Bhoma Village Road News Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road: ते '36 प्लॉट' वाचवण्यासाठी चौपदरी रस्ता! संतप्‍त भोमवासियांचे आरोप; सरपंचांना धरले धारेवर

Bhoma Bypass Road: भोम येथील नियोजित चौपदरी रस्ता कामाच्या मोजमापप्रकरणी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांत बेबनाव झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.

Sameer Panditrao

फोंडा: भोम येथील नियोजित चौपदरी रस्ता कामाच्या मोजमापप्रकरणी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांत बेबनाव झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, त्यानंतर प्रकरण निवळले असले, तरी भोमवासीयांनी आम्हाला गावातून चौपदरी रस्ता नको, बगलमार्ग हवा अशी जोरदार मागणी केली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी चौपदरी रस्ता मोजमाप करण्यासाठी आले होते, त्यावेळी हा गोंधळ उडाला.

भोम गावातून चौपदरी रस्ता नकोच, असा धोशा ग्रामस्थांनी लावला आहे. गेल्या सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे भोमवासीयांची मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळेला केवळ चारच घरे जातील, पण एकाही देवळाला हात लावला जाणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी केली होती. नेमका कुठून आणि कसा चौपदरी महामार्ग नेला जाईल याची माहिती करून देण्यासाठी आज मंगळवारी बांधकाम खात्याचे अधिकारी आले होते. मात्र, या मोजमापप्रकरणी त्यांच्यातच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडिमार केला. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला गावातून रस्ता नकोच, आम्हाला बगलमार्ग हवा, असा धोशा ग्रामस्थांनी लावला. शेवटी मोजमाप करून हे अधिकारी तेथून निघून गेले.

रस्ता मोजमाप सुरू असताना ग्रामस्थ व अधिकाऱ्यांत बाचाबाची होताना दिसली. या ठिकाणी रस्ता अतिशय अरुंद असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी शेवटी वाहतूक मोकळी केली. विशेष म्हणजे हे मोजमाप करतेवेळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मोजमाप करून गेल्यानंतर सर्व ग्रामस्थ पंचायतीजवळ एकत्रित आले. त्यावेळेला संजय नाईक, पुतू गावडे, किशोर नाईक, संदेश नाईक, प्रताप नाईक, बाबूसो जल्मी व इतरांनी आपले विचार मांडताना आम्हाला गावातून चौपदरी रस्ता नकोच, आम्हाला बगलमार्ग हवा असल्याचे निक्षून सांगितले.

ग्रामस्थ चवताळले

भोम गावातील मंदिर आणि घुमटीजवळील मोजमापावेळी गफलत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थ चवताळले. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पुन्हा एकदा मोजमाप करण्यात आले. भोम गावातून २५ मीटर रस्ता करणार असल्याचे सरकार सांगते. मात्र, न्यायालयात ६० मीटरचा रस्ता करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र देते, यावरून काय समजायचे, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

सरपंचांना धरले धारेवर

भोम गावचे सरपंच सुनील नाईक हे मोजमाप करतेवेळी तेथे आल्यावर ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करून धारेवर धरले. ग्रामस्थांच्या विरोधात भोम हडकोण पंचायत काम करीत असून मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थ भेटायला गेले त्यावेळी सरपंच नव्हते आता मोजमाप करतेवेळी सरपंच आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. शेवटी पोलिसांनी सरपंचांना तेथून हटवले, त्यानंतर तणाव निवळला.

मुख्यमंत्र्यांकडे म्हणणे मांडणार

मोजमाप केल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही आमची बाजू स्पष्ट करणार असून आम्हाला गावातून चौपदरी रस्ता नको, आम्हाला बगल मार्ग हवा असल्याचे निक्षून सांगणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या बैठकीला संजय नाईक यांना सोबत घेऊन जाणार असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

३६ प्लॉटमुळे राजकारण...

भोम गावात बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या ३६ जमिनीच्या प्लॉटमुळे राजकारण सुरू आहे. लोकांना भोम गावातून चौपदरी रस्ता नकोच आहे, पण हे प्लॉट वाचवण्याबरोबरच जेटीसाठी भोम गावातूनच चौपदरी रस्ता नेण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संजय नाईक यांनी हे ३६ प्लॉट कुणाचे ते शोधून काढा, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांची पुन्हा चर्चेची तयारी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाेम गावातील प्रस्तावित महामार्ग विस्तारीकरण योजनेबाबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. “मी गावकऱ्यांना सांगितले आहे की, जागेवर खुणा नोंदवल्यानंतर आणि परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर ते माझ्याकडे पुन्हा चर्चेसाठी येऊ शकतात. सरकार संवादासाठी सदैव तयार आहे.” मंत्रालयात बैठक आटोपून निघताना या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT