Goa History: छत्रपती व पोर्तुगिजांमध्ये तहनामा

Chhatrapati Shivaji Maharaj Portuguese Treaty Agrrement: डिचोली येथे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज वकील यांच्यात बोलणी होऊन ६ डिसेंबर १६६७ रोजी तहाचा मसुदा लिहिला गेला. या संदर्भात पुढे शिवाजी महाराजांविषयी पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी- द- ग्वार्द ‘युद्धात कैद केलेल्या स्त्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून सन्मानाची वागणूक मिळते,’ असा उल्लेख करतो.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Portuguese Treaty AgrrementCanva
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

१९ नोव्हेंबर १६६७ रोजी गोव्याच्या बार्देश कोलवाळ गावातील किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. कोलवाळ गावात शिवाजी महाराजांच्या राज्यातील कुडाळ, पेडणे, मणेरी, डिचोली येथील बंडखोर देसाई पोर्तुगिजांच्या आश्रयाला येऊन राहिले होते. शिवाजी महाराजांची स्वारी होणार याचा सुगावा आधीच या देसाईंना लागला होता. किल्ल्यात पोर्तुगिजांच्या आश्रयाला राहणारे देसाई आणि कोलवाळमधील काही श्रीमंत कुटुंबे अगोदरच रेईश मागूश आणि आग्वाद किल्ल्यांच्या आश्रयाला पळाली. कोलवाळच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी असणारे पोर्तुगीज सैन्यही पळून गेले.

१९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने बार्देशमधून पोर्तुगिजांकडून पुरेपूर वसुली करत शेकडो ख्रिस्ती पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि जनावरे पकडून कैदी म्हणून ताब्यात घेतले. २२ नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह डिचोली येथे मुक्कामाला गेले. डिचोली हा त्याकाळी त्यांच्या राज्याचा भाग होता.

तेथे पोर्तुगीज गव्हर्नरने आपले वकील रामजी शेणवी कोठारी यांस शिवाजी महाराजांकडे तहाची बोलणी करण्यास पाठविले. डिचोली येथे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज वकील यांच्यात बोलणी होऊन ६ डिसेंबर १६६७ रोजी तहाचा मसुदा लिहिला गेला. या तहामध्ये पोर्तुगिजांच्या आश्रयाला आलेल्या लखमसावंत, नार सावंत, केशव नाईक, केशव प्रभू, मलशेणवी या देसायांना पोर्तुगिजांनी हद्दीबाहेर घालवून देण्याचे वचन दिले.

तसेच कायसुवच्या नदीतील दोन्ही बाजूच्या व्यापाराला संरक्षण देण्याचे मान्य केले. बार्देशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने पकडलेले पोर्तुगिजांचे प्रजाजन शेकडो स्त्री- पुरुष, मुले यांच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी एक रुपयाही न घेता त्यांना पाद्री गोसाल यांच्या हवाली केले. या संदर्भात पुढे शिवाजी महाराजांविषयी पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी- द- ग्वार्द ‘युद्धात कैद केलेल्या स्त्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून सन्मानाची वागणूक मिळते,’ असा उल्लेख करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बार्देश स्वारीची माहिती संपूर्णपणे पोर्तुगीज संदर्भातून मिळते. बार्देश स्वारीची मराठी कागदपत्रे अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. एकमेव मराठी कागद म्हणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगिजांच्या दरम्यान ६ डिसेंबर १६६७ रोजी डिचोली येथे झालेल्या तहाचा करारनामा उपलब्ध असून तोही पोर्तुगालच्या पुराभिलेखात आहे. पोर्तुगिजां कौंट व्हिसेरेइ यांनी जो करारनामा पाठविला त्याचा आशय असा

’आमच्या राज्याच्या आश्रयास आलेल्या देसायांचा पाठलाग करीत शिवाजी राजे आपल्या सैन्यासह आमच्या राज्यात घुसल्याचे पाहून आम्हांला फार वाईट वाटले. त्याचे परिमार्जन करण्यासाठी शिवाजी राजे यांनी आम्हांला वारंवार पत्रे पाठवून दिलगिरी प्रदर्शित केली व ह्या राज्याशी असलेली त्यांची मैत्री टिकविण्याची व ती पुढे चालू ठेवण्याची इच्छा दर्शविली. त्याच्या विनंतीस अनुसरून आम्ही पुढील अटी सुचविल्या :

