्तर भारतात हिंदीतून ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम सुरू झालाय तसाच कोकणीतही सुरू होऊ शकतो, वाट पाहू. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.