पणजी : गोवा सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या शनिवारी होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये तीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र यात कोणत्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. यापूर्वी 28 मार्च रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य 8 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
गोव्याच्या कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त 11 मंत्र्यांचा समावेश असू शकतो. सध्या गोव्याच्या मंत्रिमंडळात तीन जागा रिक्त आहेत. या जागांवर नेमकी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या तीन जागांपैकी एका जागेवर कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दुसऱ्या जागेसाठी मगोपचे (MGP) नेते सुदिन ढवळीकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तिसऱ्या जागेवर कुणाला संधी मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या जागेसाठी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर आणि अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी (Pramod Sawant) सर्व महत्त्वाच्या खात्यांचं वाटप आधीच केलेलं असल्याने नवीन मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याचीही चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या फेरीत शपथबद्ध झालेल्या मंत्र्यांना सर्व महत्त्वाची खाती दिली आहेत. तर गृह आणि वित्त यासारखी अतिमहत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. मगोपच्या सुदिन ढवळीकरांना (Sudin Dhavalikar) पॉवरफुल असं वीज खातंही मिळू शकतं. दुसरीकडे मगोपचे दुसरे आमदार जीत आरोलकर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र मंत्रिपद मिळाल्यास सुदिन ढवळीकरांच्या सल्ल्यानेच त्याचा स्वीकार करणार असल्याचं तसंच पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार नसल्याचंही जीत आरोलकर यांनी स्पष्ट केलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.