शिवाजी राजे यांच्या सैन्याने बार्देशमध्ये दि. १९ नोव्हेंबर १६६७ रोजी जी बायका मुले कैद करून नेली त्यांना त्यांनी खंडणी न घेता अथवा त्यांना ओलीस न ठेवता सोडून द्यावे त्याचप्रमाणे आमच्या स्वामीच्या प्रजाजनांची गुरेढोरे आणि गोणीचे बैल पळविण्यात आले, तेही परत करावेत. कारण महान व्हिसेरेइ यांनी ज्या अर्थी सौम्यपणे लिहिले त्याअर्थी आणि त्यांनी लिहिल्याप्रमाणे जी माणसे इकडे कैद करून ठेवण्यात आली होती, त्यांना एक छदामही न घेता मुक्त करून, पाद्री गोंसालु मार्तीश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लखम सावंत आणि केशव नाईक हे जे देसाई आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिले आहेत. त्यांना ताकीद करण्यात येत आहे की, त्यांचे वास्तव्य आमच्या राज्यात असे तोवर तो त्यांनी शिवाजी राजे यांच्याशी अथवा त्यांच्या प्रजाजनांशी युद्ध करू नये वा त्यांची कुरापत काढू नये. त्यांनी जर तसे केले, आणि ते जर मला कळले, अथवा शिवाजी राजे यांनी माझ्या निदर्शनास आणले, तर त्यांना आमच्या स्वामीच्या राज्यात फिरून प्रवेश मिळणार नाही.

आमच्या राज्यात असलेले नारबा सावंत आणि मल्लू शेणवी या दोघांनादेखील असाच इशारा देण्यात येत आहे. जे देसाई आमच्या राज्यात येऊन राहिले आहेत, त्यांनी बंडाळीस प्रवृत्त होऊ नये म्हणून त्यांना गोवा शहरातच वास्तव्य करण्याची सक्ती केली जाईल. त्यांनी साष्टीत अथवा बार्देशमध्ये काही गडबड न करता राहिले पाहिजे. त्यांनी दंगेधोपे माजविले अथवा या राज्यातील प्रजाजनांची कुरापत काढली, तर त्यांना या बेटातून हद्दपार करण्यात येईल.

Chhatrapati Shivaji Maharaj
Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

बालाघाटातून जो व्यापारी माल आणि गोणीचे बैल या बेटात तसेच साष्टी आणि बार्देश प्रांतात येतील त्यांना प्रतिबंध केला जाऊ नये, अथवा माल अडवून ठेवण्यात येऊ नये. तसेच या बेटांतून अथवा आमच्या स्वामीच्या इतर प्रदेशातून जे गोणीचे बैल बालाघाटी माल आणण्यासाठी जातील त्यांना अडथळा केला जाऊ नये. शिवाजी राजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध जुंपले, तरीदेखील हा व्यापार चालू राहावा.

उभय पक्षांची जमिनीवर आणि समुद्रावरही मैत्री असावी. जर या मैत्रीत व्यत्यय येण्यासारखे एखादे कृत्य घडले तर शिवाजी राजे यांनी कौंट व्हिसेरेइ यांच्याकडे व कौंट व्हिसेरेइ यांनी शिवाजी राजे यांच्याकडे त्याचा खुलासा मागवा. हा खुलासा मिळाल्याखेरीज मैत्री भंग पावू नये. उपरनिर्दिष्ट अट मान्य करण्यात येत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

शिवाजी राजे यांना कौंट व्हिसेरेइ यांच्याशी एखाद्या कामाविषयी वाटाघाटी करायच्या असतील, तर एखाद्या विश्वासू मनुष्यामार्फत त्या करता येतील. तीच गोष्ट हत्यारांच्या उपयोगाचीही आहे.

गोवा ६ डिसेंबर १६६७ कौंट व्हिसेरेइ यांनी लिहिल्याप्रमाणे व उल्लेखिल्याप्रमाणे मी हे मान्य करीत आहे.११ डिसेंबर १६६७

शिवाजी राजे यांचा शिक्का’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com