साखळी: अवकाश संशोधन, अणु तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आपण बोलत असताना या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. भारताने ‘चांद्रयान ४’ अवकाशात सोडले. या चांद्रयानाचा डोम गोव्यातील पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीत तयार झाला होता, ही अभिमानास्पद बाब आहे.
यातून प्रेरणा घेताना येणाऱ्या काळात चांद्रयान अवकाशात झेपावत असताना गोव्यातील एक शास्त्रज्ञ या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेला आम्हाला पाहायचे आहे. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही शिक्षकांची असून शिक्षकांनी त्या पद्धतीने कामगिरी बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
साखळी येथील शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव गावस, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर व इतरांची उपस्थिती होती.
मुलांना समुद्रकिनारी पिकनिकसाठी नेण्याचे थांबवा, खात्यामार्फत तसे परिपत्रकच काढावे. यापुढे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साळगाव व काकोडा, एनआयओ, आयसीआर ओल्ड गोवा, जल क्रीडा इन्स्टिट्यूट दोनापावला, आयुष इन्स्टिट्यूट धारगळ या ठिकाणी शाळेच्या, हायस्कूलच्या मुलांना पिकनिकसाठी न्यावे, त्यांना मोठा अभ्यास मिळणार. अंटार्क्टिका जाण्यासाठी एक केंद्र गोव्यात आहे. त्या केंद्रात एकदातरी विद्यार्थ्यांना न्यावे व अनुभव द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
‘विकसित भारत २०४७’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. तेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत आहेत. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून यात युवांची भूमिका ही मोठी आहे. या संकल्पनेत भाग घेताना सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःचा शोध घेण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण स्वतःचा शोध घेत नाही, तोपर्यंत आपले ध्येय धोरण काय, हे आपल्याला समजणार नाही. आपले ध्येय सर्वप्रथम निश्चित करून ते गाठण्यासाठी आपण झटायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याला असतो. त्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहीत नसणे ही खेदची बाब आहे. ही जबाबदारी शिक्षकांची असून ‘मन की बात’ कार्यक्रम यापुढे सर्वांनी पाहावा. या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारत देशात तसेच जागतिक पातळीवर महिनाभरात घडलेल्या विविध गोष्टींचा आढावा घेतला जातो. हा कार्यक्रम आपल्या सामान्य ज्ञानात भर घालणारा अभिनव असा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे माय भारत या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाला मोठे महत्त्व असून जोपर्यंत आपल्या जीवनातील व सभोतालच्या गोष्टींकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत नाही, तोपर्यंत आम्हाला जीवनातील विज्ञान समजणार नाही. यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम ‘विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे’ ही आहे. अवकाश संशोधन, अणु तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर अभ्यास करताना मुलांनी संवेदनशील, नावीन्यपूर्ण, जबाबदार व धाडसी व्हावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.