सध्या सगळीकडे सोशल मीडियाचं जोरदार वारं वाहतंय. आज ऑफिसला जाताना कोणता ड्रेस घालावा, मी फिरायला चाललोय तिथे काय प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा आज मी सकाळी काय नाश्ता बनवू अशा सर्व प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर मिळतात. सध्या आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर सुरु असल्याने बसून एखादा मोठा व्हिडीओ बघणं सुद्धा आपल्याला जमत नाही मग अशावेळी सोशल मीडियावरचे रिल्स कामी येतात. हो ना? घरबसल्या आपण किती रिल्स शेअर करतो मात्र कधी यामागे काम करणाऱ्यांची गोष्ट ऐकलीये का?
आज आपण गोव्यातील अशाच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बद्दल जाणून घेणार आहोत. काणकोणमधून लग्न करून फोंड्यात आलेल्या आणि MBA ची पदवी मिळवलेल्या अश्रफीचा नेमका प्रवास कसा आहे हे पाहुयात....
तर अश्रफी गायकवाड इंस्टाग्रामवर Wanderlust Foodie आणि Ashrafi Wanderlust असे अकाउंट चालवते. यामधून ती प्रेक्षकांना गोव्यातील पर्यटनस्थळं, फूड कल्चर आणि इतर गोष्टींबद्दल माहिती पुरवते. अश्रफीचे आज जवळपास 36.7k फॉलोवर्स आहेत.
अश्रफी गायकवाडचा जन्म दक्षिण गोव्यातील काणकोणचा. तिने कात्यायनी बाणेश्वर विद्यालयातून शिक्षणाची सुरुवात केली, पुढे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून 12वी पर्यंतच शिक्षण कॉमर्स पूर्ण केलं.
बारावीनंतर काय करावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो मात्र अश्रफीने इतरांपेक्षा वेगळी वाट निवडत एविएशनमधून शिक्षण मिळवायचं ठरवलं आणि थेट जेट एरवेजमधून कॅबिन क्रू चं प्रशिक्षण पूर्ण केलं. जेट एरवेज ही तिच्या एविएशन शिक्षणामधली महत्वाची पायरी होती, मात्र एवढा मोठा ब्रेक मिळून देखील अश्रफीने एव्हिएशनमध्ये करियर घडवलं नाही कारण तिचा कल हा नेहमीच बिजनेस आणि मॅनेजमेन्टकडे होता.
प्रोफेशनल आयुष्यात वाटचाल करत असतानाच तिच्या पर्सनल म्हणजे वैयक्तिक आयुष्यात अनेक बदल घडत होते आणि त्यांपैकीच एक तिचं म्हणजे लग्न. काणकोणमधल्या अश्रफीचं फोंड्यात लग्न झालं आणि खरोखर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नेहमीच बिजनेसची आवड असलेल्या अश्रफीने लग्नानंतर सी. व्ही रमण ओपन युनिव्हर्सिटीमधून BBA ची पदवी मिळवली आणि आज ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर आहेच मात्र सोबतच पती आनंद गायकवाड यांच्यासोबत व्यवसायात देखील हातभार लावते.
या प्रश्नाचे उत्तर देताना अश्रफी सांगते की तिला फिरायला प्रचंड आवडतं. 2010 पासून ती वेगवेगळ्या जागांना भेट देत तिथली संस्कृती, फूड कल्चर, भाषा आणि इतर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय. अश्रफी असंही म्हणाली की तिने आजवर 25 देशांना भेट दिलीये. परदेश म्हटलं की साहजिकपणे आपण मोठमोठाली हॉटेल्स आणि रेस्टोरंटना भेट देतो मात्र अश्रफी यांपैकी नाही ती नवीन देशात खरोखर काय चालतं, तिथली माणसं कशी जगतात, तिथलं स्ट्रीटफूड यामध्ये रमते.
अश्रफी म्हणते अशा जागांना भेट दिल्यानंतर ती काही फोटोज शेअर करायची, मात्र वेगवेगळी चित्रं एकाच अकाउंटवरून जात असल्याने यात हवा तास वेगळेपणा दिसून यायचा नाही, आणि प्रेक्षकांना नवीन काही तरी द्यावं म्हणून वर्ष 2020 मध्ये तिने फूड संबंधित एक वेगळी पेज सुरु केली.
तुम्ही जर का अश्रफीचा अकाउंट पहिला तर Wanderlust Foodie वर तुम्हाला जेवणाचे अनेक प्रकार तर Ashrafi Wanderlust या अकाउंटवर तिचे ट्रॅव्हल एक्स्पीरियंस पाहायला मिळतील.
अश्रफी म्हणली की तिने पोस्ट केलेले फोटो पाहून अनेक लोकं तिला स्वतःचं एक पेज सुरु करावं अशी कल्पना सुचवत होते आणि आज तिला मिळणारं यश हे याच लोकांच्या प्रोत्साहनामुळे आहे. मात्र तेव्हा सोशल मीडिया, इंफ्लूसिंग, रील्स वैगरे असा प्रकार जास्ती प्रचलित नव्हता. ज्या लोकांशी तुमची ओळख होती, तेच फॉलो करायचे आणि म्हणून अश्रफी जे काही शिकली ते स्वतःच्या बळावर.
