Janjatiy Gaurav Yatra Ramesh Tawadkar Govind Gaude Dispute
साखळी/फोंडा: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभर होणाऱ्या ‘जनजाती गौरव यात्रे’चा एक भाग म्हणून गोवा सरकारच्या आदिवासी खात्याने ‘पत्रादेवी ते काणकोण’ यात्रेचे आयोजन केले आहे.
ज्यादिवशी यात्रेचा शुभारंभ सभापती रमेश तवडकर यांनी केला, त्यादिवशी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे या यात्रेवर टीका करणारे एक वादग्रस्त विधान समोर आहे. असे असले तरी या विधानावरून मंत्री गोविंद गावडे एकाकी पडल्याचे दिसून येते.
मंत्री गावडे यांचा अप्रत्यक्ष रोख सभापती रमेश तवडकर यांच्याकडे होता; पण प्रत्यक्षात ही यात्रा सभापती रमेश तवडकर यांनी आयोजित केली नसून आदिवासी खात्याने केल्याने गावडे यांना या यात्रेत येऊन नाममात्र हजेरी लावावी लागली.
सभापती रमेश तवडकर यांच्या सोबतीने त्यांनी माशेल ते मंगेशीपर्यंत दुसऱ्या एका दुचाकीवरून प्रवास केला. आजच्या यात्रेत साखळी, प्रियोळ, मडकई, फोंडा व शिरोडा या मतदारसंघांतून हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले युवक पाहता, मंत्री गोविंद गावडे आपल्याच वक्तव्यावरून एकाकी पडल्याचे समोर आले आहे.
कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सभापती रमेश तवडकर यांचे नाव न घेता त्यांना ‘सत्तेला चिकटलेले मुंगळे’ असे म्हटले होते. याविषयी सभापतींची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, या मंत्र्यांनी जे काही म्हटले, ते कोणाला उद्देशून हे मला माहीत नाही. हे विधान मला लागत नाही; कारण या यात्रेचे आयोजन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी एक इव्हेंट कंपनीही नियुक्त केली आहे. काहींना माझ्या नावाची ‘ॲलर्जी’ झाली असेल तर मी काय करू’ असा उलट प्रश्न त्यांनी तेथे उपस्थित पत्रकारांना केला.
आमोणे येथील ‘कोणेश्वर’ देवचाराला गाऱ्हाणे घालण्यासाठी यात्रा थांबली, तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. तवडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनीच दिलेल्या आवाहनाला अनुसरून मी या यात्रेसोबत चाललो आहे. हजारोंच्या संख्येने युवक स्वत:च्या दुचाकी घेऊन या यात्रेत सहभागी होत आहेत, याचे श्रेयही त्या दोघांना जात आहे.
या यात्रेचा या दिवसाचा प्रवास साखळी ते बोरी, असा होता. प्रियोळ-मडकई परिसरातील दुचाकीस्वार आमोणे सर्कलकडे जमले होते. साखळीहून बिरसा मुंडा यांची प्रतिमा असलेला रथ तेथे पोहोचताच, हे दुचाकीस्वार यात्रेत सामील झाले, तर साखळीहून आलेले दुचाकीस्वार परत गेले. सुमारे दीडहजार दुचाकी येथे थांबल्या होत्या. पुढे खांडोळा, माशेल, बाणस्तारी येथे गटागटाने दुचाकीस्वार यात्रेला जोडले जात होते. अशाच विसेक दुचाकीस्वारांच्या गटासोबत मंत्री गावडे माशेल ते मंगेशीदरम्यान या यात्रेत सामील झाले.
नाही नाही म्हटले तरी फर्मागुढी येथे मंत्री गावडे यांनी ‘उटा’च्या स्थापना महोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर या यात्रेद्वारे सभापती कसे शक्तिप्रदर्शन करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यातच मंत्री गावडे यांनी युवकांनी या यात्रेत सहभागी होऊ नये, असे आवाहन केल्याने उत्सुकता अधिकच वाढली होती. यात्रा उशिरा सुरू झाली तरी सकाळी आठपासून लोक स्वत:च्या दुचाकी घेऊन गटागटाने जमू लागले होते. यात्रा सुरू झाली तशी आमोणा पूल ते माशेल बाजार अशी तीन किलोमीटर भली मोठी रांग तयार झाली. यात प्रियोळ परिसरातील मंत्री गावडेसमर्थक पंच-सरपंच वगळता, आदिवासी समाजातील इतर आजी- माजी पंच-सरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंत्री गावडे यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर फोंडा तालुका नियोजन समितीचे सदस्य अंकुश गावकर यांनी सांगितले की, सहभागी दुचाकीस्वारांना आदिवासी संचालनालयाकडून मानधन देण्यात येत असून त्यासाठी सहभागी दुचाकीस्वारांना योग्य ते कागद सोपस्कार पूर्ण करावे लागतात. ते पुढे म्हणाले की, मंत्र्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. कारण याआधी सभापती रमेश तावडकर अशी यात्रा आदर्श युवा संघाच्या वतीने काणकोणपुरती आयोजित करीत होते; पण यंदा सरकारने ही जबाबदारी स्वत:कडे घेतल्याने त्यांनी स्वत:ची अशी वेगळी यात्रा आयोजित केली नाही.
हजारो आदिवासी बांधव या गौरव यात्रेत सहभागी झाले असतानाही रस्त्यावर फोंडा ट्रॅफिक पोलिस सेलचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. परिणामी बाणस्तारी, म्हार्दोळ येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आणि यात्रा विस्कळीत झाली. फर्मागुडी येथे यात्रा पोहोचली; पण वाहतूक कोंडीत बिरसा मुंडा रथ काही किलोमीटर मागेच राहिला. त्यामुळे ट्रॅफिक पोलिस शनिवारीच सुटीवर गेले की काय, असा प्रश्न विचारला जात होता.
मंत्री गावडे म्हणाले होते की, ‘बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त काही नेते युवकांना रॅलीत सहभागी होण्यासाठी १ हजार रुपयांचे पेट्रोल आणि २०० रुपये देण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर येत आहे. अशा आमिषांना बळी पडू नये. बिरसा मुंडा यांच्यासाठी एखाद्या कार्यक्रमात येण्यासाठी जर कुणीतरी १२०० रुपये देत असतील, तर त्यांनी रॅलीत सहभागी होऊच नये. कुणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी लोकांनी आमिषांना बळी पडू नये.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.