काणकोण, येणाऱ्या तीस वर्षांत समृद्ध काणकोणचे स्वप्न पूर्ण करू. भौतिक विकासाबरोबरच मानवी विकास महत्त्वाचा आहे.
येत्या काही वर्षांत काणकोणचा कायापालट होणार आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी आज येथे आपल्या वाढदिन सोहळ्यात सांगितले.
ते म्हणाले, गावडोंगरी व खोतीगावातील पेयजल समस्या निकालात काढण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्चून गावणे, गावडोंगरी व खोतीगाव येथे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. गावणे धरण जलाशयातील पाणी जलवाहिनीद्वारे थेट या जलकुंभात नेऊन त्याचे शुद्धीकरण करण्यात येऊन ते नागरिकांना पुरविण्यात येणार आहे.
सभापती व काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांचा वाढदिवस पद्मश्री दादा इदाते यांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला. आदर्श युवा संघ, बलराम शिक्षण संस्था व भाजप मंडळ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे शेळेर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, सरपंच आनंदु देसाई, निशा च्यारी, सेजल गावकर, सविता तवडकर, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, बलराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर, आदर्श युवा संघाचे अशोक गावकर, आंतोन कार्दोज, वीज कार्यकारी अभियंता सावंत, वीज खात्याचे साहाय्यक गोविंद भट, महिला मोर्चाच्या चंदा देसाई, वृंदा सतरकर उपस्थित होत्या.
ते पुढे म्हणाले, की काणकोण पालिका क्षेत्रातील चार रस्ता ते चावडीपर्यंतच्या भागाचे २० कोटी व लोलये पंचायत क्षेत्रातील मुख्य भागाचे १६ कोटी रुपये खर्चून गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात ३६ विकासकामांचे उद्दिष्ट ठेवले, त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. श्रमधामाचा विषय पंतप्रधानापर्यंत चर्चिला गेला आहे.
तत्पूर्वी सभापती तवडकर यांनी चावडी येथे ६३.७८ लाख खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुलभ शौचालयाची पायाभरणी केली. त्यानंतर काणकोण पोलिस स्थानकावर आयआरबी क्लबचे उद्घाटन केले. यावेळी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्रमधाम योजनेखाली तिर्वाळ येथे उभारण्यात आलेल्या शासकीय प्राथमिक विद्यालयात सत्यनारायण महापुजेला त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर बलराम एज्युकेशन सोसायटी संचलित बलराम निवासी शाळा, बलराम उच्च माध्यमिक विद्यालय व बलराम डे केअर विद्यालयात सभापतींच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई यांनी स्वागत केले, तर अंकुश गावकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गावकर, कृष्णा पालेकर व संतोष लोलयेकर यांनी केले. यावेळी ‘समरसतेचा वारकरी’ या पद्मश्री दादा इदाते यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचेही यावेळी भाषण झाले.
रमेश तवडकर हे समाज शिक्षक : पद्मश्री दादा इदाते
सभापती रमेश तवडकर हे समाज शिक्षक आहेत. बिंदूपासून सुरू झालेले काम विश्वरूपी बनले पाहिजे. ज्यांनी समाज परिवर्तन केले त्यातील एक सभापती रमेश तवडकर आहेत. आमच्या राष्ट्रपती आज जगन्नाथपुरीत गेल्या आहेत हा बदल आहे.
वनवासी कल्याण आश्रमासारखी संघटना आज सक्षम आहे. ज्ञानेश्वरांची ज्या समाजाने हेळसांड केली त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान लिहिले. संस्कारामध्ये सातत्य असायला हवे. नेता हा सर्वांना उपलब्ध असायला हवा. सात्विक कार्यकर्त्यात हवे ते गुण रमेश तवडकर यांच्यामध्ये आहेत, असे पद्मश्री दादा इदाते यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.