अश्रफ़ीनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासाची सुरुवा एकदमच किरकोळ होती आजूबाजूच्या मंडळींनी सांगितलं म्हणून केलेली, मात्र हळूहळू गोव्याची आवड असलेल्या लोकांना अश्रफ़ीच्या पेजबद्दल माहिती मिळायला लागली. गोवा हा नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरलाय आणि म्हणूनच गोवा नेमका कसा आहे, गोव्यात कोणत्या गोष्टी चालतात वैगरे प्रश्न घेऊन गोव्याबाहेरील ब्लॉगर्स तिच्याशी संपर्क करायचे. केवळ गोव्याबाहेरीलच नाही तर गोव्यातील काही इन्फ्लुएन्सर्सची तिला मदत मिळत गेली, पैकी ती केव्हिनचं नाव घेते. केव्हिनने तिला नेहमीच मदत केल्याचं ती सांगते.
आनंदाची बाब म्हणजे अश्रफीच्या माहेर आणि सासरहून तिला कायम पाठिंबा मिळाला आहे. ती म्हणते की घरची लोकंच तिला कोणता कॉन्टेन्ट बनवावा यावर अनेक कल्पना सुचवत असतात. जरी घरच्या वयस्कर मंडळींना सोशल मीडिया इन्फ्लूएंसिन्गबद्दल जास्ती माहिती नसली तरीही आपल्या मुलीला यातून नाव मिळतंय, तिला याची आवड आहे याची त्यानं पुरेपूर कल्पना आहे.
अश्रफी म्हणाली की तिला कॉन्टेन्ट क्रियेटिंगची आवड आहे. प्रवासाचा देखील शौक असल्याने घरच्यांच्या प्रोत्साहनातून तिने हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात इंस्टाग्रामपेक्षा फेसबुकची अधिक चर्चा असल्याने फेसबुकपोस्ट करून हा प्रवास सुरू झाला होता. हळूहळू तांत्रिक बदल घडत गेले, फेसबुकची जागा इंस्टाग्रामने काबीज केली आणि रिल्स घरोघरी पोहोचू लागले.
मात्र अश्रफीने कोणाचीही मदत न घेता स्वतः नवनवीन पैलू शोधात आपल्या स्किल्स वाढवल्याचं ती सांगते. कन्टेन्ट कसा तयार करावा यावर याबद्दल काही कोर्स वगरे अद्याप अस्तित्वात आलेले नाहीत आणि म्हणूनच कन्टेन्ट क्रिएटर म्हणून वावरत असताना स्वतःच मेहनत घेत गाडी पुढे न्यावी लागते. आजही अश्रफी कुठल्या मोठ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने नाही तर मोबाईलच्या साहाय्याने शूटिंग करते आणि प्ले-स्टोअर वरच्या ऍप्सनी एडिटिंग पूर्ण करते.
या प्रश्नावर अश्रफी हसली आणि म्हणाली की दररोज नवीन गोष्ट सुचणं अवघड आहे. मात्र अनेकवेळा घरचे आणि मित्र नवनवीन कल्पना सुचवत असल्याने जास्ती विचार करावा लागत नाही. बाकी गोव्यात राहणाऱ्यांना कधीही कन्टेन्टसाठी पायपीट करण्याची वेळ येत नाही, राज्यात काही ना काही सण आणि उत्सव घडतच असतात. मात्र हा कन्टेन्ट लोकांसमोर ठेवताना तुम्ही तो कसा ठेवताय यावर सगळं गणित अवलंबून असतं.
अश्रफी गोव्यातील प्रेक्षकांबद्दल खुश आहे मात्र कधीतरी हेट कमेंट्सचा सामना देखील नक्कीच करावा लागतो असंही ती म्हणालीये. नवीन नवीन सुरुवात केली असता तिला अशाच काही कमेंट्सचा सामना करावा लागलाआणि या क्षेत्रात नवखी असल्याने तिला भरपूर त्रास देखील झाला होता.
अलंकार म्हापसा यावर तिने एक रिल बनवला होता. अश्रफी म्हापश्यातील नसल्याने तिला तिथे सुरु असलेल्या स्वच्छतेच्या त्रासांबद्दल त्यांना माहिती नव्हती परिणामी तिला स्थानिकांचा रोष पत्करावा लागला होता. अचानक या 100-200 अनोळखी लोकांचा सामना करणं सोपी गोष्ट नव्हती मात्र केव्हिन नावाच्या मित्राने तिला सकारात्मक राहायला मदत केली.
अश्रफी सध्या जे काम करतेय त्यामध्ये ती प्रचंड खुश आहे, मात्र वेळेअभावी हवी तशी माहिती पुरवता येत नसल्याचा खेद तिने व्यक्त केलाय. येणाऱ्या काळात तिला गोव्याचं खरं चित्र लोकांसमोर आणायचं आहे आणि यासाठी युट्युब शिवाय पर्याय नाही हे ती जाणते, म्हणूनच "काही काळात मी युट्युब पर्यंत नक्कीच पोहोचेन" असा विश्वास तिने व्यक्त केलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.