Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, छत्रपतींचा इतिहास पोचणार घराघरांत

Khari Kujbuj Political Satire: पणजीच्या उर्वरित कामाचे कंत्राट ज्या कंपनीने घेतले आहे, त्या कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा काय आहे?

Sameer Panditrao

छत्रपतींचा इतिहास पोचणार घराघरांत

आग विझविण्यासाठी आगीचा वापर करीत नाहीत. तसेच वादाला उत्तर वाद होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून संपूर्ण देशात वाद पेटला आहे. गोव्यातही हा वाद बराच गाजला. मात्र, यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अनुयायांनी आता छत्रपतींचा इतिहास घराघरांत पोचविण्याचा संकल्प केला आहे. महाराजांच्या इतिहासावर नाट्यस्पर्धा घेणे, एकांकिका स्पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा व मोनोलॉग स्पर्धा भरविणे, किल्ले बनविण्याची स्पर्धा घेणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील इतिहासाची पुस्तके घराघरांत पोचविण्याचा विडा या युवा शिवप्रेमींनी उचलला आहे. वादाला खरे उत्तर असेच असायला हवे नाही का?∙∙∙

स्मार्ट कामाचा दर्जा काय?

पणजीच्या उर्वरित कामाचे कंत्राट ज्या कंपनीने घेतले आहे, त्या कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा काय आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मार्केट परिसरातील रस्त्यांचे व गटारांचे काम ज्या गतीने उरकले जात आहे, ते पाहता पावसाळ्यात ही कामे किती तुघलकी आहे हे दिसणार आहे असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या अभियंत्यांनी खरे तर या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे आणि चांगल्यापद्धतीने कामे करून घेणे आवश्यक आहे, परंतु ते केले जात नाही असे दिसते. ३१ मार्च ही रस्त्याची कामे संपविण्याची तारीख दिली असल्याने सध्या कामे कशीही पूर्ण करा आणि त्याची छायाचित्रे काढून न्यायालयात सादर करा, असाच हेतू या काम करणाऱ्या कंपनीचा असल्याचे दिसते. खरे तर कोट्यवधी रुपये खर्च या कामावर होत आहे आणि जर दर्जाहीन कामे होणार असतील तर सगळी अनागोंदी असल्याचेच दिसते. जी कंपनी ही कामे करीत आहे, ती नावाजलेली आहे, परंतु पावसाळ्यात तिने केलेल्या या कामाचा दर्जा उघड होईल, तेव्हा दोष देण्याशिवाय काहीही आपल्या हाती नाही, हे नागरिकांनी समजून चुकले आहे. ∙∙∙

खासगी बसमालक अधांतरीच

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील खासगी बसमालकांना सरकारने घोषणा केलेली इंधनावरील सबसिडी योजना मिळण्याची शक्यता नाही हे मुख्यमंत्र्यांनीच या बसमालक संघटनेला स्पष्ट केले आहे. त्यामुळे संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर अपयश आले आहे. सरकारने काही तांत्रिक अडचणी सांगून येत्या बजेटमध्ये या सबसिडीची तरतूद करण्यात आलेली नाही. खासगी बसमालकांना राज्यातील हा पारंपरिक व्यवसाय काही दिवसांनंतर बंद करण्याची वेळ येणार आहे. सरकारला ‘म्हजी बस’ ही योजना पुढे रेटायची आहे. त्यामुळे या संघटनेच्या मागण्या मार्गी लागण्याची शंका अंधूक बनली आहे. आंदोलने व धरणे धरूनही गेल्या पाच वर्षांपासून सरकारने फक्त आश्‍वासनेच दिली आणि ऐनवेळी या बसमालकांना तोंडघशी पाडले आहे. राज्यात इलेक्ट्रिक बसेस आल्या. मात्र, त्याचा फायदा डिजीटलचे ज्ञान नसलेल्यांना झालेला नाही. वृद्धांना तर खासगी बसच बरी असे वाटू लागले आहे. सरकारची ही भूमिका बदलली नाही, तर आणखी काही वर्षांनी खासगी प्रवासी बस नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. ∙∙∙

फोंड्यात इच्छुकांची संख्या वाढली

फोंडा मतदारसंघात भावी आमदारांचे लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही प्रकारे मतदारांसमोर जायला हवे यासाठी येन केन प्रकारेण वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रम आणि आंदोलन करू पाहणाऱ्यांसह सहभागी होण्यासाठी या भावी आमदारांकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. सध्या फोंड्यात या भावी आमदारांची संख्या चार जरी असली तरी विधानसभा निवडणूक जवळ येइस्तो त्यात आणखी दोघा तिघांची भरही पडेल, पण मतदार कुणाला कौल देतात ते पाहणे रंजक ठरेल. ∙∙∙

मायकल लोबो आणि टॅक्सीवाल्यांचे गणित

मायकल लोबो हे नाव घेतलं की लोकांच्या अपेक्षा जाग्या होतात. ‘लोकांचे प्रश्न मांडणारा नेता’ अशी त्यांची ओळख आहे, पण यावेळी विधानसभा अधिवेशनात ते नक्की कोणते मुद्दे घेऊन पुढे येणार, यावर वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. सगळ्यात मोठी चर्चा आहे ती टॅक्सीवाल्यांमध्ये. ते म्हणतात, मायकल आमचे प्रश्न नक्कीच मांडणार, पण गंमतीची गोष्ट अशी की, हे बोलतानाच ते पूर्ण खात्रीने म्हणत नाहीत. काही टॅक्सीचालकांचा अंदाज आहे की, मायकलनी याआधी आमच्यासाठी आवाज उठवला, पण यावेळी बहुतेक ते सरकारला पाठिंबा देतील आणि आमच्या मागण्या बाजूला ठेवतील. मायकल अधिवेशनात काय बोलणार, याकडे टॅक्सीवाल्यांचे विशेष लक्ष लागले आहे. मायकल यांच्या बोलण्यावरच ठरणार, तो लोकांचा आवाज उठवणारा नेता आहे की सरकारला मूक पाठिंबा देणारा? आता अधिवेशनात नेमके काय होते याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे! ∙∙∙

चाय पे चर्चा

हल्लीच सावर्डे येथे एका हॉटेलात भाजपचे आमदार गणेश गावकर, उल्हास तुयेकर यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा व आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी एकत्र बसून चहा घेतला. यावेळी उभयतांमध्ये बरीच चर्चा चालू होती. हे सर्व आमदार दाभाळ येथे खनिज डम्पची पाहणी करण्यासाठी गेले होते. नंतर त्या सर्वांनी एकत्र चहापानही केले. आता विरोधी पक्षाचे असले म्हणून काय झाले. चहा एकत्र घेऊ शकत नाही असे थोडेच आहे? मात्र या चहापानाची केपे मतदारसंघात बरीच चर्चा सुरू झाली आहे. एल्टनबाब भाजपात तर जाणार नाही ना असा या चर्चेचा विषय आहे. आता कपभर चहावर कुणी दुसऱ्या पक्षात जातो का? काहीही असू दे लोकांना चर्चेसाठी एक विषय मिळाला हे मात्र खरे. ∙∙∙

मंत्री मोन्सेरात यांची शिमगोत्सवाला अनुपस्थिती!

राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू राहत दणक्यात झाली. लहानथोरांपासून अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला. मुख्यमंत्र्यांसह पर्यटनमंत्र्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र, राजधानीचे स्थानिक आमदार व मंत्री बाबुश मोन्सेरात हे मात्र दिसले नाहीत. त्यांचे पुत्र महापौर रोहित मोन्सेरात हे मात्र आवर्जून आले होते. मंत्री मोन्सेरात यांची या शिमगोत्सव मिरवणुकीला अनुपस्थिती दिसल्याने काही लोकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यांनी पणजीतील कार्निव्हलच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, तर शिमगोत्सवात त्यांना रस नाही असे यावरून दिसून आले. भाजपचे केंद्रीय नेते राज्यात आल्यासच मंत्री मोन्सेरात हे दिसतात. मात्र, ते आपल्याच विश्‍वास दंग असतात. एरव्ही ते ताळगावात आपल्या मित्रमंडळींबरोबर फिरताना दिसायचे, तेही अलीकडे दिसेनासे झाले आहे. त्यांचे पुत्र हे पणजीचे महापौर झाल्यापासून त्यांनाच राजकारणात अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ते भाजपच्या कळपात असले तरी मनाने ते भाजपशी एकनिष्ठ आहेत की नाही हे कोडेच आहे. ∙∙∙

‘आरजी’चे एकला चलो रे!

रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी चक्क नवीन पायंडा पाडला आहे आणि तो म्हणजे विरोधात राहून विरोधकांच्याही विरोधात जाण्याचा! सरकारला विरोध तर आहेच, पण बाकी विरोधकांनाही ते जुमानत नाहीत. त्यामुळे आरजी आता “एकला चलो रे” मोडमध्ये गेल्याची चर्चा मोठीच रंगत आहे. विधानसभेत ते कुणाच्या गटात नसून स्वतंत्र रणनीती आखत आहेत, त्यामुळे त्यांची भूमिकाच आता कुतूहलाचा विषय ठरतेय. विरोधकांच्या बैठकीत बोरकर दिसत नाहीत आणि सरकारच्या कॅम्पमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. मग ते नक्की कुणाच्या बाजूने आहेत? बहुतेक बोरकरांनी ‘मी स्वतःच माझा पक्ष आणि माझा नेता’ अशी भूमिका घेतली असावी. विधानसभेत एकट्यानेच सरकार आणि विरोधकांना कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न रंगात येतोय की हाताशी काहीही न लागता गाजर दाखवून सुसाट होतोय, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT