Police Finally Nab Priya Yadav Who Defrauded Job Seekers
डिचोली/पणजी: नोकरीच्या आमिषाने डिचोलीतील अनेकांना कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेली प्रिया यादव अखेर आज पोलिसांच्या जाळ्यात अडकली. प्रियाला डिचोली पोलिसांनी अटक केली असून तिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिस खात्याच्या वरिष्ठ सूत्रांकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे. मात्र, प्रिया यादवला कोठे आणि कधी अटक केली, त्याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. प्रिया यादव हिच्या अटकेसंदर्भात उद्या विस्ताराने उलगडा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ‘कॅश फॉर जॉब’ स्कॅम प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्या पोलिस रिमांडची मुदत संपणार असल्याने तिची जामिनावर मुक्तता होणार, की अन्य फसवणूक प्रकरणात पोलिस तिला ताब्यात घेणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे. राज्यात सध्या गाजत असलेले नोकरी विक्री प्रकरण अतिशय गंभीर असूनही त्याचे तपासकाम कूर्मगतीने सुरू आहे. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने अनेकांना लाखो रुपये घेऊन नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. तिच्याविरुद्ध विविध पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.
संशयित पूजा नाईकवर कारवाई झाल्यानंतर फसवणूक प्रकरणातील इतरांविरुद्धही विविध पोलिस स्थानकांत तक्रारी नोंद झाल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करून काहीजणांना अटक केल्यानंतर ते जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासकामाबाबत लोक संशय व्यक्त करत आहेत. नोकरीच्या आमिषाला बळी पडल्याची आणखी काही प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, काहीजण आपली बदनामी होईल, या विचाराने पुढे येत नाहीत.
तक्रारदारांनी नोकऱ्यांसाठी प्रकाश राणे याला रोख रक्कम दिली होती. त्यामुळे पोलिसांना पुरावे मिळविण्यात अडचणी येत आहेत. मात्र, राणे कुटुंबीयांच्या मालमत्तेची आणि बँक खात्यावरील पैशांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.
पणजी पोलिसांनी निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश मुकुंद राणे याच्याविरुद्ध नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. अटक केल्यानंतर तो इस्पितळात दाखल झाला होता. या काळात त्याने दाखल केलेला जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे. चौकशीवेळी तो आजाराचे सोंग घेऊन काहीच माहिती देत नाही. त्यामुळे पोलिस हैराण झाले आहेत.
पूजा नाईकने काहीजणांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. त्यासाठी तिला कोणी मदत केली, याच्या मुळापर्यंत अद्याप पोलिस पोचलेले नाहीत. या नोकरी विक्री प्रकरणात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या या प्रकरणाचा तपास कूर्म गतीने सुरू आहे. न्यायालयातही जामिनावेळी पोलिसांकडून प्रखरपणे विरोध होत नसल्यानेच संशयितांना जामीन मिळत आहे.
रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरून संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह २० हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ती लहान मुलीसमवेत डिचोलीत एका फ्लॅटमध्ये राहात होती. दोन महिन्यांहून अधिक काळ प्रिया फरार होती. अखेर डिचोली पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.
प्रियाने डिचोलीतील नागरिकांचा खास करून महिलांचा विश्वास संपादन केला होता. काहींना तिने आपले नाव ‘प्रिया नाईक’, तर काहींना ‘प्रिया यादव’ नाव असल्याचे सांगितले होते. प्रिया सावज हेरून नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालायची.
प्रियाने काहीजणांकडून आपल्यासह मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे उकळल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या कामात प्रियाला मदत केल्याच्या आरोपावरून तसेच ‘मास्टरमाईंड’ असल्याच्या संशयावरून रोहन वेंझी या पोलिसाला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे.
नोकऱ्यांचे आमिष दाखविणारे आणि काही सरकारी अधिकारीही तिच्या संपर्कात होते. मात्र, त्यांची माहिती मिळविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास काही राजकीय नेत्यांची नावेही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयित पूजा नाईकचे हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यात येईल, असे आश्वासन पोलिस महासंचालकांनी आठवड्याभरापूर्वी दिले होते. मात्र, ते अद्याप का दिले नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.