Bicholim Latambarcem Zilla Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: भाजपची अनपेक्षित खेळी! विरोधकांचा विस्‍कटला प्‍लॅन, अचानक उमेदवार बदलल्याने गोंधळ, लाटंबार्सेत राजकीय उलथापालथ

Latambarcem: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या डिचोलीतील लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपने राजकीय चाल खेळताना विरोधकांची ‘हवा’च काढून घेतली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या डिचोलीतील लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपने राजकीय चाल खेळताना विरोधकांची ‘हवा’च काढून घेतली आहे. या मतदारसंघातून माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय (शरद) शेट्ये यांना भाजपची उमेदवारी मिळेल अशी चर्चा काल-परवापर्यंत सुरू होती. मात्र भाजपने शेट्ये यांच्याऐवजी लाटंबार्सेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच पद्माकर मळीक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

दुसऱ्या बाजूने लाटंबार्सेमधून भाजप उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी सर्वमान्य उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर गत विधानसभा निवडणूक लढविलेले मेघश्याम राऊत यांच्‍या नावावर त्‍यांनी शिक्कामोर्तब केले. माजी आमदार नरेश सावळ यांनी त्‍यांच्‍या नावाची घोषणा केली.

दरम्‍यान, पद्माकर मळीक यांच्या विजयासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह भाजप मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

अन्‌ विरोधकांची झाली गोची

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे बंधू तथा तत्कालीन झेडपी संजय (शरद) शेट्ये यांची २०२० साली झालेल्या झेडपी निवडणुकीवेळी ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लढविण्याची संधी हुकली होती. तरीसुद्धा त्यावेळी शेट्ये बंधूनी सर्व शक्ती पणाला लावून प्रदीप रेवोडकर यांना निवडून आणण्याची किमया साधली होती.

मात्र यावेळी रेवोडकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाव्य उमेदवार म्हणून संजय शेट्ये यांच्‍याकडेच पाहिले जात होते. त्‍यांचे नाव चर्चेत आल्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यासह आमदारांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नव्हती. मात्र भाजपने अखेर उमेदवार बदलण्याची चाल खेळली व माळ पद्माकर मळीक यांच्‍या गळ्‍यात घातली. त्यामुळे विरोधकांची गोची झाली आहे. त्‍यांनी मेघश्याम राऊत यांचे नाव जाहीर केले.

देवदर्शनाने भोमकरांचा प्रचार सुरू

बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी वाढत चालली आहे. भोमचे सरपंच सुनील भोमकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत देवतांना श्रीफळ अर्पण केले. तसेच श्रींचा आशीर्वाद घेऊन आपल्‍या प्रचाराला प्रारंभ केला.

गेल्या दहा दिवसांपासून मतदारसंघात घराघरांत भेटी देत असलेले भोमकर यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत देवदर्शनाने प्रचाराचा प्रारंभ केला. तसेच भोम येथील श्री मल्लिकार्जुन, श्री सातेरी व श्री महादेव मंदिरात जाऊन श्रींचा आशीर्वाद घेतला.

यावेळी त्‍यांच्यासोबत पंच दामोदर नाईक, अब्दुल खान, मिताली फडते, शैला नाईक, प्रतिभा फडते गावकर, केरीच्या सरपंच सुलक्षणा जल्मी, सिद्धा गाड यांची उपस्थिती होती. जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण गाव दणाणून गेले.

प्रचारारंभी बोलताना सुनील भोमकर म्हणाले, मी तीन वेळा सरपंच म्‍हणून काम केले आहे. गावात सातत्याने विकासकामे राबवली. कार्यकर्ते, पंच व नागरिकांनी दाखवलेला विश्वासच माझी सर्वांत मोठी ताकद आहे. युवकांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे, ग्रामपातळीवर पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा निराकरण करणे आणि महिलांसाठी रोजगारसंधी वाढवणे ही माझ्या कामाची मुख्य दिशा असेल. केरी, बेतकी-खांडोळा, वळवई, भोम-अडकोण, तिवरे व वरगाव या सहा गावांतील पंचांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समीकरणे बदलण्‍याची शक्‍यता

गेल्या काही वर्षांत बेतकी-खांडोळा मतदारसंघातील राजकीय समीकरणांत बदल दिसून येत आहेत. नव्या पिढीतील नेतृत्वाला मतदार पसंती देत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. भोमकर यांनी गेल्या काही काळात राबवलेल्या पायाभूत सुविधा, समाजहिताच्या उपक्रमांमुळे त्यांचा प्रभाव वाढताना दिसतोय. त्‍यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेसची मोर्चेबांधणी

वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेसने अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षातर्फे उमेदवाराची घोषणा अद्याप झाली नसली तरी विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य ज्युलियो फर्नांडिस यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार असल्याचे दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी स्पष्ट केले.

डिसिल्वा म्हणाले की, २०२० मधील कोविड काळातील निवडणुकीत अनेक मतदार मतदानापासून दूर राहिले. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असून अधिकाधिक मतदारांनी मतदान करून ज्युलियो यांना विजयी करावे. त्‍यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा सकारात्मक प्रभाव नक्कीच मतदारांवर पडला असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेळ्ळी झेडपी मतदारसंघात वेळ्ळी, आंबेली, चिंचोणे आणि असोळणा या पंचायतींचा समावेश आहे. गत पाच वर्षांत कोणतेही काम प्रलंबित ठेवलेले नाही. सर्व समाजघटकांनी दाखवलेला विश्वास यावेळीही कायम राहील, असा विश्‍‍वास ज्युलियो फर्नांडिस यांनी व्‍यक्त केला.

दरम्‍यान, बाराडी येथील होली क्रॉस चॅपेलमध्ये प्रार्थना करून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT