पणजी: भाजपचे कार्यालय हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखेच असते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात केले. गोवा भाजप मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अनुपस्थितीत फडणवीस यांच्या हस्ते कदंब पठारावर साकरण्यात येणाऱ्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हजर राहणार होते. पण, नड्डा यांना दिल्लीत महत्वाच्या बैठका असल्याने त्यांच्या ऐवजी फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
'आपण सख्खे शेजारी आहोत, गोवा आणि महाराष्ट्राचे जवळचे नाते आहे. पुढची पन्नास नव्हे तर शंभर वर्षे हे भाजपचे कार्यालय राहणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदारच नव्हे तर भागीदार देखील आपण आहोत', असे फडणवीस म्हणाले.
'आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला आहे. शिवाजी महाराज जो मुलूख जिंकत होते त्याठिकाणी एक तटबंदी असलेला किल्ला बांधत होते. हा किल्ला चांगल्या वाईट काळात स्वराज्याचे रक्षण करायचा. आजची लढाई तलवारीची नाही ती बॅलेट बॉक्सची आहे.'
'भाजपचे कार्यालय देखील छत्रपतींच्या किल्ल्यासारखंच आहे. जे कार्यालय कुठल्याही क्षणी कारभार चालविण्यासाठी आधार देतं. तसेच, सामान्य नागरिकाला ते आपलं कार्यालय आहे, असं वाटतं. भारतीय जनता पक्षाचे संचलन येथून चालतं हे कळावं यासाठी कार्यालयाचं महत्व असतं', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेसवर टीका
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवर टीका करताना संविधानाची भाषा करणारा काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये मात्र संविधान संपविण्यासाठी काम करतोय. ३७० कलम हटविण्याची भाषा करतोय.
विरोधकांची रणनिती लोकशाही विरोधी आहे. त्यांची ही रणनिती देशात अराजकता माजविण्याच्या उद्देशाने सुरू आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाला सजक राहुन लोकशाही टिकविण्याच्या दिशेने काम करायला हवं, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
'लाडक्या बहिणींचे देवाभाऊ'
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फडणवीसांची ओळख करुन देताना लाडक्या बहिणीचे देवाभाऊ अशी करुन दिली. तसेच, फडणवीसांना येत्या विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गोवा विधानसभेची निवडणूक नव्या भाजप मुख्यालयातून लढून जिंकायची आहे. गोव्याचा विकास भाजप सरकारच्या कार्यकाळात झाला. विविध लोककल्याणकारी योजना राबविण्याचे काम भाजपनेच केल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.